प्रतिकूल परिस्थिती आणि अस्थिर भवितव्याचा झाकोळ सध्या जनमानसाला काळवंडून टाकत असताना काही ध्येयप्रेरित तरुण-तरुणी मात्र विचलित न होता विविध क्षेत्रांत नैपुण्य, सातत्य आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर विधायक योगदान देत असतात. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रम ही अशा निडर प्रज्ञावंतांची कहाणी. यंदा अशा २२ ऊर्जावंतांना गौरवण्यात आले.

१. सौरऊर्जेवरील ‘स्वामित्व’

डॉ. अभिजीत रमेश कदम

डॉ. अभिजीत रमेश कदम, ऊर्जा संशोधक

सौरऊर्जा आणि एलईडी बल्बच्या क्षेत्रातील संशोधक डॉ. अभिजीत रमेशराव कदम याने प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षणातील ध्येय गाठले. डॉ. अभिजित कदम सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण रोडवरील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. भौतिकशास्त्र विषयातून विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण आणि पुढे पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या अभिजितच्या नावावर ६४ संशोधन पत्रिका असून, त्याची दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. याशिवाय १४ संशोधन विषयांच्या स्वामित्व हक्कासाठी (पेटंट) प्रस्ताव पाठवण्यात आले असून, त्यातील १० प्रस्तावांना मान्यता आणि चार पेटंट प्रकाशितही झाली.रायगडच्या ओ. पी. जिंदाल शैक्षणिक संस्थेतून पीएच.डी. केलेला डॉ. अभिजित कदम हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील साप्ती गावचा. त्याचे प्राथमिक शिक्षण गावात, माध्यमिक शिक्षण हदगावातील विवेकानंद विद्यालयात तर उच्च माध्यमिक शिक्षण श्रीदत्त कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात झाले. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आज अभिजित नवीकरणीय ऊर्जेसारख्या कळीच्या क्षेत्रात यशस्वी ज्ञानदान करत आहे.

२. मुंबई क्रिकेटमधील नवा प्रज्ञावंत

आयुष म्हात्रे

आयुष म्हात्रे, क्रिकेटपटू

मुंबईतील शालेय क्रिकेटमधून अनेक दिग्गज खेळाडू घडले. त्याच परंपरेतून नालासोपारा येथे राहणाऱ्या आयुष म्हात्रेनेही मेहनत आणि जिद्दीने युवा क्रिकेटमध्ये कमाल दाखवली. आयुषच्या नेतृत्वाखाल भारताच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक उंचावला. आयईएस व्ही. एन. सुळे संघाकडून त्याने शालेय क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधले. पुढे १६ वर्षांखालील गटात संधी मिळाल्यावर आयुषने धावांचा डोंगर उभारला. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची नंतर मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. यावेळी एकाच हंगामात तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताच्या युवा संघात स्थान मिळविण्याचे त्याचे स्वप्न होते. सुरुवातीला संधी मिळाली नसली, तरीही हार न मानता त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर रणजी व इराणी संघातून कर्तृत्व दाखवले. यानंतर १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून आशिया चषक, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरे तसेच, ‘आयपीएल’पर्यंत त्याने मजल मारली. मुंबईकडून रणजी, तसेच मुश्ताक अली ट्वेन्टी-२० आणि विजय हजारे एकदिवसीय अशा सर्वच स्पर्धांत त्याने शतक साकारले. उपनगरात राहत असल्याने त्याचा दिनक्रम हा व्यग्र होता. नालासोपारा येथून रेल्वेने मोठा प्रवास करून सरावास जाणे हे त्याच्यासाठी नित्याचे होते. विशेष म्हणजे त्याच्या घरातून क्रिकेटची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही आयुषने चमकदार कामगिरी केली. मुंबई क्रिकेटच्या वैभवशाली परंपरेत आयुषच्या रूपाने आणखी एक नाव भारतीय संघाला मिळणार हे नक्की. त्याने शाळेपासूनच नेतृत्वगुण दाखवले होते. विराट कोहलीसारख्या युवा विश्वचषक विजेत्या कर्णधाराप्रमाणे आयुषकडूनही अपेक्षा बाळगता येतील अशीच त्याची आजवरची वाटचाल राहिली.

३. वेगळ्या वाटेवरील फिल्मकर्मी

ज्ञानेश झोटिंग

ज्ञानेश झोटिंग, लेखक तथा दिग्दर्शक

ज्ञानेश झोटिंग अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी चित्रपट आणि ओटीटी माध्यमातून लेखन आणि दिग्दर्शन करीत आहे. यात राक्षस (२०१८), कॉलर बॉम्ब (२०१२) आणि झी फाईव्हवर प्रदर्शित झालेला डेट विथ सई (२०१८) आणि सोनी लाईव्हवरील ‘पेट पुराण’ आदी चित्रपटात दिग्दर्शक आणि पटकथालेखक म्हणून त्याने योगदान दिले.

मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेशला लहानपणापासूनच कला क्षेत्राची आवडहोती. सुरुवातीला बालनाट्य स्पर्धांत तो सहभागी व्हायचा. पुढे सतीश आळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील ललित कला केंद्र येथे त्याने नाट्यशास्त्रात शिक्षण पूर्ण केले. त्याच्या विवर यालघुपटाला मुंबई आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळाला. राक्षस या चित्रपटाची प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. सध्या ज्ञानेश ऋषिकेश गुप्ते यांच्या दंशकाल या कादंबरीवर आधारित हिंदी वेबसिरीजचे लेखन व दिगदर्शन करीत आहे. अजंठा एलोरा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजन समितीतही तो कार्यरत आहे. त्याने आजवर अनेक वेगवेगळे विषय हाताळले. नवी शैली, नवे विषय तो मराठीत रुजवू पाहत आहे. लघुपटाच्या प्रसारासाठी आणि लघुपट करणारे दिग्दर्शक आणि कलाकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘चार्वाक’ संस्थेच्या माध्यमातून त्याने शॉर्ट फिल्म टूर हा प्रकल्प राज्यभर राबविला. चित्रपट महोत्सव आणि लघुपट महोत्सव हे शहरांपुरते मर्यादित न राहता गावात आणि खेड्यात जावेत, तेथील प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृती पाहता याव्यात यासाठी तो प्रयत्नशील असतो.

