‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ३१ मे, १ जून रोजी प्रभादेवीत; बारावीनंतर काय, यावर मार्गदर्शन
आपला पाल्य साधारण आठवी-नववीत गेल्यावर पालकांना ‘करिअर’ हा शब्द सतावू लागतो. आपल्या पाल्याला कोणते करिअर आवडेल, असा पालकांना प्रश्न पडतो तर आपण निवडलेले करिअर पालकांना आवडेल का याची पाल्याला काळजी वाटत असते. अशा वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. म्हणूनच ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित केली आहे. ३१ मे आणि १ जून रोजी ही कार्यशाळा सकाळी ९ ते ५ या कालावधीत रविंद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे.
करिअरच्या मळलेल्या वाटांसोबतच वेगळ्या वाटांची ओळखही या कार्यशाळेतून होणार आहेत. त्यामुळेच या कार्यशाळेमध्ये निरनिराळे तज्ज्ञ निरनिराळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तर अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘जेईई’ ही परीक्षा द्यावी लागते. पण या परीक्षांची योग्य माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याचा एक बागुलबुवा तयार झाला आहे. या परीक्षांमध्ये कसे यश मिळवावे, त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक अभ्यासाच्या युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतील.
अभ्यासाचा ताण, वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा हे सगळे सांभाळताना विद्यार्थ्यांची दमछाक होते. यातून बाहेर कसे पडायचे याविषयी कानमंत्र देतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. राजेंद्र बर्वे. खेळाडू असण्यापलीकडे खेळामध्ये काय करिअर आहे याबद्दल नीता ताटके आणि वर्षां उपाध्ये या क्रीडातज्ज्ञ माहिती देतील. आरजे आणि आवाजाच्या क्षेत्रातील करिअरसंधींबद्दल आरजे रश्मी वारंग बोलतील. तर जाहिरात क्षेत्रातील करिअरबद्दल या क्षेत्रातील उच्चपदस्थ अभिजित करंदीकर माहिती देतील.
आवडीचे करिअर म्हणजे नेमके काय? मग ते निवडायचे कसे? याविषयी करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दहावी-बारावीनंतरच्या संधी तसेच उच्चशिक्षणाच्या वाटा याबद्दलही ते मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय आणि वक्ते असतील. तसेच सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
प्रवेशिका कुठून मिळवाल?
* सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात खालील ठिकाणी प्रत्येक दिवसाचे ५० रु. इतके शुल्क भरून प्रवेशिका मिळतील.
– लोकसत्ता कार्यालय – दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
– रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी
– विद्यालंकार क्लासेस -विद्यालंकार हाऊस, प्लॉट नं. ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व)
* यासोबत ऑनलाइन प्रवेशिकाही उपलब्ध आहेत.
https://www.townscript.com//e/loksatta-marga-yashacha-mumbai-001230
प्रायोजक
अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई हे या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत. तर विद्यालंकार आणि एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे हे असोसिएशन पार्टनर असून ‘सपोर्टेड बाय’चे पार्टनर्स आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स आहेत. युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, लक्ष्य अकॅडमी, अरेना अॅनिमेशन, आदित्य ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, आयडीईएमआय, मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूटस, रिलायन्स एज्युकेशन, सासमिरा, श्रीनिवासन्स आयआयटी अॅकॅडमी हे या कार्यशाळेचे ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ आहेत.