शान्ता शेळके जन्मशताब्दीनिमित्त काव्योत्सव

‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन

(संग्रहित छायाचित्र)

शान्ता शेळके यांचे सहजसुंदर आणि तरल असे सर्जनाचे गीत म्हणजे अवघ्या मराठीजनांच्या काळजातले अज्ञात प्रदेश. कविता आणि गीत या प्रकारातील अंतरच पुसून टाकणाऱ्या शान्ताबाईंनी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या जगण्यातल्या अनेक प्रसंगांमध्ये साथ दिली आहे. यंदाचे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे. यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘कविता मनोमनी’ हा कवितांचा उत्सव आयोजित केला आहे.

या काव्योत्सवात कविता या साहित्यप्रकारावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वाना सहभागी होण्याचे आवर्जून आवाहन करण्यात येत आहे. ‘हलके हलके दिसत आहेत मला, पावलांखाली नव्याच वाटा आतबाहेर सर्वभर’ हा शान्ताबाईंचा अनुभव घेतलेल्या कवींना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची ही एक अपूर्व संधी आहे.

आयुष्यात एकदा तरी कवितेच्या प्रदेशात हिंडून आलेल्यांची संख्या अफाटच असेल. मनाच्या अगदी आतलं व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला पहिला आधार असतो तो कवितेचाच. अशी कविता प्रत्येकासाठी जीवनभराची सखी असते. जगण्याच्या अनेक प्रसंगांत तिची सोबत, जगणे सुंदर करणारी असते. शान्ताबाईंच्या कविता प्रत्येक मराठी भाषकासाठी म्हणूनच अगदी जवळच्या.

‘जाईन विचारीत रानफुला, भेटेल तिथे गं, सजण मला’ अशी खात्री असलेल्या शांताबाई आपल्या दु:खालाही समजावणीच्या सुरात सांगतात..

‘दु:ख समंजस माझे,

नाही फिरविले द्वाही

कधी आले आणि गेले

मला कळलेही नाही

उरे पुसटशी खूण

फक्त फिकट चांदणे

फक्त मंदावले ऊन’

मनाच्या आतल्या कप्प्यांत लपवून ठेवलेल्या अशा भावभावना अटळपणे व्यक्त करण्यासाठी केवळ कवितेचाच आधार घेणारी नवी पिढी हे शांताबाईंच्या कवितेचे खरे यश.

या कवितांच्या उत्सवात सहभागी होणे, हाही शांता शेळके यांना केलेला सलामच. ज्या प्रदेशात कवितेचे पीक भरभरून येते, त्याची संस्कृती अधिक प्रगल्भ असते, हे सिद्ध करण्याचीही हा कवितांचा उत्सव म्हणजे एक नामी संधीच.

मराठीतील नामांकित कवींच्या मंडळाला आवडलेल्या यातील निवडक कविता ‘लोकसत्ता’च्या वाचकांनाही वाचायला मिळतीलच.

कवींना आवाहन..

कविता स्वत:चीच असावी आणि

कोणत्याही माध्यमांत प्रसिद्ध झालेली नसावी. या कवितांच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी आपली कविता नाव, पत्ता, वय आणि मोबाइल क्रमांकासह पुढील ई-मेल पत्त्यावर ७ मार्चपर्यंत पाठवावी.

Loksatta.KavitaManomani@gmail.com

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ प्रस्तुत या उपक्रमाचे प्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta poetry festival on the occasion of shanta shelke birth centenary abn

ताज्या बातम्या