मुंबई : माणसाला जोवर माणसाची, मानवी भावभावना, स्पर्श-संवेदनांची अनुभूती यांची आस आहे, तोवर नाटक किंवा कोणत्याही कलेवर एआय (कृत्रिम अभिव्यक्ती) वरचढ होणार नाही, असे स्पष्ट मत अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी व्यक्त केले. कुठलेही नेपथ्य, प्रकाशयोजना, तंत्रज्ञान यांशिवायही केवळ एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी झालेल्या संवादातूनही नाट्य उभे राहू शकते. इतकी जिवंत असलेली ही कला कधीही लयाला जाणार नाही. उलट कृत्रिम अभिव्यक्तीला कंटाळून लोक पुन्हा नाट्यकलेसारख्या प्रत्यक्ष सादरीकरण असलेल्या कलेकडेच वळतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम सोहळ्यात पहिल्यांदाच ख्यातनाम अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी युवा रंगकर्मींशी संवाद साधला. लोकांकिकेच्या मंचावर पूर्वी स्पर्धक म्हणून सहभागी झालेले आणि आज कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन युवा प्रतिनिधी लेखक-दिग्दर्शक रावबा गजमल, लेखिका-प्राध्यापिका अपूर्वा भिलारे आणि लेखक- दिग्दर्शक अजय पाटील यांनी महाविद्यालयीन रंगकर्मींच्या मनात असलेले प्रश्न रत्ना पाठक शाह यांना विचारले.
युवकांशी संवाद साधण्यास, कलेच्या क्षेत्रात युवक नवे काय करू पाहत आहेत याबद्दल मला कायम उत्सुकता असते, असे सांगणाऱ्या रत्ना पाठक शाह यांनीही या युवा रंगकर्मींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत अनेकविध विषयांवरचे आपले स्पष्ट विचार मांडले. कुठलेही नवे तंत्रज्ञान आले म्हणून जुनी गोष्ट, कला संपणार अशी चर्चा सुरू होते. अगदी दूरदर्शनवर मालिका सुरू झाल्या तेव्हाही विशेषत: मराठी नाट्यवर्तुळात नाटक बंद पडणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. तेव्हाही सत्यदेव दुबे यांनी लोक नव्या माध्यमाला कंटाळून नाटकांकडे परतणार, असे स्पष्टपणे सांगितले होते आणि करोनानंतरच्या काळात तर आपण सगळ्यांनी याची प्रचिती घेतली आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. तंत्रज्ञानामुळे रील्स किंवा अन्य डिजिटल माध्यमांचा वापर वाढला तर काय होईल, याचे भय बाळगण्यापेक्षा त्याचा योग्य आणि आवश्यक उपयोग करून पुढे जात राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कलाकाराला सामाजिक भान बाळगणे गरजेचेच असते, असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भवतालात काय घडते आहे याचे भान असल्याशिवाय कोणत्याच क्षेत्रात काम होणार नाही, असे स्पष्ट करताना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण, त्यावर सखोल विचार, चर्चा या सगळ्याचा अर्क तुमच्या कामात उतरला पाहिजे, असेही शाह यांनी सांगितले.
मला कोणीतरी शिकवायला येईल, मार्ग दाखवणारा गुरू मिळेल, असा विचार करून उपयोग नाही. मी माझा मार्ग स्वत: शोधला पाहिजे, नाटक प्रत्यक्ष पाहण्यातून, वाचनातून, नाटकात काम करणाऱ्यांशी होणाऱ्या चर्चेतून स्वत.चा शोध घेत राहिला पाहिजे. शिकण्याच्या या प्रक्रियेत तुम्हाला मार्ग दाखवणारे मिळत जातात. पण त्यांची मदत घेऊनही आपला मार्ग आपल्यालाच शोधावा लागणार आहे, हे भान कायम बाळगले पाहिजे, असा अनुभवी सल्लाही त्यांनी दिला.
एनएसडीसारख्या नाट्यसंस्थेतून प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे का? रंगभूमीवरचा अभिनय आणि कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना कलाकाराला काही वेगळी तयारी करावी लागते का? यापासून ते आपले यश प्रेक्षकांच्या कौतुकात शोधणे कितपत योग्य आहे, अशा अनेक विषयांवर रत्ना पाठक शाह यांनी मनमोकळेपणाने उपस्थितांशी गप्पा मारल्या.
यंदा लोकांकिकेचे दहावे वर्ष आहे. पहिल्या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी विजयाबाई मेहता प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शुभारंभ विजयाबाईंपासून झाल्याने दहाव्या वर्षी रंगभूमीवर तसेच सकस कार्य करणारे कुणी तरी प्रमुख पाहुणे निमंत्रित करावे अशी इच्छा होती. त्यासाठी रत्ना पाठक शाह हेच नाव पक्के होते. या दहा वर्षांत स्पर्धेच्या मांडावाखालून गेलेले अनेक कलाकार विविध माध्यमात स्थिरावले आहेत. या कलाकारांना बांधून ठेवणे हाही ‘लोकांकिका’चा उद्देश आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रस्ताविकादरम्यान व्यक्त केले.