४. पाश्चात्य सुरावटींचा किमयागार

आशुतोष श्रीकांत सोहोनी

आशुतोष श्रीकांत सोहोनी, संगीतकार

भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य चित्रपट संगीतरचनेचा अभ्यासक असलेल्या आशुतोष श्रीकांत सोहोनी याने संगीतरचनाकार म्हणून कारकीर्द स्वीकारली. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या चेन्नईस्थित केएम म्युझिक कंझर्वेटरी आणि यूसीएलए एक्सटेंशन येथून संगीत शिक्षण घेतलेला आशुतोष भारतात राहून आंतरराष्ट्रीय चित्रपट, वेबमालिका यांच्यासाठी जागतिक दर्जाच्या संगीत रचना बनवतो. हॉवर्ड शोर, लॉर्न बाल्फ, डॉमिनिक शेरर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संगीतकारांबरोबर आशुतोष याने काम केले आहे. त्याचबरोबर, लॉस एंजेलिसमध्ये यूसीएलए एक्सटेंशनमध्ये शिकत असताना आशुतोषने एक्समेन, कॅप्टन अमेरिका या चित्रपटांचे संगीतकार हेत्री जॅकमन यांच्याकडे काम करण्याचा अनुभव घेतला. तंत्रज्ञानाच्या प्रभावातून निर्माण झालेले ओटीटीसारखे माध्यम, व्हिडिओ गेम्स, माहितीपट अशा तुलनेने नव्या माध्यमांवरील आशयासाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे संगीत देणे ही आशुतोषची खासियत आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिस्कव्हरी प्लस आणि अन्य आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्टर कंपन्यांचे माहितीपट, वेबमालिका, चित्रपट यासाठी आशुतोषने संगीत दिले आहे. संगीत क्षेत्रातील या संपूर्ण अशा नव्या प्रवाहात जगभरातील विविध प्रकारच्या संगीताची ओळख, भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया या शिदोरीवर आशुतोषने पाश्चिमात्य आशयाला अनुरूप अशा पद्धतीच्या सुरावटी तयार करण्याच्या या नव्या कार्यक्षेत्रात आपली सुरेल ओळख निर्माण केली आहे. आशुतोषला २०२२ आणि २०२३ मध्ये मार्क अॅवॉर्ड्स पीएमए वर्ल्ड ट्रॅक या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत निर्मितीसाठी त्याला २०२५ मध्ये लंडनमधील नामांकित प्रॉडक्शन म्युझिक अॅवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले.

५. अभिनयाला वैचारिकतेची जोड

पर्ण पेठे

पर्ण पेठे, अभिनेत्री

रंगभूमी, चित्रपट क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण, आश्वासक, सर्जनशील, विचारी अभिनेत्री म्हणून पर्ण पेठेने स्वतंत्र ओळख निर्माण केली. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ ती नाटक, चित्रपट अशा माध्यमांमध्ये वावरते आहे. महाविद्यालयात असतानाच फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक अशा स्पर्धांतून पर्णचा कला क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. अभिनय, दिग्दर्शन करत या स्पर्धांमध्ये पर्णने अनेक पारितोषिक मिळवली. महाविद्यालयात असताना तिने नाटक कंपनी, आसक्त या संस्थांसाठी प्रायोगिक नाटके केली. सत्यशोधक, आषाढातील एक दिवस, बेड के नीचे रहनेवाली, अडलंय का… अशा अनेक प्रायोगिक नाटकांत तिने अभिनय केला. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ग्रिप्स नाटकांमध्ये तिचा सहभाग होता. ‘A Friend’s Story’, ‘Bone of Contention’ आणि ‘Love You’ अशी इंग्रजी नाटकेही तिने केली. शांता गोखले यांच्या ‘Something Like Truth’ या हिंदी-इंग्रजी नाटकाचे दिग्दर्शन तिने केले. स्त्री, समता आणि स्वातंत्र्य यांवर भाष्य करणाऱ्या या नाटकाचे ३५ हून अधिक प्रयोग सादर झाले आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर अमर फोटो स्टुडिओ, चारचौघी, करुणाष्टके या नाटकांमधून पर्णचा अभिनय गाजला. रमा माधव या चित्रपटातून पर्णने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर फोटोकॉपी, मीडियम स्पायसी, वाय झेड, टेक केअर गुड नाइट, फास्टर फेणे, विषय हार्ड, अश्लील उद्योग मित्र मंडळ, आता थांबायचं नाय अशा अनेक चित्रपटांतून तिच्यातील संवेदनशील अभिनेत्रीचे दर्शन घडले. क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयातील शिक्षणाच्या आधारे ती मानसिक आरोग्य आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रातही सक्रिय आहे. युवकांच्या मानसिक आरोग्यावर आधारित ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ या वेब-मालिकेची निर्मिती तिने केली.

६. शेतकऱ्यांना भाव आणि सन्मानही

मयूर मच्छिंद्र पवार

मयूर मच्छिंद्र पवार, नवउद्यमी

शेतकरी कुटुंबातून आलेल्या मयूरला अल्पभूधारक शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांचा संघर्ष याची चांगली जाण आहे. ग्रामीण भागात गुणवत्तेची वानवा नाही. परंतु चांगली बाजारपेठ उपलब्ध नसणे ही मुख्य समस्या आहे. यातून त्याने विनग्रो अॅग्रिटेक इनोव्हेशन्स या कंपनीची स्थापना झाली. सध्या कंपनी पुणे आणि मुंबईतील ४७ आठवडी बाजारांमध्ये ती कार्यरत आहे. जवळपास ६ हजार ५०० शेतकरी, ३०० महिला बचत गट आणि खाद्यपदार्थ बनविणाऱ्या १ हजार ३०० महिलांना थेट शहरी ग्राहकांशी जोडण्याचे काम मयूरची कंपनी करीत आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने उत्पन्नात ३५ ते ४० टक्के वाढ होत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीने ग्रामीण उत्पादकांच्या माध्यमातून या बाजारपेठांमध्ये एकूण ४५० कोटी रुपयांची उलाढाल केली. ग्रामीण भागात आर्थिक सुधारणांचे हे पाऊल ठरत आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये छोटे व मध्यम शेतकरी, महिला बचत गट, महिला स्वयंउद्योजक आणि स्थानिक कृषी उत्पादने करणारे गट आहेत. याच वेळी शहरी भागात मध्यम व उच्च मध्यम वर्गातील ग्राहक आहेत. शहरी भागातील आरोग्याप्रति जागरूक असणारे ग्राहक ताजा, रसायनमुक्त शेतमाल पसंत करीत आहेत. ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी देण्याचा मयूरचा प्रयत्न असतो. आधी छोटे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी मध्यस्थांवर अवलंबून असायचे. याचबरोबर शेतमालाचे अस्थिर भाव ही मोठी समस्या होती. आता त्यांना थेट ग्राहकांशी जोडले गेल्याने भावही स्थिर मिळत आहेत. अनेक महिलांसाठी विनग्रो सखी मार्केट सुरू करण्यात आले असून, ते त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचे साधन बनत आहे.

