मुंबई : मराठी रंगभूमीला विनोदी नाटकांची मोठी परंपरा आहे. रंगभूमीच्या सुवर्ण काळात आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गज नाटककरांनी कौटुंबिक विनोदी आशय आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या नाटकांची निर्मिती केली. त्यानंतरच्या काळातही नवनवीन विनोदी नाटके येत राहिली. या विनोदी नाटकांधून ‘ती’ची भूमिका कशी होती हे एकाच मंचावर अनुभवण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या ‘व्हि एम ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘ती’ची भूमिका या कार्यक्रमातून मिळणार आहे. गुरूवारी, ४ जून रोजी रंगणाऱ्या ‘ती’ची भूमिका या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका ३ जूनपासून बोरिवलीतील प्रबोधनकार नाट्यमंदिरात सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध होणार आहेत.

विनोदी नाटकांमधील स्त्री भूमिका या चटकन लक्षात येत नाहीत, अनेकदा त्या भूमिकांचा प्रभाव आपल्यावर पडतो, विनोदी भूमिकांसाठी नावाजलेल्या अभिनेत्रीही रंगभूमीवर आहेत. पण, ठळकपणे विनोदी किंवा हास्यप्रधान स्त्री भूमिका कशा होत्या, याची झलक पाहण्याची संधी गुरुवारी, ४ जून रोजी, बोरिवली येथील प्रबोधनकार नाट्यमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता रंगणाऱ्या ‘ती’ची भूमिका या कार्यक्रमातून मिळणार आहे. आचार्य अत्रे, श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, सई परांजपे ते अलिकडच्या काळातील संतोष पवार, राजेश देशपांडे या नाटककारांच्या हास्यप्रधान नाटकातील स्त्रीच्या भूमिका आणि तिचे निवडक प्रवेश हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य आहे.

‘ती’ची भूमिका या कार्यक्रमाचे संहितालेखन प्रसिद्ध अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले यांनी केले आहे. ‘मिती ग्रुप’चे संयोजन असलेल्या या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सांभाळणार आहेत.

सई परांजपे लिखित ‘सख्खे शेजारी’ नाटकातील प्रवेश सुप्रिया विनोद, सायली परब-शेलार आणि आलापिनी निसाळ सादर करणार आहेत. आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकातील प्रवेश भार्गवी चिरमुले, श्रीनिवास ओक, कविता जोशी, गौरी फडके आणि शुभम जोशी आदी कलाकार आपल्या अभिनयातून उलगडणार आहेत. तर श्याम मनोहर लिखित ‘येळकोट’ नाटकातील प्रवेश अश्विनी गिरी आणि नंदिता पाटकर सादर करतील.

‘श्री बाई समर्थ’ या राजेश देशपांडे याचा नाटकातील प्रवेशात ईशा डे, श्रेयस वैद्य आणि मुकेश जाधव आदी सहभागी होतील. तसेच, यावेळी रत्नाकर मतकरी यांच्या ‘वट वट सावित्री’ या नाटकातील प्रवेशही सादर होणार असून यात मधुरा देशपांडे, शर्वरी बोरकर आणि संतोष वेरूळकर आदी कलाकार असतील. तर विशाखा सुभेदार आणि सहकलाकार यावेळी संतोष पवार याच्या ‘द दमयंती दामले’ या नाटकातील प्रवेश सादर करतील.

आजपासून प्रवेशिका उपलब्ध

‘ती’ची भूमिका या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका ३ जूनपासून बोरिवलीतील प्रबोधनकार नाट्यमंदिरात सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध होणार आहेत.

मुख्य प्रायोजक – मुसळुणकर यांचे व्हि एम ज्वेलर्स

सहप्रायोजक – लॅब इंडिया विदू इलेक्ट्रिक बायसिकल, मेयर व्हिटाबायोटिक्स

पॉवर्ड बाय – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, गिरगांव कट्टा

कधी ?

गुरुवार, ४ जून २०२६

कुठे ?

प्रबोधन ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली पश्चिम

वेळ?

सायं. ६.३० वाजता