‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळ्याचे ‘एबीपी माझा’वर आज प्रसारण

तरुण वयात आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाने लखलखणाऱ्या महाराष्ट्रातील १४ प्रज्ञावंत, गुणवंत तेजांकितांचा सन्मान सोहळा असलेला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रम नुकताच पार पडला. तरुण तेजांकितांचा सन्मान, त्यासाठी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांची लाभलेली प्रमुख उपस्थिती, विविध क्षेत्रांतील मान्यवर असा ज्ञान-विज्ञान-कला प्रतिभेचा उत्कृष्ट मिलाफ साधणारा हा सोहळा आज, रविवारी ‘एबीपी माझा’ वाहिनीवर दुपारी ४ वाजता प्रसारित होणार आहे.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. या उपक्रमांतर्गत प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या, पण आपापल्या क्षेत्रात अथकपणे काम करणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या तरुणाईला हेरून त्यांचा सन्मान करण्यात आला. बहुआयामी गणितज्ञ अपूर्व खरे, क्रीडा क्षेत्रातील लक्ष्यवेधी सुवर्णकन्या राही सरनोबत, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणारी कृपाली बिडये, अस्थिरुग्णांसाठी तारणहार म्हणून ओळखला गेलेला नवउद्यमी निलय लाखकर, जनहितैषी वकील युवराज नरवणकर, फॉरेन्सिक लेखा परीक्षक अपूर्वा जोशी, पथदर्शक संशोधक रोहित देशमुख, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेला नवउद्यमी ऋषिकेश दातार, विज्ञानप्रसाराची धुरा घेणारा अनिकेत सुळे, उपेक्षितांसाठी कार्य करणारा विकास पाटील, प्रतिभावान ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्याबरोबरच बहुपेडी कलाकार म्हणून लेखक, अभिनेता चिन्मय मांडलेकर, चतुरस्र अभिनेत्री नंदिता पाटकर आणि संवेदनशील कलाकार जितेंद्र जोशी अशा १४ तरुण तेजांकितांचा सन्मान या वेळी करण्यात आला.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चा हा दिमाखदार सोहळा सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला.

अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर ‘खयाल-ए-जॅझ प्रोजेक्ट’ या अनोख्या संगीत कार्यक्रमाने सर्वानाच ठेका धरायला भाग पाडले. या कार्यक्रमाचे आणखी वैशिष्टय़ होते ते म्हणजे प्रसिद्ध गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी डॉ. काकोडकर आणि पं. कशाळकर यांच्याशी साधलेला संवाद. कला आणि विज्ञान यांचा सुंदर मिलाफ या संवादातून अनुभवता आला. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे हे गौरवशाली आणि रंगतदार क्षण रसिकांना ‘एबीपी माझा’ वाहिनीवरून अनुभवता येणार आहेत.

या उपक्रमाचे टायटल पार्टनर ‘केसरी टूर्स’असून ‘सारस्वत बँक’, ‘रुणवाल ग्रुप’ आणि ‘सिडको’ हे असोसिएट पार्टनर आहेत. तर पॉवर्ड बाय पार्टनर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ आणि ‘लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ हे आहेत. ‘पीडब्ल्यूसी’ हे या कार्यक्रमाचे नॉलेज पार्टनर असून ‘एमआयडीसी’ हे इव्हेन्ट पार्टनर, ‘परांजपे स्कीम’ हे रिअ‍ॅल्टी पार्टनर तर ‘एबीपी माझा’ टेलिव्हिजन पार्टनर आहेत.