मुंबई : नेहमीच्या ठरावीक दैनंदिन कार्यापलिकडे जाऊन वेगळा विचार करणाऱ्या तरुण पिढीच्या जिद्दीला, त्यांच्या परिश्रमाला योग्य वेळी दाद मिळाली, तर त्यांचा उत्साह अधिक वाढतो. म्हणूनच ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या माध्यमातून गेली सात वर्ष सातत्याने अशा समाजाभिमुख कार्य करणाऱ्या युवा रत्नांचा शोध घेत त्यांचे कौतुक केले आहे. यंदाही तरुण तेजांकितांचा शोध सुरू झाला आहे. राज्यभरातून पुरस्कारांसाठी अर्ज नोंदणीचा ओघ वाढला असून इच्छुकांना १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या माध्यमातून वेगळी वाट निर्माण करू पाहणाऱ्या, समाजाभिमुख कार्य उभारण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या युवा गुणवंतांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. ‘भविष्यानेही आशेने पाहावे, अशा वर्तमानाचा गौरव’ या तत्त्वाने सुरू करण्यात आलेल्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी यंदाही राज्यभरातून प्रवेश अर्ज येत आहेत. यावर्षी पुरस्कारांचे आठवे पर्व असून शहरी-ग्रामीण भागातील संशोधक, नवउद्योजक, प्रशासकीय अधिकारी, क्रीडापटू, तंत्रज्ञान, आरोग्य, मनोरंजन, कला सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांचा शोध घेण्यात येतो आहे.

प्रसिध्दीपासून दूर राहून आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे नवे मापदंड निर्माण करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारांसाठी राज्यभरातून प्रवेश अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. अधिकाधिक तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घेता यावा, यासाठी पुरस्कारांच्या प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत १६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी बरोबर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून किंवा http://tiny.cc/taruntejankit या संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी करता येईल.

प्रवेशअर्ज कसा भराल?

‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठीच्या निवड प्रक्रियेचे तपशील http://tiny.cc/taruntejankit या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून अर्ज ऑनलाइन भरून पाठवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर आपल्याभोवताली असणाऱ्या गुणवंत तरुण-तरुणींची नावे माहितीसह सुचवता येतील.

● ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व सिद्ध करणारे चाळिशीच्या आतील युवा गुणवंत या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील.

● पुरस्कार प्रक्रियेचा भाग होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अर्ज भरणे बंधनकारक आहे.

● आलेल्या प्रवेशिकांमधून मान्यवरांच्या स्वतंत्र समितीकडून विविध निकषांच्या आधारे ‘तरुण तेजांकितां’ची निवड केली जाईल.

● निवड झालेल्या प्रज्ञावंतांना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.