मुंबई : देशभरात युवा पिढीचे विचार, आपल्या हक्कांसाठी लढण्याची, अन्यायाविरोधात निडरपणे आवाज उठवण्याची त्यांची भूमिका, विविध माध्यमांतील त्यांची कल्पक अभिव्यक्ती याबद्दल लोकांच्या मनात कमालीचे कुतूहल आहे. एकांकिका हे तर गेल्या अनेक वर्षांत तरुणाईचा आवाज म्हणून ओळखले जाणारे माध्यम. याचा सशक्त प्रयोगमंच उपलब्ध करून देत युवा रंगकर्मींच्या नाट्य प्रतिभेला साद घालणार्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे नवे पर्व ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
दरवर्षी नाट्यानुभवातून व्यक्त होण्याची तरुण रंगकर्मींची ही निकड, त्यांची सळसळती ऊर्जा आणि त्यांच्या प्रयोगशीलतेला मंच उपलब्ध करून देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्रयोगशाळा पुन्हा एकदा गजबजणार आहे. राज्यभरातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नागपूर अशा निवडक आठ शहरांमधील महाविद्यालयीन रंगकर्मी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत एकांकिका सादर करतात. गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यवर्तुळात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्या या आंतरमहाविद्यालयीन
एकांकिका स्पर्धेचे नवे पर्व येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नागपूर या विभागात प्राथमिक फेरी पार पडेल. प्राथमिक फेरीत निवडून आलेल्या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरी होईल. त्यानंतर प्रत्येक केंद्रावरील विभागीय अंतिम फेरीत सर्वोत्तम ठरणारी एक एकांकिका अशा आठ एकांकिकांमध्ये मुंबईत होणार्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत अंतिम जेतेपदासाठी चुरस रंगेल.
यंदा मुंबई आणि ठाणे वगळता बाकी विभागातील ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. तर मुंबई आणि ठाणे विभागाची प्राथमिक फेरी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
या स्पर्धेच्या प्रवेशिका लवकरच उपलब्ध होतील. एकांकिकेच्या माध्यमातून कलाक्षेत्रातील विविध संधींची कवाडे खुली करून देणार्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित करत लवकरच तयारीला सुरुवात करा.
मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक : एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
सहाय्य्य : अस्तित्व
टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन
