मुंबई : विविध क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना गौरविणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळा मंगळवारी, ३१ मार्च रोजी होणार आहे. बुद्धिमत्तेला अथक परिश्रम आणि नव्या प्रयोगांची जोड देत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या, इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणाऱ्या तरुण तेजांकितांचे कौतुक करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाक्षेत्रातील मातब्बर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी स्वरवाद्यांची अनोखी मैफलही रंगणार आहे.

देशाच्या व राज्याच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या राज्यभरातील युवा प्रज्ञावंतांना हेरून त्यांच्या कार्याची दखल घेण्याबरोबरच त्यांचा सन्मान ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या माध्यमातून केला जातो. काही युवक वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करून समाजाच्या आरोग्यासाठी आपले योगदान देत असतात तर काही युवक नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून नागरिकांना आर्थिकदृष्टया सक्षम करतात, तर विज्ञान क्षेत्रात अभिनव प्रयोग करणारे युवा संशोधक तरुणांना प्रोत्साहित करत असतात. यासह कला-मनोरंजन, कायदा- प्रशासन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत कार्यमग्न राहून व्यापक प्रमाणात प्रभाव पाडणारी ही युवा मंडळी आपल्या कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करतात. अशा ज्ञानवंत तरुणांची ओळख इतर तरुणांनाही व्हावी, तसेच त्यातून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तरुणांनी प्रेरणा घ्यावी हा ‘लोकसत्ता’चा या उपक्रमामागील उद्देश आहे.

आतापर्यंत शंभरहून अधिक ‘तेजांकितां’चा सन्मान करण्यात आला असून यंदा २२ तरुण प्रज्ञावंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि विशेषतः अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पर्यावरण ऱ्हास अशा मुद्द्यांवर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात परखड भूमिका मांडणाऱ्या अभय ओक यांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.

स्वरवाद्यांची मैफल

‘तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळ्याच्या निमित्ताने ‘अमर बन्सी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक आपली कला सादर करणार आहेत. या वेळी ओक यांना ख्यातनाम तबलावादक विक्रम भट साथ करणार आहेत. ‘अमर बन्सी’ या कार्यक्रमाची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून यात मराठीसह हिंदीतील गीतांचे स्वरवाद्याच्या साथीने केलेले सादरीकरण अनुभवता येणार आहे. शास्त्रीय संगीतातील तान अंग आणि गायकी अंग आदी शैलींचा कौशल्याने वापर करून होणाऱ्या सादरीकरणासाठी ओक ओळखले जातात. अमर ओक गेली अनेक वर्षे बासरीवादन करत असून त्यांना पं. सच्चिदानंद फडके आणि पं. सुधीर फडके यांसह अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘अमर बन्सी’ या कार्यक्रमातून रसिकांना बासरी आणि तबला वादनाची जादू अनुभवता येणार आहे.