७. नवोन्मेषी संगीतसेवेची भरारी

मानसी नचिकेत खासनीस

मानसी नचिकेत खासनीस, नवउद्यमी

‘बालगीत’ ही संकल्पना मानसीने २५ फेब्रुवारी २०२३ रोजी बाणेर येथे छोटेखानी स्वरूपात सुरु केली. लहान मुलांना संगीताची गोडी लावण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने शास्त्रीय दृष्टिकोनातून हा संगीत वर्ग डिझाईन केलेला आहे. बालगीत हा केवळ संगीतवर्ग नसून, १ ते ७ वयोगटातील मुलांच्या भाषिक, बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी तयार केलेला एक संस्कारक्षम प्रकल्प आहे. मराठी भाषेतील बालगीते आणि आपल्या अभिजात संगीत परंपरेचा प्रभावी वापर करून भाषेचे आणि एकाग्रतेचे संस्कार घडवण्याची ही संकल्पना आहे. त्यासाठी तिने फास्ट टर्टल कंपनीची स्थापना केली. इंग्रजी शाळांचा वाढता प्रभाव आणि कोविडनंतर झपाट्याने वाढलेला स्क्रीनटाईम या दोन आव्हानांवर बालगीत हे उत्तम उत्तर आहे. बालगीतच्या वर्गात ताल, ठेका, ध्वनी, गती यांसारख्या संगीत संकल्पना सोप्या, मुलांना आपल्याशा वाटतील अशा भाषेत समजावल्या जातात. इथे कोणत्याही मुलावर गाण्याची सक्ती केली जात नाही. संगीताची गोडी नैसगकरीत्या निर्माण केली जाते. पालकांनी मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच बालगीत ही केवळ मुलांची नव्हे, तर कुटुंबाची एकत्रित साधना आहे. संगीत, एकाग्रता आण सजग पालकत्व या त्रिवेणी संकल्पनांचा संगम साधणारी ही संकल्पना आहे. बालगीत ही संकल्पना कॉपीराईटद्वारे संरक्षित असून, पारंपारिक बालगीतांना नव्याने शिकवण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे. बालगीताचा वर्ग पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने पुण्यातील बाणेर व सिंहगड रस्ता या दोन केंद्रांवर चालतो. तीन वर्षांपूर्वी घरातून मिळालेल्या फक्त २५ हजार रुपयांच्या भागभांडवलावर सुरू झालेला बालगीत प्रकल्प आज मानसीने स्वतःच्या हिमतीवर वाढवला आणि नफ्यातही नेला आहे.

८. समाजभान राखणारी उद्यमशीलता

अश्विन पावडे

अश्विन पावडे, उद्योजक

एस फोर एस टेक्नालॉजीज् या कंपनीचा अश्विन पावडे हा सहसंस्थापक आहे. ग्रामीण भागात विशेषत: महिलांना सौरऊर्जेच्या क्षेत्रात सहभागी करवून रोजगार निर्माण करणारी ही कंपनी आहे. या कंपनीने नव्या पद्धतीने सौरपटल तयार केले असून त्यातून अतिनील किरणांच्या आधारे पाणी शोषून घेण्याची प्रक्रिया केली जाते. ग्रामीण भागात वाळवून ठेवलेल्या भाज्या वापरल्या जात. ती युक्ती या सौर वाळवण यंत्रात वापरण्यात आली आहे. पोषणमूल्य कायम ठेवून भाज्या वाळवता येतात. त्यामुळे हंगाम नसण्याच्या काळातही भाज्या मिळू शकतात. असे वाळवण यंत्र ग्रामीण भागात महिलांना देऊन त्यांची वाळलेली भाजी मुंबई, पुण्यासह अनेक मोठ्या शहरांत पुरविण्याचे काम ही कंपनी करते. कृषी आणि महिला या दोन्ही दुर्लक्षित क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम म्हणता येईल असेया कंपनीचे काम आहे. महिलांमध्ये बचत आणि उद्योजकता वाढवण्याचा या कंपनीचा प्रयत्न असतो. सुमारे ४००० महिला या क्षेत्रात आता काम करत असल्याने अश्विनच्या कंपनीस आंतरराष्ट्रीय पातळीवरही सन्मान मिळालेला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘बंदा रुपया’ या सदरात या कंपनीच्या कामाकाजाविषयी माहिती प्रकाशित करण्यात आली होती. अन्नपदार्थ निर्मितीच्या क्षेत्रात स्थायी विकास करणाऱ्या कंपन्यांची संख्या तशी कमी आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनची समाजभान राखणारी उद्योजकता उठून दिसते.

९. शिल्परचनेतून समाजवास्तव

प्रभाकर पाचपुते

प्रभाकर पाचपुते, चित्रकार तथा शिल्पकार

प्रभाकर पाचपुते हे समकालीन भारतीय कलेतील एक महत्त्वाचे आणि वैचारिक भान असलेले नाव. १९८६ साली महाराष्ट्राच्या पूर्व भागात जन्मलेल्या प्रभाकरची कलादृष्टी बालपणातील अनुभवांमधून घडली. खाणकाम आणि त्या प्रक्रियेत बदलत गेलेले गाव, जमीन, माणसे यांचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून हा अनुभव होता. त्यामुळे केवळ दृष्य सौंदर्य नाही, तर जमीन, श्रम, राजकारण हा त्याच्या कलेचा केंद्रबिंदू राहिला आहे. खाणकामगार कुटुंबातून आलेल्या या तरुणाने कलेच्या क्षेत्रात मिळवलेले यश महत्त्वाचे आहे. त्याने शिल्पकलेची पदवी खैरागडच्या इंदिरा कला संगीत युनिव्हर्सिटीतून, तर पदव्युत्तर पदवी महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून मिळवली. त्या काळातच रेखाटन, भित्तीचित्र, शिल्प, स्टॉप मोशन ॲनिमेशन, स्थापत्य कला प्रयोग अशा माध्यमांत त्याचे काम सुरू होते. अनेकदा तो अतिवास्तववादी (सररिअल) प्रतिमांचा वापर करणाऱ्या पॅनोरमिक भू-दृश्यांच्या आत आणि बाहेर प्रेक्षकांना वावरू देतो. त्याच्या कलाकृती केवळ खाणकामासारख्या भौतिक प्रश्नापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत; त्या सामाजिक व मानसिक स्तरावरील हालअपेष्टा आणि व्यवस्थात्मक शोषणाचाही वेध घेतात. आपल्या काळात उलगडत चाललेल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर ‘माणूस असणे म्हणजे काय’ या प्रश्नाकडे तो अभ्यासू, समाज-सांस्कृतिक, नैतिक आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनातून पाहतो. प्रभाकर पाचपुते याच्या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. त्याच्या कलाकृतींची क्लार्क हाउस इनिशिएटिव्ह, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ग्लासगो स्कूल ऑफ आर्ट, जमीन आर्टस सेंटर येथे स्वतंत्र प्रदर्शने झाली आहेत. साओ पावलो बिएनाले, इस्तंबूल बिएनाले, एशिया पॅसिफिक ट्रिएनाले, ढाका आर्ट समिट, कोची बिएनाले अशा अनेक आंतरराष्ट्रीय कला महाप्रदर्शनांत त्याचा सहभाग राहिला.

