मुंबई : कधी कणखर, कधी स्नेहपूर्ण, तर कधी ध्येयवादी प्रवासातून ‘स्त्रीत्वाचे’ पदर जपतानाच आपल्या कर्तृत्वाचे ठसे उमटविणार्या ‘ती’चा प्रवास हा विशेष असतो. अशाच वेगळ्या आणि धाडसी वाटांनी प्रवास करणार्या नायिकांचा सहप्रवास ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘व्ही एम ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘ती’ची भूमिका कार्यक्रमातून उलगडणार आहे.
वेगवेगळ्या कालखंडातील रंगभूमीवरील सादर झालेल्या सहा नाटकांतील प्रवेशांच्या सादरीकरणातून उलगडणारा हा स्त्रीत्वाचा प्रवास गुरुवार, ४ जून रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार नाट्यमंदिर येथे संध्याकाळी ६.३० वाजता होणार्या ‘ती’ची भूमिका कार्यक्रमातून उलगडणार आहे.
स्त्रीच्या भावविश्वाशी जोडलेल्या विविध विषयांचा मागोवा अभिनय, नेपथ्य, उत्कृष्ट संवाद यांच्या माध्यमातून अनेक नाटकांतून घेतला गेला आहे. विविध कालखंडात सादर झालेल्या अनेक नाटकांतील प्रसिद्ध नायिका समाजातील स्त्रीरूपाचे जणू प्रतिनिधित्वच करीत असतात. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित कार्यक्रमातून अशाच काही नाटकांतील प्रवेशांचे सादरीकरण अनुभविण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे संहितालेखन प्रसिद्ध अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले यांनी केले आहे, तर निवेदनाची धुरा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सांभाळणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ‘मिती ग्रुप’ने केले आहे. सई परांजपे लिखित ‘सख्खे शेजारी’ नाटकातील प्रवेश सुप्रिया विनोद, सायली परब-शेलार आणि आलापिनी निसाळ सादर करणार आहेत. आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकातील प्रवेश भार्गवी चिरमुले, श्रीनिवास ओक, कविता जोशी, गौरी फडके आणि शुभम जोशी आदी कलाकार आपल्या अभिनयातून उलगडणार आहेत.
श्याम मनोहर लिखित ‘येळकोट’ नाटकातील प्रवेश अश्विनी गिरी आणि नंदिता पाटकर सादर करतील. ‘श्री बाई समर्थ’ या राजेश देशपांडे याचा नाटकातील प्रवेशात ईशा डे, श्रेयस वैद्य आणि मुकेश जाधव आदी सहभागी होतील. रत्नाकर मतकरी यांच्या ‘वट वट सावित्री’ या नाटकातील प्रवेशही यावेळी सादर होणार असून यात मधुरा देशपांडे, शर्वरी बोरकर आणि संतोष वेरूळकर आदी कलाकार असतील, तर विशाखा सुभेदार आणि सहकलाकार यावेळी संतोष पवार याच्या ‘द दमयंती दामले’ या नाटकातील प्रवेश सादर करतील. कार्यक्रमाच्या प्रवेशिका बुधवार, ३ जूनपासून नाट्यगृहावर उपलब्ध होणार आहेत.
मुख्य प्रायोजक– मुसळुणकर यांचे व्ही एम ज्वेलर्स
सहप्रायोजक– लॅब इंडिया विदू इलेक्ट्रिक बायसिकल, मेयर व्हिटाबायोटिक्स
पॉवर्ड बाय – गिरगांव कट्टा
कधी? : गुरुवार, ४ जून
वेळ : सायंकाळ ६.३० वाजता
कुठे? : प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली पश्चिम
