उद्यापासून ठाण्यात ‘मार्ग यशाचा’; विद्यार्थ्यांना करिअर सल्ला वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी ‘नीट’मधून सुटका झाली असली तरी पुढील वर्षी विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंका-कुशंकांचे निरसन करून भविष्यात या परीक्षेच्या दृष्टीने कशी तयारी करावी, ही सामायिक प्रवेश परीक्षा नेमकी कशी असणार आहे या आणि अशा अनेक बाबींचे मार्गदर्शन २५ व २६ मे रोजी ठाण्यात पार पडणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात केले जाणार आहे. याचबरोबर दहावी, बारावी आणि पदवीनंतर विविध शाखांमध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबाबतचे मार्गदर्शनही या कार्यक्रमात केले जाणार आहे. ठाण्यातील ‘टिपटॉप प्लाझा’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. राजेद्र बर्वे, साहित्यिक आणि डॉ. आनंद नाडकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ हरिश शेट्टी यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तींकडून करिअरच्या नवनव्या संधींविषयी विद्यार्थ्यांना जाणून घेता येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत विकसित होत असलेल्या करिअरच्या संधींची ओळख करून देणे, त्यातली आपण आपली वाट कशी निवडावी याची जाण करून देणे आणि या सगळ्याबरोबरच सद्य:स्थितीत जो ‘नीट’ परीक्षेविषयी अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे त्याची नेमकी माहिती देऊन पुढच्या वर्षीच्या ‘नीट’ची तयारी कशी असावी, या सर्वाविषयीची माहिती एकाच छताखाली विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमामुळे मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे हे उद्घाटन करतील. त्यानंतर ‘लोकसत्ता’मधील ‘मनमोराचा पिसारा’ या सदराद्वारे घराघरांत पोहोचलेले डॉ. राजेंद्र बर्वे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कला, वाणिज्य आणि ललित कला या क्षेत्रांतील करिअरच्या वाटा दाखवण्यासाठी दीपाली दिवेकर, चंद्रकांत मुंडे आणि जयवंत कुलकर्णी हे वक्ते दोन्ही दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर विज्ञान शाखेतील नव्या वाटांची ओळख करून देण्यासाठी २५ मे रोजी श्रीकांत शिनगारे आणि २६ मे रोजी विवेक वेलणकर उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन डॉ. आनंद नाडकर्णी करणार असून या दिवशी मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक हरीश शेट्टी यांचे अनोखे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रवेशिका येथे मिळतील ‘अॅमिटी युनिव्हर्सिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय ‘युक्ती’ तसेच पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन’, ‘अरेना अॅनिमेशन’, ‘एन. ए. एम. एस. शिपिंग मॅनेजमेंट प्रा. लि.’, ‘पारुल युनिव्हर्सिटी’, ‘गणपत युनिव्हर्सिटी’, ‘रोबोमेट’ आणि ‘सास्मिरा’ आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत. कार्यक्रमाची पन्नास रुपये शुल्काची प्रवेशिका टिपटॉप प्लाझा, लोकसत्ता ठाणे कार्यालय आणि in.bookmyshow.com संकेतस्थळावर उपलब्ध असतील. तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. राजेंद्र बर्वे दीपाली दिवेकर, चंद्रकांत मुंडे आणि जयवंत कुलकर्णी (२५ आणि २६ मे) श्रीकांत शिनगारे (२५ मे) विवेक वेलणकर (२६ मे) कधी? बुधवार, २५ मे आणि गुरुवार, २६ मे रोजी कुठे ? टिपटॉप प्लाझा, ठाणे