१०. कविता, अभिनयातील बहुपैलू

अक्षय शिंपी

अक्षय शिंपी, कवी, सादरकर्ता

अस्वस्थ वर्तमानाला प्रश्न विचारण्याचे धाडस करणारा कवी अक्षय शिंपी. अक्षयची कविता सामाजिक, राजकीय विधान करते… आपले विचार मांडण्यावर सामाजिक मर्यादा असलेल्या सध्याच्या वर्तमानात तो माणसाचे जगणे, त्याच्या वेदना कवितांमधून निडरपणे मांडतो. कविता ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे आहे, हे तो प्रामुख्याने अधोरेखित करतो. त्याच्या कवितांमधले माणसांचे विस्कट जगणे वाचकालाही अस्वस्थ करून जाते. बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे आणि अव्याकृत हे दोन कवितासंग्रह याचीच साक्ष देतात. कविता, ललित लेखन, अनुवाद या साहित्यप्रकारांत त्याची मुक्त मुशाफिरी सुरू असते. अक्षयने डोंबिवलीच्या के. वि. पेंढरकर महाविद्यालयातून मानसशास्त्रात पदवी संपादन केली आणि पुढे मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून पदव्युत्तर पदवी मिळवली. प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनयास सुरुवात केली. काही मालिका, सिनेमांतही त्याने अभिनय केला. हे करत असताना त्याच्यातला कवी त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातूनच पर्शियन-उर्दूतला दास्तानगोई हा कथन कलाप्रकार त्याने मराठीत आणला. दास्तान-ए-बडी बांका या मुंबईचा भवताल, त्यातल्या माणसांचं आयुष्य कथन करणारा रसाळ, काव्यमय प्रयोग त्याने सादर केला. एक कलाकार म्हणून अक्षयमधील संवेदनशीलता प्रामुख्याने जाणवत राहते. मराठीतील प्रसिद्ध कथाकार दि. बा. माळेकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेवर आधारित ‘दास्तान-ए-रामजी’ चा प्रयोग म्हणजे संहिता-अभिनयातून सादर केलेले सुंदर भावकाव्यच. ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘पुनश्च हनिमून’, ‘आधी बसू मग बोलू’ अगदीच शून्य, बॅकस्टेजवाला कोणी’, ‘मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’, ‘इन्विजिबल सिटी’, ही मराठी नाटके,.. तसेच ‘हयवदन’, ‘हॅलो फरमाईश’, ‘बस्ती में मस्ती, ‘विरासत’, ‘राम सजीवन की प्रेमकथा’ या हिंदी नाटकांत अभिनय केला आहे. कविता, ललित गद्य, अनुवाद, अभिनय, भाषिक साहित्य, यातून अक्षयने मराठी माणसाचं सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. त्याचे दास्तानगोईचे प्रयोग याची पूरेपूर साक्ष देतात.

११. अभिनय, दिग्दर्शनात चौफेर

शिवराज वायचळ

शिवराज वायचळ, अभिनेता तथा दिग्दर्शक

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत शिक्षण झालेल्या शिवराज वायचळने भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समधून कलेची पदवी मिळवली. लहानपणीच नाट्यसंस्कार कला अकादमीच्या बालनाट्यांमध्ये काम केले. महाविद्यालयीन जीवनात पुरुषोत्तम, फिरोदिया करंडक अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला. शिवराजची उळागड्डी ही एकांकिका राज्यभर गाजली होती. या एकांकिकेत प्रमुख भूमिकेसह त्याने दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली होती. शिवराजने त्याच्या मित्रांसह थिएट्रॉन ही नाट्य संस्था सुरू केली. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अॅनाथेमासारखी नाटके सादर केली. अभिनयाच्या जोरावर त्याने भवर हा एकपात्री दीर्घांकही साकारला. अगं बाई अरेच्चा – २ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतून त्याचा चित्रपट प्रवेश झाला. फंट्रू, वेडिंगचा सिनेमा, विकून टाक, पावनखिंड अशा चित्रपटांमध्ये त्याने भूमिका केल्या. गोंद्या आला रे, स्लम गोल्फ, बाई तुझ्यापायी अशा वेव सीरिजमध्येही त्याने अभिनेता म्हणून काम केले. अर्जुन या शॉर्टफिल्मद्वारे त्याने पहिल्यांदा दृकश्राव्य माध्यमातील दिग्दर्शनात पाऊल ठेवले अत्यंत संवेदनशील कथा असलेली ही शॉर्टफिल्म फिल्मफेअर पुरस्काराची मानकरी ठरली. श्रीकांत या हिंदी चित्रपटासाठी त्याने तुषार हिरानंदानी या दिग्दर्शकाबरोबर सहायक दिग्दर्शक म्हणून काम केल. त्यानंतर आता थांबायचं नाय या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा चित्रपट दिग्दर्शन केले.

१२. कलोपासना आणि प्रसारही

स्वप्नील शिवाजी गोडसे

स्वप्नील शिवाजी गोडसे, शिल्पकार

स्वप्नील गोडसे हा गेल्या १७ वर्षांपासून धातूच्या माध्यमातून शिल्प साकारत आहे. स्वप्नीलने सर ज. जी. कला महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर तो सातत्याने शिल्पकलेच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. मुख्यतः धातूचा वापर करून विविध प्रयोगांच्या माध्यमातून त्या कलेता न्याय द्यावा हा स्वप्नीलचा ध्यास असून ही कला स्वतः पुरती मर्यादित न राहता शालेय विद्यार्थी तसेच युवकांना या कलेविषयी माहिती मिळावी, कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीनेही तो प्रयत्न करत आहे. धातूचा वापर करत शिल्पकलेत विविध माध्यमांचा शोध घेत प्रयोग करणाऱ्या स्वप्नीलला ज. जी. कला महाविद्यालयाकडून ‘मास्टर्स अवॉर्ड’ देण्यात आले. याचबरोबर बॉम्बे आर्ट सोसायटीचे विविध पुरस्कारही त्याला मिळाले असून संगीता जिंदाल स्कॉलरशीपचाही तो मानकरी होता. ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’, ‘ठाणे आर्ट फेस्टिव्हल’ आणि ‘अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हल’मध्येही त्याने भाग घेतला आहे. कलेचा प्रसार होणे हेही तितकेच गरजेचे आहे, असे त्याचे मत आहे. या दृष्टीने तो शहराबरोबरच गामीण भागांत विविध उपक्रमांचे आयोजन करतो. यात प्रामुख्याने कार्यशाळा, प्रदर्शन, नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी निवासी कार्यशाळा आदींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या निवासी कार्यशाळा घेताना त्यांना शिल्पकलेची फारशी माहिती नसते हे स्वप्नीलला जाणवले. मात्र, कार्यशाळा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध धातूंची माहिती मिळाली आणि त्यांच्या या कलेविषयी आस्था निर्माण झाली. तसेच त्यांना प्रेरणाही मिळाली, असे स्वप्नील सांगतो.

