प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण करून आपल्यातील सर्जनशील केलेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न रविवारी ठाण्यातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या मंचावरून केला. सामाजिक भान असलेले विषय, त्यावर मार्मिक टिप्पणी करणारे संवाद आणि रंगमंचावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनय अशा एखाद्या कसलेल्या कलाकृतीला तोडीस तोड ठरेल अशा एकांकिका सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांसह परीक्षकांचीही मने जिंकली. नक्षलग्रस्त भागांची करुण कहाणी सांगणाऱ्या ज्ञानसाधनाच्या ‘मित्तर’ने या स्पर्धेतून महाअंतिम फेरीत धडक दिली. मात्र, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक एकांकिकेला पसंतीची पावती मिळाली.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागाची अंतिम फेरी रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पार पडली. ठाणे, नवी मुंबई, विरार आणि डोंबिवलीच्या चार महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये आपले स्थान पटकावले होते. दुपारी साडेतीन वाजता ही स्पर्धा सुरू झाली, मात्र दुपारपासूनच कलाप्रेमी ठाणेकरांनी गडकरी रंगायतनमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, दहिसर, कल्याण-डोंबिवली या परिसरांतून लोकसत्ताचे वाचक या स्पर्धेसाठी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. स्पर्धेत एकांकिका सादर करण्यासाठी स्पर्धक महाविद्यालयांची लगबग सुरू होती. नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीताच्या साथीने एकांकिका सादर करायची असल्याने मोठय़ा प्रमाणात तयारीची लगबग सुरू होती. आपल्या शहरातील नाटय़गृहातील रंगमंचावर कला सादर करण्याची संधी या स्पर्धकांना मिळाल्याने स्पर्धकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालयाच्या ‘भुतके’ या एकांकिकेने स्पर्धेची सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानसाधना महाविद्यालय ‘मित्तर’ या एकांकिकेने स्पर्धा वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले. तर डी. वाय. पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रायल बाय मीडिया’च्या माध्यमातून २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या कामकाजाकडे लक्ष वेधले. दंगलग्रस्त तरुणाची व्यथा सांगण्याचा प्रयत्न विवा महाविद्यालयाच्या एकांकिकेने केला. दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, अभिनेते मकरंद अनासपुरे, दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी ठाणे विभागीय अंतिम फेरीत परीक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण सोहळ्यास ‘सॉफ्ट कॉर्नर’चे डी. एस. कुलकर्णी, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि तिन्ही परीक्षकांची उपस्थिती लाभली होती.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’चे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्रचे’ साहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर होत आहे. या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांना जोखण्यासाठी ‘आयरिस प्रोडक्शन’ हे टॅलेंण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत.

बरंच काही
शिकवणारा अनुभव
आम्ही सगळेच डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने सतत अभ्यासासाठीच वेळ जातो. मात्र ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे ठरवल्यावर उत्तम कलात्मक कृती त्यानिमित्ताने करता आली. पहिल्यांदाच एकांकिका स्पर्धा केली, त्यामुळे हा अनुभव वेगळा आणि चांगले शिकवणारा होता.
– लक्ष्मी चर्जन, डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय, नेरुळ

नवीन कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ
‘लोकांकिका’ स्पर्धेमुळे नवीन कलाकारांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आर्किटेक्चर महाविद्यालय असल्याने अभ्यास भरपूर असतो, पण तरीही या स्पर्धेत सहभागी व्हायचे ठरवले. स्त्री वर्चस्ववाद माध्यमातून सतत दर्शवला जातो, मात्र त्याची दुसरी बाजूदेखील असते, असा विषय एकांकिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला याचा आनंद आहे.
– प्रा. पल्लवी सुर्वे (दिग्दर्शक, ट्रायल बाय मीडिया), डी. वाय. पाटील महाविद्यालय, नेरुळ

परीक्षकांच्या प्रतिक्रिया

हौशी रंगमंचामुळे व्यापक दृष्टी
हौशी रंगभूमीमुळे कलाकारांना व्यापक दृष्टी मिळते. ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या माध्यमातून तरुणांच्या नजरेतून चार वेगवेगळे विषय पाहण्याची संधी मिळाली. या रंगकर्मीमध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण पद्धतीने कला सादर करण्याची धडपड असते, ती आज तरुणांमध्ये दिसून आली. रंगमंचावर काम करणारे कलावंत हे नेहमी उत्तमच काम करतात, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
– मकरंद अनासपुरे, अभिनेता

एकाच छत्राखाली भरलेली राज्यस्तरीय स्पर्धा
सध्याच्या काळात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होत असल्या तरी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा या सगळ्याहून वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला आपल्या शहरात आपली कला सादर करणे शक्य होते. त्यातून निवडलेला कलाकार हा महाअंतिम फेरीमध्ये जात असल्याने त्याला यातून एक चांगला अनुभवही मिळत असतो. या चारही एकांकिकांनी वेगवेगळे विषय दाखवल्याने त्यांची प्रयोगशीलता यातून दिसून आली.
– प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शिका

दिग्दर्शक-कलाकारांचा यशस्वी सुसंवाद..
‘लोकसत्ता लोकांकिके’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीतील चारही एकांकिकांमधून दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यातील यशस्वी सुसंवाद दिसून आला. प्रत्येक कलाकाराने काय केले पाहिजे हे दिग्दर्शकाने कलाकारांपर्यंत व्यवस्थित पोहोचवले होते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला आपण काय केले पाहिजे हे बरोबर समजत होते. हे या एकांकिकांचे यश म्हटले पाहिजे. या चारही एकांकिकांचे विषय चांगले होते.
– राजन ताम्हाणे, दिग्दर्शक

अंतिम फेरीसाठी
अधिक तयारी करू
ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट एकांकिका म्हणून आमच्या एकांकिकेचा झालेला गौरव हा आनंददायी आहे. मात्र महाअंतिम फेरीसाठी अनेक महाविद्यालयांकडून दर्जेदार एकांकिका सादर होतील, त्यामुळे अंतिम स्पर्धेतसुद्धा नाव कोरायचे आहे. त्यामुळे जय्यत तयारी करू.
– ओंकार जयवंत
(मित्तर, दिग्दर्शक), ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

उत्तम आयोजन
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी होण्याचे पहिलेच वर्ष होते. खूप चांगला अनुभव मिळाला. स्पर्धेचे आयोजन उत्तम केलेले असल्याने एकांकिका स्पर्धेसाठी स्पर्धकांना रंगमंचामागे जी धावपळ करावी लागते त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही.
– निकिता घाग, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

‘लोकसत्ता’चे आभार
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या लोकांकिका स्पर्धेमुळे एवढय़ा मोठय़ा रंगमंचावर कला सादर करता आली. ‘लोकसत्ता’ने लोकांकिकेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक आभार. संपूर्ण एकांकिकेमध्ये काही मिनिटांची माझी भूमिका होती, त्यात उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. त्यामुळे खूप आनंद होत आहे.
– कल्याणी साखळणकर
(उत्कृष्ट अभिनेत्री, मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
बक्षिसाचे श्रेय दिग्दर्शकाचे
एकांकिकेतील ज्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता हे बक्षीस मिळाले त्याचे श्रेय दिग्दर्शकाचे आहे. त्याने माझ्याकडून ही भूमिका करवून घेतली त्यामुळे तालमींमध्ये आत्मविश्वास वाढला. एकंदरीत लोकांकिकेचे आयोजन उत्तम होते, त्यामुळे स्पर्धा करताना आनंद घेता आला.
– प्रफुल्ल गुरव, (उत्कृष्ट अभिनेता, मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे