मुंबई : नाटय़वर्तुळात आणि महाविद्यालयीन नाटय़वेडय़ा तरुणाईत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला धडाक्यात सुरुवात झाली असून ठिकठिकाणी प्राथमिक फेरीची धामधूम सुरू आहे. नागपूरमधून ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीची नांदी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता मुंबई आणि कोल्हापूर केंद्रांवरही प्राथमिक फेरीचा पहिला अंक शनिवारी रंगणार आहे. 

नाटक ही मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव. व्यावसायिक रंगभूमीवर येणारे आशयघन नाटक, सर्जनशील दिग्दर्शक – लेखक मंडळी, पडद्यामागचे तंत्रज्ञ आणि मंचावर नाटक जिवंत करणारे प्रतिभावंत कलाकार हे सगळेच एकांकिका स्पर्धाच्या मुशीतून घडतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील महाविद्यालयीन तरुणाईला नाटय़-चित्रपट क्षेत्रातील प्रथितयश मंडळींसमोर एकांकिकेतून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत गेले महिनाभर कसून तालमी करणारे महाविद्यालयीन कलाकार लोकांकिकेच्या प्राथमिक फेरीसाठी सज्ज झाले आहेत. नागपूरपाठोपाठ मुंबई आणि कोल्हापूर केंद्रांवर शनिवार, ३ डिसेंबर रोजी ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी रंगणार आहे. त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि औरंगाबाद येथेही प्राथमिक फेरीला सुरुवात होईल.

विभागीय प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या एकांकिकांना विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करावे लागेल. आठ केंद्रांवरील एकेक विजेती एकांकिका अखेरच्या महाअंतिम फेरीत दाखल होईल. या चुरशीच्या स्पर्धेत ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी आता खऱ्या अर्थाने धडपड सुरू झाली आहे. ताज्या, आशयघन संहितेवर आधारित नाटय़ सादर करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील तरुण-तरुणी यांच्यामध्ये कमालीचा उत्साह दिसत आहे. दोन वर्षांनी प्रेक्षकांसमोर वैविध्यपूर्ण एकांकिका घेऊन येण्याचे आव्हान तरुण स्पर्धक कसे पेलतात, याबद्दलची उत्कंठा नाटय़ रसिकांमध्ये आहे.

प्राथमिक फेरी कुठे?

मुंबई : प्रभादेवीतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे सकाळी १० वाजल्यापासून ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर प्राथमिक फेरी जिंकण्यासाठी मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयीन कलाकार सज्ज झाले आहेत. 

कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयाच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे स्मृतिभवनाच्या मंचावर ‘लोकसत्ता लोकांकिका’ प्राथमिक फेरी रंगणार असून विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.

तरुणाईच्या जल्लोषात लोकसत्ता लोकांकिकाचा प्रारंभ ; विषयांतील वैविध्य, आविष्कारातील नावीन्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध

नागपूर : तरुणाईच्या जल्लोषात शुक्रवारी नागपूरमध्ये सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’ च्या सहकार्याने  ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा प्रारंभ झाला. विषयांतील वैविध्य आणि आविष्कारातील नावीन्य हे पहिल्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले.  दीपप्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात झाली.

सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहितांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शुक्रवारी वुमन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेली ‘शेतकऱ्याची आत्मकथा’ या एकांकिकेने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. बेभरवशाच्या पावसावर अवलंबून असलेली शेती, सावकाराकडून होणारा छळ आणि राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्येचे विदारक चित्रण या नाटकातून करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या ‘नात्यांचा ओलावा’ नाटकात आयुष्याच्या एका बेसावध वळणावर भेटलेले आगंतुक कसे आपल्या जीवनाचा भाग होऊन जातात आणि त्यांच्या भेटीने आंतर्बाह्य बदललेले आयुष्य पुढे कसे भावनांच्या हिंदूोळय़ावर झुलत राहते, याचे अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या ‘भोमक्या’ आणि ‘दाभाडय़ांचा वाद’ या दोन्ही नाटकांनी समाजातील वास्तव मांडले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या एकांकिका पाहायला मोठी गर्दी केली होते. यावेळी तरुणाईच्या टाळय़ा, हिप हिप हुर्रे.. अशा जल्लोषात सभागृह दुमदुमले होते.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे आहे. साहाय्य ‘अस्तित्व’चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika drama competition preliminary round from today in mumbai kolhapur centres zws
First published on: 03-12-2022 at 03:31 IST