१३. गुंतागुंतीचे क्रांतिकारी संशोधन

मैत्रेयी वैरागकर

मैत्रेयी वैरागकर, संशोधक

मूळची निगडी येथील असलेली डॉ. मैत्रेयी वैरागकर न्यूरोसायंटिस्ट आणि न्यूरो इंजिनिअर आहे. ती सध्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे न्यूरोलॉजिकल सर्जरी विभागात स्टाफ सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे. तसेच ब्रेन गेट कन्सॉर्टियममध्ये व्हॉइस न्यूरोप्रोस्थेसिस संशोधनाचे नेतृत्व करत आहे. मैत्रेयीने एआय आणि सायबरनेटिक्स या विषयात अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी, पीएचडी प्राप्त केली आहे. तसंच लंडनच्या इम्पिरियल कॉलेज आणि यूके डिमेन्शिया रिसर्च इन्स्टिट्यूट इथे पोस्ट डॉक्टरल संशोधन केले.मैत्रेयीने ब्रेन कम्प्युटर इंटरफेस विकसित केला आहे. पक्षाघात, मणक्याला दुखापत अशा मेंदूसंबंधित तसेच चेतासंस्थेशी संबंधित आजारांमुळे हालचाल आणि वाणी गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा संवादक्षम करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन मैत्रेयी करते. अशा आजारांमध्ये मेंदू आणि शरीर यांच्यातील संवेदक तुटतात, त्यामुळे अशी व्यक्ती हालचाल, वाचा आणि स्वयंपूर्ण जगण्याची क्षमता गमावते. अशा वेळी ब्रेन कम्प्युटर इंटरफेस हे तंत्रज्ञान मेंदूतील संकेत थेट वाचून बाधित मार्गांना टाळून व्यक्तीला केवळ विचारांच्या आधारे संवाद साधण्यास सक्षम करते.

मैत्रेयीने प्रत्यारोपणयोग्य स्पीच न्यूरोप्रोस्थेसिस विकसित केली आहे. ही प्रणाली भाषण नियंत्रित करणाऱ्या मेटू-प्रांतातील इलेक्ट्रोड्सद्वारे शेकडो चेतापेशींचे संकेत वास्तव वेळेमध्ये (२५ मिलीसेकंद विलंबासह) संगणकीकृत आवाजात रूपांतरित करते. यामुळे रुग्ण बोलण्याचा प्रयत्न करताच त्यांचे मेटू-सिग्नल्स स्वतःसारखा भासणाऱ्या आवाजात व्यक्त होतात. हा ‘ब्रेन-टू-व्हॉइस’ दृष्टिकोन पारंपरिक ‘ब्रेन-टू- टेक्स्ट’ प्रणालीपेक्षा पुढचा टप्पा आहे. मैत्रेयीचे संशोधन नेचर, न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिन अशा मान्यवर संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ब्रेन कम्प्युटर इंटरफेस हे तंत्रज्ञान सध्या चाचणीच्या टप्प्यावर आहे. तसेच या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी अमेरिकन आणि जागतिक पेटंट अर्ज २०२५ मध्ये मिळाला आहे. पुढील ५-७ वर्षांत निर्णायक क्लिनिकल चाचण्या करून वैद्यकीय उपकरण बाजारात उपलब्ध करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मैत्रेयीचे काम वैद्यकीय, तंत्रज्ञान आणि सामाजिक अशा तिन्ही स्तरांवर क्रांतिकारक आहे. त्याशिवाय मानव-यंत्र संवादाच्या नव्या युगाकडे नेणारे आहे.

१४. मशीन लर्निंगचे सुलभीकरण

पियुष श्रीवास्तव

पियुष श्रीवास्तव, संशोधक

विज्ञान विषयाची आवड असलेला पियुष श्रीवास्तव सध्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथून त्याने पीएच.डी. केली. पियुषचे संशोधन हे संगणक क्षेत्रात आहे. यात अल्गोरिदमचे विश्लेषण करणे आणि सांख्यिकी भौतिकशास्त्र, सांख्यिकीचे संगणकीय आणि संरचनात्मक पैलू अभ्यासणे तसेच माहिती आणि सिद्धांत यांमधील संबंधांचा अभ्यास करणे आदी विषयांचा समावेश आहे. संगणकीय संख्याशास्त्र पद्धतीचा वापर करून आण्विक रचनेवरील गणना अधिक जलद करता येते हे त्याच्या अभ्यासातून पुढे आले आहे. याचबरोबर मशीन लर्निंगमध्ये खूप जास्त पॅरामीटर्स वापरण्याचे गूढ समजून घेण्यासाठीही पियुषच्या अभ्यासाची मदत होते. पियुषचे संशोधन गणना (डिजिटल कंप्युटेशन) आणि माहितीचा अभ्यास यांना निसर्ग विज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करते. संगणकीय समस्यांसाठी उदा. विदा (डेटा) नमुना घेणे, अधिक कार्यक्षम अल्गोरिदम डिझाइन करणे हे समजून घेणे, हे पियुषच्या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पियुषने आपल्या सहकाऱ्यांबरोबर केलेल्या संशोधनामुळे नमुना घेण्याची पद्धत सुधारली. यासाठी एच. नारायणन आणि ए. राजारामन यांचे सहकार्य लाभले. तसेच मशीन लर्निंगमधील जास्त पॅरामीटर्स समजून घेण्यासाठी बुबेक (Bubeck) आणि सेल्के (Sellke) यांनी सांगितलेल्या नियमाचा नवीन दृष्टिकोन त्याने मांडला. संशोधनाबरोबरच पियुषला विज्ञान शिकविणे तसेच अधिकाधिक नागरिकांपर्यंत विज्ञान पोहोचवणे याची आवड आहे. चाय अँड व्हाय’ (Chai and Why) या विज्ञान व्याख्यानमालेत त्याचा सहभाग असतो. गुगल इंडिया रिसर्च अवॉर्ड (२०२४), तसेच, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे दोन पुरस्कार, यासह आयआयटी कानपुर येथे राष्ट्रपती सुवर्ण पदकानेही (२००९) त्याला सन्मानित करण्यात आले. पियुष २००५ साली इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.

१५. दूरस्थ ग्रहांची शोधकर्ती

प्रियांका चतुर्वेदी

प्रियांका चतुर्वेदी, खगोल शास्त्रज्ञ

प्रियांका चतुर्वेदी ही दूरस्थ ग्रहांच्या अर्थात एग्झोप्लॅनेटच्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून एग्झोप्लॅनेट संशोधनासाठी भक्कम पायाभरणी करणे हा तिच्या संशोधनाचा उद्देश आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एम. एस्सी. भौतिकशास्त्र या विषयात सर्वप्रथम येत तिने पदव्युत्तर पदवीचा अभ्यास पूर्ण केला. ती सध्या टाटा इन्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तिने अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथून ‘रेडियल व्हेलॉसिटी ऑफ इक्लिप्सिंग बायनरीज’ या विषयात पीएच.डी. पूर्ण केली. प्रियांकाचा ऑब्झर्वेशनल अॅस्ट्रॉनॉमी, हाय रिझोल्यूशन स्पेक्ट्रोस्कोपी, फोटॉमेट्री आदी विषयांचा अभ्यास आहे. एग्झोप्लॅनेट म्हणजे आपल्या सूर्यमालेबाहेरही ग्रह, जे वेगळ्या ताऱ्यांभोवती फिरतात किंवा स्वतंत्र संचारत असतात. विविध प्रकारच्या ताऱ्यांभोवती ग्रह कसे निर्माण होतात, कसे विकसित होतात आणि दीर्घकाळ टिकून राहतात, याचा अभ्यास प्रियांका करते. एखादा ग्रह मानवास वस्तीयोग्य होण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते याचा अभ्यास करणे हे प्रियांकाच्या संशोधनामागील मुख्य उद्दिष्ट आहे. एग्झोप्लॅनेट संशोधनात भारताची कीर्ती वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थपूर्ण योगदान देणे यासाठी ती प्रयत्नशील आहे.प्रियांका सध्या करत असलेल्या अभ्यासाचा खगोलभौतिकी (अॅस्ट्रोफिजिक्स) आणि विदा विज्ञान (डेटा सायन्स) या क्षेत्रातील संशोधक आणि विद्यार्थी यांना फायदा होत आहे. यात अवकाश मोहिमा तसेच वेधशाळांबरोबर काम करणाऱ्या संशोधन पथकांचाही समावेश आहे. संशोधन, विज्ञानाविषयी कुतूहल वाढावे यासाठीही ती प्रयत्नशील असते. एग्झोप्लॅनेट विषयातील कार्य आणि संशोधनासाठी प्रियांकाला ‘के. डी. अभ्यंकर बेस्ट थीसिस प्रेझेंटेशन अवॉर्ड, अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या पुरस्कारासह अनेक शैक्षणिक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. मॅक्स प्लँक एशिया सेंटर फॉर स्टेलर फिजिक्स, होरायझन युरोप या संस्थेशी ती जोडली गेली आहे.

१६. प्रकाशनाचा यशस्वी उद्योग

भाग्यश्री इंद्रजीत कासोटे पाटील

भाग्यश्री इंद्रजीत कासोटे पाटील, उद्योजक

प्रकाशन व्यवसायातील आव्हाने वाढत चालली असताना या क्षेत्रात नवनवे उपक्रम, कल्पकता आणि वाचक सहभाग याचा मेळ साधून एका तरुणीने मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले आहे. कोल्हापुरातील भाग्यश्री प्रकाशनची चालक भाग्यश्री इंद्रजीत कासोटे पाटील हिने अल्पावधीतच प्रकाशन व्यवसायात लौकिक मिळवला. बँकेतील कायमस्वरूपी नोकरी सोडून आव्हानात्मक अशा प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवणे तसे धाडसाचेच. तशात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे तिला व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. बँकेत काम करत असताना नोकरीच्या मर्यादा लक्षात आल्याने व्यवसाय करण्याचे ठरवून ‘भाग्यश्री प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था तिने सुरू केली. बी.एस्सी.नंतर एम.बी.ए.चे उच्च शिक्षण घेतल्याने त्याचा पुढे उपयोग व्यावसायिक गणिते समजून घेण्यासाठी झाला. गेल्या आठ वर्षांत तिच्या प्रकाशन संस्थेने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत १०० पुस्तके प्रकाशित केली. अनेक नामवंत लेखकांनी, साहित्यिकांनी आपले साहित्य प्रकाशित करण्यासाठी भाग्यश्री प्रकाशनाची निवड केली यातच या प्रकाशन संस्थेचे महत्त्व, चोखंदळपणा लक्षात यावा. भाग्यश्रीने सुरुवातीपासून दर्जेदार पुस्तक तयार करण्यावर भर दिला. त्यासाठी उत्तम प्रतीचा कागद, आकर्षक मुखपृष्ठ, छपाई, बांधणीकडे लक्ष केंद्रित केले. संपूर्ण महाराष्ट्रभर पुस्तक वितरण व्यवस्था पोहोचल्यामुळे आपोआप एकापाठोपाठ एक पुस्तक प्रकाशनासाठी मिळत गेले. अनेक मान्यताप्राप्त संस्थांनी भाग्यश्री प्रकाशन संस्थेला गौरवले आहे. नवोदित ते प्रथितयश अशा सर्व प्रकारच्या लेखकांची पुस्तके तिने प्रकाशित केली. त्यांची रॉयल्टी (स्वामित्वधन) ठरल्यानुसार वेळेत दिली जाते. पुस्तके महाराष्ट्रभर पोहोचवल्यामुळे लेखकांची विश्वासाहर्ता वाढीस लागते. त्यामुळेच एका लेखकाची अनेक पुस्तके प्रकाशित करणे शक्य झाले. उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती, सचोटी, विश्वासाहर्ता, वितरण व्यवस्था यांमुळे पुस्तक प्रकाशनासाठी मान्यवर लेखकांची पुस्तके मिळू लागली आहेत.

१७. वैद्यकसेवेतून बंडखोर लेखन

डॉ. ऐश्वर्या देवडकर

डॉ. ऐश्वर्या देवडकर, लेखिका, स्त्रीरोगतज्ज्ञ

नव्या दमाच्या बंडखोर लेखिका ही ऐश्वर्या देवडकरची सध्याची प्रमुख ओळख. ती मूळची बार्शीची. पेशाने स्त्रीरोगतज्ज्ञ. शिक्षण पूर्ण झाल्यावर नियमित नोकरी व डॉक्टरकीची नेहमीची वाट न धरता तिने थेट डॉ. अभय बंग आयोजित शिबिर गाठले. एका डॉक्टरने आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीकडे कसे पाहावे याचे प्रशिक्षण या शिबिरातून मिळाले. छत्तीसगडमधील बिजापूर या नक्षलग्रस्त भागातील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच वर्षे रुग्णसेवा केली. नक्षली हिंसाचाराला न घाबरता दुर्गम भागात फिरून आरोग्यसेवा केली. तेथील अनुभवावर आधारित साधना साप्ताहिकात ‘बस्तर डायरी’ लिहिली. पुढे त्याचे पुस्तक झाले. या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. प्रसूती, मासिक पाळी या संदर्भात शिक्षित स्त्रियांमध्येही अनेक गैरसमज आहेत हे लक्षात आल्यावर तिने काश्मीर, वाराणसी, उत्तराखंड, राजस्थान येथे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मासिक पाळी व लैंगिक शिक्षणावर आधारित शिबिरे घेतली. ऐश्वर्या ब्लॉगलेखनही करते. साहित्यक्षेत्रातला तिचा प्रवासही लक्षवेधी आहे. विविध दिवाळी अंकांसाठी कथा व कादंबरी लेखन केल्यावर २०२४ मध्ये तिची ‘विहिरीची मुलगी’ ही स्वतंत्र कादंबरी प्रकाशित झाली. स्त्रीविषयक जाणिवांचा नव्याने शोध घेण्याचा तिचा हा प्रयत्न साहित्यवर्तुळात वाखाणला गेला. ऐश्वर्याची लेखनशैली बेधडक आणि बंडखोर आहे. ‘पाळीचे पॉलिटिक्स’ हे तिचे आणखी एक गाजलेले पुस्तक. अलीकडे तिची दुसरी कादंबरी प्रकाशित झाली- ‘स्वत:ला जगवत ठेवण्याचे प्रयोग’. वैद्यकीय व्यवसायात असलेल्या डॉक्टरांचे आयुष्य नेमके कसे असते, पदव्युत्तरचे शिक्षण घेणारे डॉक्टर्स नेमक्या कोणत्या मानसिकतेत काम करतात, त्यांच्यातल्या लैंगिक भावना नेमक्या काय असतात या प्रश्नांचा वेध घेणारी ही कादांबरी सध्या सर्वत्र खूप गाजत आहे. डॉक्टर असूनही केवळ जगण्यापुरते पैसे मिळवून, लेखनाच्या माध्यमातून समाजातील अनेक अव्यक्त मुद्दे मांडण्याचे करण्याचे काम ऐश्वर्या अतिशय धाडसाने करीत आहे.

