मुंबई : प्रत्येक पिढीत नव्याचा शोध घेणारे, आपल्या अभ्यास-संशोधनातून सध्याच्या समस्यांवर उत्तर शोधू पाहण्याचा प्रयत्न करणारे, नेहमीच्या कामातही सुसूत्रता आणण्यासाठी नवनव्या योजना आखणारे असे अनेक तरुण-तरुणी अवतीभवती कार्यरत असतात.

प्रसिद्धीपासून दूर राहत अभ्यास प्रयत्नांच्या बळावर आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे नवे मापदंड निर्माण करणार्या बुद्धिमान युवाजनांना गौरवणार्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या नव्या पर्वाचे पडघम वाजले आहेत. या पुरस्कारांसाठी प्रवेश अर्जांची नोंदणी सुरू झाली आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, धोरणे, राजकारण व प्रशासन, उद्योजकता, व्यवसाय, सामाजिक कार्य, क्रीडा, कला, मनोरंजन आदी क्षेत्रांतील युवा पिढीचे कार्य समाजासमोर यावे आणि त्यांना पुरस्काराच्या रूपात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या आठव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात असलेल्या युवा गुणवत्तेला, नावीन्यपूर्ण काम करण्याच्या त्यांच्या जिद्दीला, समाजाभिमुख कार्य करण्याचे स्वप्न पाहात अत्यंत नेटाने ते तडीस नेण्याच्या त्यांच्या धडाडीला या पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते.

  • ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व सिद्ध करणारे चाळिशीच्या आतील युवा गुणवंत या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील.
  • पुरस्कार प्रक्रियेचा भाग होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अर्ज भरणे बंधनकारक आहे.
  • आलेल्या प्रवेशिकांमधून मान्यवरांच्या स्वतंत्र समितीकडून विविध निकषांच्या आधारे ‘तरुण तेजांकितां’ची निवड केली जाईल.

प्रवेश अर्ज कसा भराल?

पुरस्कारांसाठीच्या निवड प्रक्रियेचे तपशील http://tiny.cc/taruntejankit या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून अर्ज ऑनलाइन भरून पाठवणे बंधनकारक आहे. बरोबर दिलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करूनही अर्ज नोंदणी करता येईल.