‘पर्यावरणस्नेही गणेशोत्सवा’साठी ‘लोकसत्ता’तर्फे आज परिसंवाद

विविध मंडळांमधून गणेशोत्सवादरम्यान वाजवण्यात येणारी गाणी, ऑर्केस्ट्रा यामुळे ध्वनिप्रदूषणाची समस्याही निर्माण झाली आहे.

सामाजिक प्रबोधनाचे माध्यम म्हणून सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे आताचे स्वरूप पाहता भक्तांच्या मनात मांगल्य असले तरी आजूबाजूच्या वातावरणातील-उत्सवातील मांगल्य हरवत चालले आहे. गणेशोत्सवाच्या काळातील पाण्याचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ‘पर्यावरणस्नेही गणेशोत्सवा’ची संकल्पना लोकांच्या मनात रुजवण्याची गरज असून त्यासाठी ‘लोकसत्ता’ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने बुधवार ३० जुलै रोजी ‘पर्यावरणस्नेही गणेश उत्सव संकल्प अभियान – २०१४’ हा विशेष परिसंवाद आयोजिला आहे.
गणेशोत्सव सगळीकडे थाटामाटात आणि मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, मोठय़ा प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात गणरायाच्या विविध आकारांतील मूर्ती बनवण्यासाठी केला जाणारा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रचंड वापर, रासायनिक रंग यामुळे प्रदूषणाची समस्याही उग्र होत चालली आहे. याशिवाय, विविध मंडळांमधून गणेशोत्सवादरम्यान वाजवण्यात येणारी गाणी, ऑर्केस्ट्रा यामुळे ध्वनिप्रदूषणाची समस्याही निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती मोठय़ा संख्येने उपलब्ध करण्याबरोबरच आणखी काय उपाय योजता येतील यावर पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करणारे मूर्तीकार, गणेशमूर्तीचे वितरक आणि सावर्जनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी ‘पर्यावरणस्नेही गणेश उत्सव संकल्प अभियान – २०१४’ या परिसंवादात विचारविनिमयासाठी एकत्र येणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. यात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
नावातच ‘मंगलमूर्ती’ असलेल्या श्रीगणेशाच्या आगमनामुळे वातावरणात पावित्र्य येण्याऐवजी पर्यावरणाचे आणि पर्यायाने सामाजिक प्रश्नांचे मोहोळ उभे राहू लागले असल्याने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘पर्यावरणस्नेही गणेश उत्सव संकल्प अभियान-२०१४’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या विचारांची मुहूर्तमेढ रोवण्याच्या दृष्टीने ‘लोकसत्ता’ने पहिले पाऊल टाकले आहे.
या कार्यक्रमाला ‘झी २४ तास’ टेलिव्हिजन पार्टनर असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याकरता mpcb.ecobappa@gmail.com या ईमेलवर पूर्वनोंदणी करता येईल. तसेच सहभागासाठी संपर्क – संजय भुस्कुटे (९८६९ ४४० १८५), महेश चव्हाण (९७०२ ९२४ १८९), श्रीकला कासरगोड (९९६७ ३९९ ५८७).

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta seminar environment fraindly ganesh festival