आताच्या काळातील सामाजिक – राजकीय विषय ते अगदी ‘मेटा’सारख्या विषयांवरून युवा रंगकर्मींची अभिव्यक्ती ‘लोकांकिका’च्या मंचावर पाहायला मिळाली. प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद आणि सहा एकांकिका संघांत रंगलेल्या मुंबई विभागीय स्पर्धेत ‘जब वी मेटा’ या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारत महाअंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तर मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘स्वातंत्र्य सौभाग्य’ या एकांकिकेने द्वितीय आणि कीर्ती महाविद्यालयाच्या ‘आवाज कुणाचा’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून मुंबईतील विविध महाविद्यालयात उत्साहात तालमींना सुरुवात झाली. प्राथमिक विभागीय फेरी पार करत विभागीय अंतिम फेरीत दाखल झालेल्या सहा एकांकिका संघांची मेहनत शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत दिसून आली. प्रेक्षकांची दाद आणि नाट्यक्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये ठरली. मुंबई विभागीय अंतिम फेरीच्या परीक्षणाची धुरा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांभाळली. परीक्षकांसह ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. वैयक्तिक पारितोषिकांवर डहाणूकर महाविद्यालय आणि मुलुंड वाणिज्य महाविद्यालयांच्या कलाकारांचा वरचष्मा राहिला. महाअंतिम फेरीत दाखल झालेल्या या एकांकिका संघासमोर राज्यभरातून निवड झालेल्या संघांचे आव्हान असणार आहे. शनिवार, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीत राज्यभरातून निवडल्या गेलेल्या एकांकिका संघांमध्ये मानाचा ‘लोकसत्ता लोकांकिका’ करंडक पटकावण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता लोकांकिका मुंबई विभागीय अंतिम फेरीतील विजेते

ही स्पर्धा आमच्यासारख्या रंगकर्मींना खास ऊर्जा देणारी आहे. संपूर्ण संघाला या रंगमंचावर काम करताना एक वेगळाच उत्साह जाणवतो. या स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीपर्यंत पोहोचून तिथे सादरीकरण करणे ही आमच्यासाठी मोठी संधी होती. यंदा महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचता आलं नाही याचं थोडं वाईट वाटतं आहे, मात्र पुढील स्पर्धेसाठी आम्ही अधिक मेहनत घेऊन, जोमाने काम करत राहू याची खात्री आहे.

– सूरज नेवरेकर, संघप्रमुख, स्वातंत्र्य सौभाग्य (सर्वोत्कृष्ट एकांकिका – द्वितीय क्रमांक)

● ● ●

या स्पर्धेने मला नेहमीच प्रेरणा आणि व्यासपीठ दिलं आहे. २०२३ मध्ये मुंबई विभाग व महाअंतिम फेरीत ‘एकूण पट १’ या एकांकिकेसाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट नेपथ्याचा सन्मान हा त्याचाच एक भाग आहे. या वर्षीच्या ‘स्वातंत्र्य सौभाग्य’ एकांकिकेतील काळ व विषय मांडणी ही मोठी संधी आहे. या संपूर्ण प्रक्रियेत व हे पारितोषिक मिळण्यामागे माझी सहकलाकार जान्हवी पाटील आणि ‘एमसीसी नाट्यकर्मी’ यांचा मोलाचा वाटा आहे.

– अद्वैत सापते (सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : स्वातंत्र्य सौभाग्य)

● ● ●

‘लोकसत्ता लोकांकिका’ या अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली, आपली कला सादर करता आली याचा आनंद आणि अभिमान आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या रंगभूमीवर कार्यरत आहे. यावर्षी माझं महाविद्यालयीन जीवनाचं अखेरचं वर्ष असून, या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पारितोषिक मला मिळणं ही माझी स्वप्नपूर्ती आहे. नवोदित रंगकर्मींना स्वत:ला अभिव्यक्त करण्यासाठी आणि घडण्यासाठी असं भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक आभार.

– आर्या राणे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : स्वातंत्र्य सौभाग्य)

● ● ●

गेल्या पाच वर्षांपासून मी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत एकांकिकांसाठी प्रकाशयोजना करते आहे. अत्यंत संवेदनशील विषयावरील ‘स्वातंत्र्य सौभाग्य’ या एकांकिकेची प्रकाशयोजना करणे ही मोठी जबाबदारी होती. या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना हे पारितोषिक मिळालं, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यासाठी खासकरून माझा सहाय्यक आकाश पांचाळ याचे आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन आणि आभार.

– साईप्रसाद शिरसेकर (सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : स्वातंत्र्य सौभाग्य)

● मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण

● सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर

● सहप्रायोजक : लॅबइंडिया विदु इलेक्ट्रिक बायसिकल, झी टॉकीज, पुनित बालन ग्रुप, सोसायटी टी, डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. आणि लागू बंधू ज्वेलर्स

● पॉवर्ड बाय : एन एल दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च

● सहाय्य : अस्तित्व

● टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन