वर्षभर विविध स्पर्धामध्ये यश-अपयश अनुभवलेल्या महाविद्यालयीन रंगकर्मीनी आता ‘लोकांकिका’मध्ये आपली कला जोमाने सादर करायला सुरुवात केली असून मुंबई विभागातील स्पर्धकांनी शनिवारी पहिल्या फेरीसाठी माटुंग्याचे यशवंत नाटय़मंदिर गाजविले. पहिल्या दिवशी एकूण सहा एकांकिका सादर झाल्या. मुंबई विभागाच्या उर्वरित नऊ  एकांकिका सोमवारी सादर होतील. त्यानंतर मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी उत्कृष्ट एकांकिकांची निवड केली जाईल.

मध्यमवर्गीय जीवनातील साधे आणि भावनिक प्रश्न, तसेच एकूण प्रगतीत हरवत चाललेली संस्कृती अशा विषयांवर भाष्य करत रंगकर्मीनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. मालाडच्या डीटीएसएस महाविद्यालयाने ‘ख्वाबिडा’ एकांकिका सादर केली. मूल नसलेल्या एका जोडप्याचा आई-बाबांच्या भूमिकेत शिरून ती भूमिका जगण्याचा अट्टहास या एकांकिकेने दाखवला. कीर्ती महाविद्यालयाची ‘ठसका’ आणि भवन्स महाविद्यालयाची ‘सॅटर्डे-सण्डे’ या एकांकिकांमधून बाप आणि मुलाच्या नात्यावर भाष्य केले गेले. मुलाबाळांसाठी, संसारासाठी कष्ट करण्याची सवय लागल्याने शेवटी आरामही टोचू लागणाऱ्या एका मध्यमवर्गीय स्त्रीची कथा ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेतून मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाने सांगितली. प्रगतीच्या लालसेपायी माणसाचे माणूसपण हरवत चालल्याचे वास्तव साठय़े महाविद्यालयाच्या ‘भूमी’ या एकांकिकेने मांडले. आपल्यातील ममतेने नवऱ्याच्या पहिल्या प्रेमालाही आपलंसं करणाऱ्या स्त्रीची कथा चेतना महाविद्यालयाच्या ‘खेळ-खुळा’ या एकांकिकेने सांगितली.

स्पर्धेच्या दिवशी सकाळपासूनच सर्व कलाकारांनी आपापल्या महाविद्यालयात तालमीसाठी हजेरी लावली होती. नियोजित वेळेच्या आधी पोहोचून मंचावर जाण्याआधीच एकांकिकेतील प्रसंग डोळ्यांसमोर उभे करत आपल्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न कलाकार करत होते. एकमेकांचे हात धरून म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थना नाटय़गृहात एक वेगळीच वातावरणनिर्मिती करीत होत्या.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.