मुंबई : ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत मुंबई विभागातून प्राथमिक फेरीचे आव्हान पूर्ण करून विभागीय अंतिम फेरीत पोहोचलेल्या युवा रंगकर्मींनी गेले काही दिवस जोरदार तालमी केल्या आहेत. उत्तम विषय, नेपथ्य, अभिनय, सादरीकरण या जमेच्या बाजू असल्या तरी प्राथमिक फेरीत परीक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन, सूचना यांचा विचार करत तालमींमध्ये उणिवा भरून काढण्यावर भर दिला असल्याचे या महाविद्यालयीन रंगकर्मींनी सांगितले.
‘लोकसत्ता लोकांकिका’ची मुंबई विभागीय अंतिम फेरी शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी रंगणार असून या स्पर्धेत प्राथमिक विभागीय फेरीतून निवड झालेल्या सहा एकांकिका संघात चुरस पाहायला मिळणार आहे. नाट्यक्षेत्रातील दिग्गज परीक्षक आणि प्रेक्षकांसमोर आपल्या एकांकिकेचे उत्तम सादरीकरण करण्याचे आव्हान या सहा संघांसमोर असल्याने गेले कित्येक दिवस न थकता तालमी केल्या असल्याचे या रंगकर्मींनी सांगितले. एकांकिका उत्तम सादर व्हावी, यासाठी तालमी फार महत्त्वाच्या ठरतात. मात्र, एकही खाडा न करता दिवसरात्र तालमी उत्तम वठवायच्या तर वेळ, जागा यांच्या उपलब्धतेसह अनेक अडचणींना तोंड देत स्पर्धकांनी कसून सराव केला असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले.
‘लोकसत्ता लोकांकिके’च्या प्रतिष्ठित व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदात आहोत. प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीत दाखल झाल्याचा आनंद होताच, मात्र प्राथमिक फेरीच्या वेळी परीक्षकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन आम्ही मनापासून तालमी केल्या आहेत, असे किर्ती महाविद्यालयाच्या स्वानंदी पांचाळ हिने सांगितले.
तर ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत नेहमीच नवे विषय, सादरीकरणाच्या नावीन्यपूर्ण कल्पना यांना प्रोत्साहन दिले जाते. आमच्या एकांकिकेच्या विषयामुळे प्राथमिक फेरीत आमच्या संघांची निवड होईल, असा विश्वास आम्हाला होता आणि खरोखरच आमची विभागीय अंतिम फेरीसाठी निवडही झाली. त्यामुळे सध्या तालमींवर सगळा जोर असून अंतिम फेरीसाठी उत्तम सादरीकरण करणे हेच आमचे लक्ष्य आहे, असे म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ऋतू मोरे हिने सांगितले.
विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार तालीम
तालमी करताना अडचणी येतात, मात्र शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तालमीची प्रक्रिया सोपी झाली, अशी भावना केळकर – वझे महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी व्यक्त केली. प्रत्येक सादरीकरणाच्या वेळी प्रयोगात थोडेफार बदल केले जातात. त्यामुळे आणखी मेहनत घ्यावी लागते. मुख्य पात्रांसह अन्य पात्रांचीही मोठी कसरत होते. भरपूर सराव करावा लागतो. प्रयोगातील केवळ दोन कलाकारांच्या परीक्षा असल्याने थोडा गोंधळ उडतो. मात्र, अन्य कलाकार त्यांची कमतरता भरून काढतात. तालमीत अनेक मुलींचा समावेश असल्याने रात्री उशिरापर्यंत सराव केला जात नाही. अनेकजण ठाणे-डोंबिवली येथे राहत असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्री ९ पर्यंत सराव थांबवला जातो. अशा सगळ्या अडचणींवर मात करून जोरदार सराव केला असल्याचे केळकर – वझे महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी सांगितले.
परीक्षेचा काळ असल्यामुळे तालमी करताना स्पर्धकांना मोठी कसरत करावी लागली, मात्र प्रत्येकाने कोणत्याही तक्रारीविना काम केले. परीक्षा कालावधीत १२ तास तालीम करून रात्रभर जागरण करत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि सकाळी परीक्षा दिली. अनेक वेळा रात्रभर तालीम केली, अशी माहिती भवन्स महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी दिली. दिवसरात्र एक करून संपूर्ण संघ ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये प्रयोग सादरीकरणासाठी सज्ज झाला आहे. प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य, कलाकार आदी सर्वांनीच उत्तम सादरीकरणासाठी कंबर कसली असल्याचे या स्पर्धकांनी सांगितले. तर अभ्यासाला प्राधान्य देत तालमी करण्यावर भर दिला असल्याचे साठ्ये महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी सांगितले. आम्ही ऑगस्ट महिन्यापासून या एकांकिकेची तयारी सुरू केली होती. तेव्हापासून विद्यार्थी मेहनत घेत आहेत. महाविद्यालयात अन्य कार्यक्रम असल्याने तालमीसाठी जागा मिळवण्यातही अडचणी आल्या, मात्र तरीही महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागांशी संवाद साधून जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात आले. अभ्यासाच्या बाबतीत तडजोड न करता प्रत्येकाने मेहनत घेऊन उत्तम सादरीकरणासाठी सराव केल्याचे साठ्ये महाविद्यालयातील स्पर्धकांनी सांगितले.
