मुंबई : विविध क्षेत्रांत स्वत:च्या कर्तृत्वाने लखलखणारे तरुण कधीकाळी धडपडत आणि जिद्दीने प्रवास करत आपल्या क्षेत्रात नवनिर्मिती करण्याबरोबरच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करतात. त्यांचा हा प्रवास खचितच सोपा नसतो. आपल्या कार्याच्या जोरावर समाजात आदर्श घालून देणार्या अशा धाडसी युवकांचा सन्मान करणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा मंगळवारी होणार आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि स्वरवाद्यांची मैफलही यानिमित्ताने रंगणार आहे. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचे मौलिक विचार यानिमित्ताने ऐकता येणार आहेत.
मंगळवारी होणार्या गौरव सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील २२ तेजांकितांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कार्यमग्न असणार्या या तेजांकितांच्या कार्याची दखल घेतली जाणार आहेच. मात्र, नवनिर्मिती करू इच्छिणार्या आणि भविष्यात सक्षम राष्ट्राची शक्ती ठरू पाहणार्या युवकांनाही यातून प्रेरणाही मिळणार आहे. तेजांकितांचा गौरव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. राष्ट्राच्या व्यापक हितासाठी परखड भूमिका घेऊन न्यायपालिकेच्या माध्यमातून उल्लेखनीय आणि नि:स्पृह कार्य करण्यासाठी अभय ओक ओळखले जातात. या प्रसंगी ते ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य – त्यांचे की आपले?’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार असून उपस्थितांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या कौतुक सोहळ्यात तरुणांच्या कार्याला दाद देण्यासाठी राज्यातील कला, मनोरंजन, राजकीय, उद्योग, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने ‘अमर बन्सी’ या सांगीतिक कार्यक्रमातून प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक आणि तबलावादक विक्रम भट आपल्या अनोख्या सादरीकरणातून हा गौरव सोहळा अधिक रंगतदार करणार आहेत.
आतापर्यंत शंभरावर गुणवंतांचा गौरव
प्रकाशझोतापासून दूर राहून कला, मनोरंजन, नवउद्यमी, विज्ञान, आरोग्य, प्रशासन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतून कार्य करणार्या तरुणांच्या कर्तृत्वाची दखल ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून दरवर्षी घेतली जाते. उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून याआधी १०० हून अधिक गुणवंतांचा सन्मान या उपक्रमातून करण्यात आला आहे. उत्तम कार्य करणारे आणि अभिनव उपक्रम राबविणार्या ज्ञानवंतांचा एक परिवारच ‘लोकसत्ता’ने मागील काही वर्षांत जोडलेला आहे.
