समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी विश्वात्म भावाने आयुष्य वेचणाऱ्या, माणूस म्हणून वावरताना जे अनुभवले त्याची सांगड घालत आपल्या कर्तृत्वाचा आलेख लिहिताना भोवतालच्या समाजमनाची स्पंदने टिपणाऱ्या नवदुर्गाचे कर्तृत्व राजकीय स्त्री शक्तींसाठी उर्जा देणारे ठरले, असा सूर ‘लोकसत्ता शोध नवदुर्गाचा २०१७’ कार्यक्रमात उमटला. शुक्रवारी शोध नवदुर्गाचा २०१७ या कार्यक्रमात सध्याच्या राजकीय स्त्री शक्तीने सामाजिक दायित्वासाठी झटणाऱ्या स्वयंसिद्धांना सन्मानित केले, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली हे नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले.

प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात नवदुर्गाचा सोहळा रंगला. राज्यभरातील नऊ दुर्गाना राजकीय क्षेत्रातील स्त्री शक्तीने सन्मानित केले. ‘शोध नवदुर्गाचा २०१७’ या उपक्रमातील यंदाच्या दुर्गाचा सत्कार महिला व बालविकास आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री व आमदार वर्षां गायकवाड, आमदार प्रणिती शिंदे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, विधान परिषद आमदार अ‍ॅड. हुस्नाबानू खलिफे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला.

gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघा सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री पुरुष समानतेचे उदाहरण
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘शोध नवदुर्गाचा’ हा उपक्रम सुरू करण्यामागची संकल्पना मांडली. नवरात्रौत्सवात केवळ रंगाच्या दिखाव्यापणात अडकण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजात विधायक काम करणाऱ्या स्त्रियांना अभिवादन करण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू केला, असे कुबेर यांनी सांगितले.

‘लोकसत्ता नवदुर्गा’चे कार्य हे समाजासाठी स्फूर्तीदायक असून त्यांच्या कर्तृत्वाने अनेकजणांचा प्रवास तिमिरातूनी तेजाकडे झाला आहे, असे चतुरंगच्या फीचर एडिटर आरती कदम म्हणाल्या.

या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील स्त्री शक्तींनी नवदुर्गाशी संवाद साधला. त्यांच्या कार्यामागील प्रेरणा समजावून घेतली. यावेळी राज्यभरातील नऊजणींचा सत्कार केला.

या कार्यक्रमाला केसरीचे केसरीभाऊ  पाटील व सुनीता पाटील, देना बँकेचे तपनदास, वृषाली कांबळी, आरसीएफचे दिलीप चव्हाण, बेडेकरच्या जयलक्ष्मी बडेकर-भुजंग, निर्लेपचे अक्षय कुलकर्णी उपस्थित होते.

महिला आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र नसल्याने तिच्या विकासाला मर्यादा येतात. तिचे उत्पीडन होते. तेव्हा समाजातील लिंगभेद, अंधश्रद्धा या सारख्या महिषासुरांचे मर्दन करण्यासाठी अशक्त स्त्रियांना स्त्रियांनीच मदतीचा हात देणे गरजेचे आहे. ‘लोकसत्ता’च्या शोध नवदुर्गाच्या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांची जिद्द पाहून कामाची उर्जा मिळाली.

– पंकजा मुंडे, महिला व बालविकास आणि ग्रामविकास मंत्री

*******

या नवदुर्गाचा शोध घेताना लोकसत्ता चमूने केलेल्या अविरत कष्टाची कल्पना येत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे खेडय़ापाडय़ात काम करणाऱ्या स्त्रियांच्या कामाला जनतेसमोर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. समाजामध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले असताना स्वत:हून ते सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या या स्त्रियांनी जगापुढे आदर्श ठेवला आहे.

– मुक्ता टिळक, पुणे महापौर

******

‘लोकसत्ता’चा शोध नवदुर्गाचा उपक्रम स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रोत्साहन देणारा, उर्जा देणारा आहे. समाजात अशा अनेक दुर्गा घडण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजचे आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरी भागामधील सामाजिक कामांना आर्थिक हातभार देण्याकडे अनेक कंपन्यांचे प्राधान्य असते. तेव्हा गावपातळीवरील सामाजिक कामांनाही आर्थिक मदत देण्यासाठी या कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असे मी आवाहन करते.

– प्रणिती शिंदे, आमदार

******

नवदुर्गामधील काही स्त्रिया या पुरेसे शिक्षण नसूनही अडचणींवर मात करत पुढे आल्या आहेत. तेव्हा इतर स्त्रियांना असा संघर्ष करावा लागू नये यासाठी सर्वाना शिक्षणाची सोय मिळणे गरजेचे आहे. लोकसत्ताच्या माध्यमातून अशाच पद्धतीने स्त्रियांच्या काम समाजापर्यत पोहोचत राहणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्यांच्यासारख्या अनेत स्त्रियांना कामाची उर्जा मिळेल.

– अ‍ॅड. हुस्नाबानू खलिफे, विधान परिषद आमदार

******

नवदुर्गाच्या प्रयत्नांच्या प्रवासाचा हा सन्मान आहे. वारकरी पंढरपूरच्या यात्रेला निघाल्यानंतर जसे गावगावचे सांगाती त्यांचा सन्मान करुन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत असतात. तसे या ठिकाणी लोकसत्ता माध्यम हे सांगातीचे काम करत आहे. या पालखीमध्ये नवदुर्गा बसल्या असून आम्ही त्यांच्या पालखीचे भोई झालो आहोत, याचाच आम्हाला सन्मान आहे.

– नीलम गोऱ्हे, शिवसेना आमदार

******

नवदुर्गाच्या या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे वयाची मर्यादा नाही, कामाच्या उंचीची सीमा नाही. केवळ आकाशात झेप घेण्याची तयारी असणाऱ्या स्त्रीच्या कर्तृत्त्वाला सलाम करणे हाच एक उद्देश आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रापासून ते पक्ष्यांचे जतन करण्याच्या क्षेत्रापर्यत सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. समजातल्या या नवदुर्गा आणि आम्ही एकाच क्षेत्रात काम करत आहोत.

– वर्षां गायकवाड,माजी मंत्री व आमदार