मुंबई : समाजमनातील चेतना जागृत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चाहुलीने सध्या राज्यभरात चैतन्य संचारले आहे. श्रीगणेशाच्या आगमनाने सृष्टी चैतन्याने भारून जात असतानाच समाजातल्या सकारात्मकतेचा गौरव करण्याचे हेच दिवस. व्रतस्थ भावनेने समाजात बदल घडवणार्‍या संस्थांच्या कर्तृत्वाचा दातृत्वाशी संयोग घडवून आणणार्‍या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमालाही यानिमित्ताने सोमवारपासून सुरुवात होत आहे.

साहित्य, संस्कृती, विज्ञान-संशोधन, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांत निरपेक्ष भावनेने काम करताना शोषित, वंचित, गरजू घटकांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या संस्थांच्या कार्याचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून करून देण्यात येतो. तसेच या संस्थांचे हात बळकट करण्यासाठी आवाहनही करण्यात येते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मांडण्यात येणारी ही गौरवमालिका वाचून शेकडो वाचक सढळ हस्ते या संस्थांना देणगी देतात. गणेशोत्सवापासून जवळपास महिनाभर चालणार्‍या या दानोत्सवात जमा होणारी देणगी संबंधित संस्थांना सुपूर्द करण्यात येतात. गेल्या १५ वर्षांपासून जवळपास दीडशेहून अधिक संस्थांना ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून केवळ आर्थिक बळच नव्हे तर कौतुक आणि प्रोत्साहनही मिळाले. या उपकमाचे यंदा सोळावे पर्व. या उपक्रमाला बँकिंग पार्टनर म्हणून ‘कॉसमॉस को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड’ यांचे सहकार्य लाभले आहे.

यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा असल्यामुळे ‘सर्वकार्येषु’मधून बारा संस्थांच्या कार्याची ओळख वाचकांना मिळेल. या संस्थांचे पत्ते, तेथे जाण्याचा मार्ग तसेच या संस्थांना आर्थिक मदत कशी करायची याचा तपशीलही पुरवण्यात येईल. त्याआधारे या संस्थांच्या कार्याला आर्थिक हातभार लावण्याची संधी दात्यांना लाभेल. या उपक्रमात सहभागी होणार्‍या सर्व संस्थांना दिलेल्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ‘८० जी’नुसार करसवलतीस पात्र असतात.

‘सामाजिक उत्तरदायित्वाची बांधिलकी’ ; ‘कॉसमॉस’चे अध्यक्ष सचिन आपटे यांचे प्रतिपादन

समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी निस्वार्थ वृत्तीने झटणार्‍या सेवाभावी संस्था आणि त्यांना हातभार लावू इच्छिणारे संवेदनशील नागरिक यांच्यातील दुवा ठरणार्‍या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाशी बँकिंग पार्टनर म्हणून जोडले जाणे, ही कॉसमॉस बँकेसाठी सामाजिक उत्तरदायित्वाची कृतज्ञतापूर्वक बांधिलकी आहे, असे प्रतिपादन कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे यांनी केले.

गेल्या शतकभराहून अधिक काळ सहकार तत्त्वावर कार्यरत असलेली कॉसमॉस बँक ‘सहकारातून समाजविकास’ या मूल्यावर सातत्याने काम करत आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातील बँकिंग सहकार्याबद्दल भूमिका मांडताना सचिन आपटे म्हणाले,‘दुर्गम भागातील शिक्षण, आरोग्य, दिव्यांग पुनर्वसन, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांत तळागाळात काम करणार्‍या दीपस्तंभांना पाठबळ देणे ही काळाची गरज आहे.

वाचकांकडून दिला जाणारा प्रत्येक रुपया सुरक्षितपणे आणि पारदर्शक रीतीने संबंधित संस्थांपर्यंत पोहोचावा, यासाठी बँकेचे संपूर्ण तंत्रज्ञान व शाखांचे जाळे तत्परतेने सेवा देत आहे.’ दुर्गम भागातील शिक्षण, आरोग्य, अपंग पुनर्वसन, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांत तळागाळात काम करणार्‍या दीपस्तंभांना पाठबळ देणे ही काळाची गरज आहे. वाचकांकडून दिला जाणारा प्रत्येक रुपया सुरक्षितपणे आणि पारदर्शक रीतीने संबंधित संस्थांपर्यंत पोहोचावा, यासाठी बँकेचे संपूर्ण तंत्रज्ञान व शाखांचे जाळे तत्परतेने सेवा देत आहे. – सचिन आपटे, अध्यक्ष, कॉसमॉस बँक