साहित्य क्रांती करू शकते

नाटकाचे यश हे भाषेवर अवलंबून नाही तर त्या नाटकातील संघर्षांवर ते अवलंबून असते.

वक्तृत्व कलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या लोकसत्ता वक्ता दशसहस्रषुया उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या भाषणातील काही उतारे तसेच वक्तृत्वकलेसंदर्भातील त्यांचे विचार येथे क्रमश: सादर केले जाणार आहेत. पहिले भाषण लेखक, नाटककार, संपादक, झुंजार वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे. पुणे येथे उभारण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणातील काही भाग..

कला वक्तृत्वाची; आचार्य प्र. के. अत्रे

आजपर्यंत मी काही कमी मानसन्मान नाही मिळविले. परंतु त्या सर्व सन्मानापेक्षा आज माझ्या थोर गुरूंचा पुतळा माझ्या हातून उघडला जात आहे हा सन्मान अनन्यसाधारण आहे. (टाळ्या) मोक्ष प्राप्त करून देणारी आणि अमृताचा वर्षांव करणारी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली गेली. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’ असे खडे बोल तुकोबांनी मराठीतच सांगितले. तुकाराम हे महाराष्ट्रातील युगप्रवर्तक लोकगीतकार होते. ‘धटासी असावे धट उद्धटासी उद्धट’ ही मराठी शिकवण समर्थ रामदास स्वामी यांनी दिली. ‘एक पाय सदैव तुरुंगात ठेवून लोकशिक्षणासाठी आम्ही हातात लेखणी धरली’ असे सांगणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेला सामथ्र्यवान केले तर राम गणेश गडकरी यांनी तिला सौंदर्यवान केले.

एखादा वीर योद्धा जसा लढता लढता रणांगणी पडतो तसे गडकरी वीराच्या मरणाने मेले. ‘भावबंधन’चा शेवटचा प्रयोग लिहून त्यांनी लेखणी खाली ठेवली आणि अवघ्या तीस मिनिटांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘एकच प्याला’ हे त्यांचे लोकप्रिय नाटक मरणोत्तर प्रसिद्ध झाले. प्रत्येक कवितेत किंवा प्रत्येक लेखनात एक शब्द, एक कल्पना, एक भावना अगदी नवीन असलीच पाहिजे, अशी त्यांची प्रतिज्ञा असे व त्याप्रमाणेच ते लिहीत असत. कवितेखाली त्यांचे नाव नसले तरी त्या कवितेच्या ढंगावरून ती गडकऱ्यांचीच असली पाहिजे असे ओळखू येत असे.

नाटकाचे यश हे भाषेवर अवलंबून नाही तर त्या नाटकातील संघर्षांवर ते अवलंबून असते. नुसती भाषा चांगली पण नाटकात कुठेही खटका नसेल, संघर्ष नसेल तर ते नाटक कोणीही पाहण्यास येणार नाही. प्रेक्षकांच्या हृदयाची पकड कशी घ्यावी हे गडकरी चांगलेच ओळखत आणि म्हणूनच त्यांची नाटके लोकप्रिय ठरली. कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोद क्षेत्रातील गडकऱ्यांचे गुरू होते. कोल्हटकर यांच्या विनोदाचे सौंदर्य गडकऱ्यांनी अधिक खुलवून सांगितले. गडकऱ्यांचा विनोद सामाजिक होता. समाजसुधारणेसाठी त्यांनी विनोदाचा उपयोग केला.

साहित्य ही शक्ती आहे. त्याबाबत वाद करण्याची आवश्यकता नाही. राज्यकर्ते आणि साहित्यिक यांचे कार्य समान आणि परस्परावलंबी आहे. साहित्य क्रांती करू शकते. जगात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत. काही राज्यकर्ते हे कार्य कायद्याच्या जोरावर करू पाहतात, पण कायद्याने माणूस सुधारत नाही. त्यासाठी त्याचे हृदय पकडावे लागते. समाजाची नीती कायद्याने सुधारता येत नाही. महाराष्ट्राची परंपरा ज्ञानेश्वरांची आहे. समाजवादी महाराष्ट्र संपन्न करायचा म्हटल्यास अन्य गोष्टींबरोबरच सुवाङ्मयाची, चांगल्या साहित्याची आवश्यकता आहे. गडकऱ्यांसारखे साहित्यिक ते काम करू शकतील..

 

प्राथमिक फेरी 

 • मुंबई- २९ जानेवारी
 • पुणे- १ फेब्रुवारी
 • अहमदनगर- १ फेब्रुवारी
 • नाशिक- २ फेब्रुवारी
 • औरंगाबाद- २, ३ फेब्रुवारी
 • रत्नागिरी- ४ फेब्रुवारी
 • नागपूर- ४ आणि ५

 

प्राथमिक फेरीसाठीचे विषय

 • माझ्या मनातले साहित्य संमेलन
 • माझी देशभक्ती ल्ल व्हॉट्सअ‍ॅप
 • सैराट आणि समाज
 • माझे खाद्यजीवन

अत्रे उवाच..

 • महाराष्ट्र संपन्न करण्यासाठी चांगल्या साहित्याची गरज
 • समाजाची नीती कायद्याने सुधारता येत नाही
 • जगात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत
 • प्रत्येक लेखनात एक शब्द
 • नवीन असायलाच हवा

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को. ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’

सविस्तर तपशील

indianexpress-loksatta.go-vip.net/vaktrutva-spardha-2017/

संकलन –  शेखर जोशी (परचुरे प्रकाशन मंदिर प्रकाशित आणि स. गं. मालेश संपादित हशा आणि टाळ्याया पुस्तकावरून साभार)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta oratory competition

ताज्या बातम्या