१८. शेतीच्या उद्योगप्रारूपाची प्रणेती

एस. भुवनेश्वरी

एस. भुवनेश्वरी, प्रशासकीय अधिकारी

दुष्काळग्रस्त विदर्भातील वाशिम जिल्ह्यात शेती ही केवळ उपजीविकेची बाब न राहता शाश्वत उत्पन्नाचे साधन बनू शकते, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुरियन भुवनेश्वरी हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २०१५ बॅचची आयएएस अधिकारी असलेली एस. भुवनेश्वरी हिने वाशिम जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना मिशन ‘आशीर्वाद’ (अॅश्युअर्ड होलिस्टिक इंटिग्रेटेड रिसोर्सफुल वॉर अंगेस्ट अॅग्रीकल्चरल डिस्ट्रेस) या अभिनव आणि सर्वसमावेशक कृषी परिवर्तन मोहिमेची संकल्पना मांडून ती प्रभावीपणे राबवली. वाशिम जिल्ह्यात खरीप क्षेत्र ४.५ लाख हेक्टरपेक्षा अधिक असून, रब्बी क्षेत्र केवळ ८९ हजार हेक्टरांपुरते मर्यादित होते. या संरचनात्मक असमतोलाच्या मुळाशी असलेली पाणीटंचाई, मृदास्वास्थ्य आणि बाजाराशी तुटलेला संबंध या समस्यांवर एकत्रित उपाय शोधण्याचा प्रयत्न तिने केला. जलसुरक्षा हा या मोहिमेचा केंद्रबिंदू होता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तब्बल १३ हजार ८०१ सिंचन विहिरींना मंजुरी देत शाश्वत जलस्रोत निर्माण करण्यात आले. मोठे धरण प्रकल्प भौगोलिकदृष्ट्या अशक्य असलेल्या जिल्ह्यात भुवनेश्वरी हिने जलतारा रिचार्ज पिट्स ही विकेंद्रित जलसंधारण संकल्पना प्रभावीपणे राबवली. प्रत्येकी ६०६४६ फूट आकाराच्या एक एकराला एक अशा या खड्ड्यांमुळे प्रत्येकी सुमारे ३.६ लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली, परिणामी भूजल पातळी सुधारली आणि पाण्याची नासाडी कमी झाली.पाणी आणि मातीचा पाया मजबूत झाल्यानंतर भुवनेश्वरीने शेतीला बाजाराशी जोडण्यावर भर दिला. एमएटीआय म्हणजेच ‘माती’ प्रयोगशाळेच्या माध्यमातून मृदास्वास्थ्य, नैसर्गिक निविष्ठा आणि कमी खर्चिक शेती पद्धती प्रोत्साहित करण्यात आले. त्यानंतर रिव्हर्स प्लॅनिंगच्या तत्त्वावर, म्हणजे आधी बाजारपेठ आणि खरेदीदार निश्चित करून, चियासारखे नगदी पीक जिल्ह्यात आणण्यात आले. अवघ्या दोन हंगामांत चियाचे क्षेत्र १८७ हेक्टरांवरून ३ हजार ६०० हेक्टरांहून अधिक झाले आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया व्यवहार सुरू होऊन सुमारे ४२ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली गेली. ‘वाशीम शेती शिल्प’ या ब्रँडिंग उपक्रमामुळे शेतमालाला ओळख मिळाली आणि शेती ही उपजीविकेऐवजी उद्यमशीलतेकडे वळली. मिशन आशीर्वाद अंतर्गत राबवलेले हे कार्य केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न राहता, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) जमिनी, माती व जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनातील प्रगती म्हणून त्याची दखल घेतली गेली.

१९. ग्रामस्थ सहभागातून संवर्धन

धनंजय सायरे

धनंजय सायरे, सामाजिक कार्यकर्ता

अमरावती जिल्ह्यातील धनंजय सायरे याने विद्यार्थीदशेतच निसर्ग संवर्धनाचे स्वप्न उराशी बाळगले. ‘निसर्ग इन्स्टिट्यूट फॉर सोशल ॲक्शन, रिसर्च, गाईडन्स अँड असेसमेंट’ (NISARGA) या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दशकभरात त्याने व्यापक कार्याला गती दिली. मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील दुर्गम भाग हे त्याचे कार्यक्षेत्र. कोरकू व इतर आदिवासी समुदायाला बरोबर घेऊन पर्यावरण संवर्धन, सामाजिक सक्षमीकरण, शैक्षणिक जागृती आणि शाश्वत विकासासाठी धनंजय झटत असतो. वन-वन्यजीव संवर्धन स्थानिक समुदायांच्या सहभागाशिवाय शक्य नाही, या विचाराने त्याने मेळघाटात कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील सीईई आणि पाणी फाउंडेशनसोबत काही काळ काम केल्यानंतर निसर्ग संस्था स्थापन केली. पर्यावरण व वन्यजीव वाचवायचे असतील, तर गाव वाचले पाहिजे आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित शाश्वत रोजगार टिकला पाहिजे, हे त्याचे मूलभूत तत्त्व. स्त्री-पुरुष समानतेने आणि लोकशाही मार्गाने नैसर्गिक संसाधनांवे संवर्धन करून शाश्वत विकास साधण्याचे लक्ष्य त्याने ठेवले आहे. अंगारमुक्त, वणवामुक्त जंगल अभियान, संवाद रणनीती कार्यशाळा, सत्यमेव जयते कीटकनाशक मुक्त अभियान, सृष्टीमित्र अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, व्यसनमुक्ती भजन कार्यक्रम, सावित्रीबाई फुले विचार मंथन, मास्क निर्मिती, शेवगा रोपण व पोषण जागृती यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांतून त्याच्या कार्याला विधायक स्वरूप प्राप्त झाले. करोनाकाळात कोरकू भाषेत लसीकरण जागृती, गैरसमज निराकरणाचे काम त्याने केले. गेल्या चार वर्षांपासून मेळघाट शिक्षण यात्रेचे नेतृत्व करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, कमी वयात लग्न न करणे, उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहित केले. कुपोषणाच्या मूळ कारणांवर काम करीत असंख्य विद्यार्थ्यांना त्या कार्यात जोडले. या कार्यासाठी स्वतःला झोकून देत धनंजय १५ ते २० दिवसांत १२००-१३०० किमी प्रवास करतो. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या जैवविविधता संवर्धकसह विविध संस्था, संघटनांच्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्याला सन्मानित केले आहे.

२०. स्थलांतरितांचा शैक्षणिक ‘कम्पॅनियन’

गणेश बिराजदार

गणेश बिराजदार, शिक्षणतज्ज्ञ

शिक्षणातून बदल घडवणारा युवा शिक्षणतज्ज्ञ ही गणेश बिराजदार याची ओळख. जगातील अनेक समस्या या शिक्षणाच्या संधी, योग्य संगत, समस्या समजून घेण्याची पद्धत आणि त्यांचा सामना करण्याच्या तयारीशी निगडित असतात, ही जाणीव ठाम अनुभवाने पक्की झाली. याच विचारातून त्याने मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. मानसशास्त्रामध्ये पदवी आणि कॉग्निटिव्ह सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्तणूक संशोधनावर लक्ष केंद्रित केले. दोन वर्षांच्या संशोधनानंतर असे लक्षात आले की अनेक सामाजिक समस्या शाळेच्या पातळीवरच सुरू होतात. नोव्हेंबर २०२० मध्ये मध्य भारतातील ३५ स्थलांतरित भर्वाड जमातीच्या वसाहतींना भेट दिली असता एक गंभीर वास्तव समोर आले – केवळ १० टक्के मुले वाचू शकत होती आणि मुली पाचवी नंतर शिक्षण सोडत होत्या. स्थलांतरित कुटुंबांसाठी शाळा दूर आणि वेळापत्रक कठोर असते. राष्ट्रीय पातळीवर सुमारे १० टक्के लोकसंख्या म्हणजे जवळपास १३ कोटी लोक स्थलांतरित समुदायांशी संबंधित आहेत आणि त्यांना अशाच अडचणींचा सामना करावा लागतो. यातून बोध घेऊन गेल्या चार ते पाच वर्षांत गणेश आणि त्याच्या टीमने लर्निंग कम्पॅनियन्सच्या माध्यमातून स्थलांतरित मुलांसाठी उपयुक्त असे लवचिक आणि संदर्भाधारित शिक्षण मॉडेल विकसित केले आहे. आज त्याच्या पाच शिक्षण केंद्रांमधील सुमारे ७०% मुले वाचू लागली आहेत; त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे, लर्निंग कम्पॅनियन्सचे माजी विद्यार्थी आज महाराष्ट्रातील २५ संस्थांमध्ये कार्यरत असून सुमारे ३००० हून अधिक मुलांबरोबर थेट काम करत आहेत.

२१. मर्यादेतून अमर्याद झेप

आर्यन जोशी

आर्यन जोशी, बुद्धिबळपटू

आर्यन जोशी हा अतिशय असाधारण असा अंध (visually challenged) भारतीय बुद्धिबळपटू आहेत. आपली दृष्टी गमावूनही त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. तो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहेच, शिवाय राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता जलतरणपटूदेखील आहे. जन्मापासून अंधत्व आलेल्या आर्यनने वयाच्या ११-१२ व्या वर्षीच वडिलांकडून बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली. त्याने आजवर १२ देशांमध्ये १७ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून ७० पेक्षा जास्त चषक जिंकले आहेत. यामध्ये ग्रीसमध्ये झालेल्या अंधांच्या जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (World Chess Olympiad) पहिल्या बोर्डवर कांस्यपदक, फ्रान्समधील जागतिक कनिष्ठ अजिंक्यपदक स्पर्धेत रौप्यपदक आणि २०२३ च्या चीनमधील आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदकाचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीसाठी आर्यनला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे, आर्यन केवळ दृष्टिबाधित खेळाडूंच्या गटात खेळत नाही, तर आता तो ‘आंतरराष्ट्रीय फिडे रेटेड’ (FIDE Rated) खेळाडूदेखील आहेत. त्याने मुंबई विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे आणि ‘वेस्ट झोन’ आंतरविद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. खेळासोबतच आर्यन हे एक यशस्वी विद्यार्थी असून त्याने आर. ए. पोदार कॉलेजमधून बी कॉम आणि २०२५ मध्ये आयआयएम इंदूर (IIM Indore) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. कॉर्पोरेट करिअरपेक्षा महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी काम करण्यास तो प्राधान्य देत असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागात गट-अ अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

२२. जिद्दीतून यशाचे लक्ष्य

मधुरा धामणगावकर

मधुरा धामणगावकर, तिरंदाज

अमरावती जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय क्रीडामंचावर आपली ठाम ओळख निर्माण करणारी मधुरा धामणगावकर ही भारतीय तिरंदाजी क्षेत्रातील अत्यंत गुणी खेळाडू म्हणून ओळखली जाते. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मधुराने मर्यादित सुविधा, तीव्र स्पर्धा आणि सातत्याने बदलणाऱ्या निवड प्रक्रियेतील आव्हाने स्वीकारत यशस्वी वाटचाल केली. लहान वयात तिरंदाजीची आवड जोपासताना तिला अत्याधुनिक साहित्य किंवा मोठ्या प्रशिक्षण केंद्रांची साथ नव्हती; मात्र शिस्तबद्ध सराव, अचूकतेवर लक्ष आणि मानसिक स्थैर्य या मूलभूत घटकांच्या जोरावर तिने स्वतःला घडवत नेले. कंपाऊंड तिरंदाजीसारख्या अत्यंत तांत्रिक आणि दडपणाखाली खेळल्या जाणाऱ्या प्रकारात सातत्य राखणे हेच तिच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरते. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत मधुराने भारतीय संघात स्थान मिळवले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली. तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे २०२५ मध्ये चीनमधील शांघाय येथे झालेल्या आर्चरी वर्ल्ड कप (स्टेज-२) मधील ऐतिहासिक कामगिरी. या स्पर्धेत मधुराने महिला कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता ठळकपणे सिद्ध केली. याच स्पर्धेत तिने महिला सांघिक प्रकारात रौप्यपदक, तसेच मिश्र टीम प्रकारात कांस्यपदक पटकावत एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली. दुखापती, फॉर्ममधील चढ-उतार आणि तीव्र स्पर्धात्मक वातावरण असूनही तिने सरावात खंड पडू दिला नाही. फिटनेस, तांत्रिक विश्लेषण आणि मानसिक तयारी यांवर लक्ष केंद्रित करत ती सातत्याने स्वतःत सुधारणा करत राहिली.