पालघरजवळ लवकरच विमानतळ ; आदित्य ठाकरे यांची ‘लोकसत्ता’ पर्यटन परिषदेत घोषणा

मुंबईतील सीआरझेड क्षेत्र ५० मीटपर्यंत ठेवण्याचा निर्णय नुकताच झाला असून कोकणाबाबत जानेवारीपर्यंत चांगला निर्णय होणे अपेक्षित आहे.

मुंबई : मुंबई विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून, भविष्यात नव्याने सुरू होणारा नवी मुंबईचा विमानतळही अपुरा पडू शकतो. ही गरज लक्षात घेता मुंबईजवळ पालघरमध्ये तिसरा विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या पर्यटन परिषदेत केली. कोकणातील सागरी किनारा नियमन क्षेत्राबाबत (सीआरझेड) जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित असून, मुंबईत बॉलिवूड आणि क्रिकेट संग्रहालय उभारण्यासाठी पावले टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या संधीबाबत विचारमंथन करण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने आयोजित के लेल्या पर्यटन परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्याच्या पर्यटन वाढीसाठी सरकार करीत असलेल्या विविध योजनांचा उहापोह ठाकरे यांनी के ला. या वेळी ‘इंडियन हॉटेल्स कं पनी लि.’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

करोना काळात निर्बंधांमुळे जनजीवन ठप्प असतानाही या कालावधीत पुढील काही वर्षांमध्ये पर्यटन उद्योगाचा कसा विकास करता येईल, याविषयी सर्व संबंधित घटकांशी सांगोपांग चर्चा करुन अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले व पर्यटन धोरण आखण्यात आले. मुंबईतील सीआरझेड क्षेत्र ५० मीटपर्यंत ठेवण्याचा निर्णय नुकताच झाला असून कोकणाबाबत जानेवारीपर्यंत चांगला निर्णय होणे अपेक्षित आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभरात पर्यटन स्थळे विकसित करण्यावर आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई परिसरात ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या तुलनेत पालघरमध्ये कमी असून तेथे अधिक लक्ष देण्यात येत आहे. भविष्यात मुंबई आणि नवी मुंबई विमानतळावरही मोठा ताण येणार असून आणखी विमानतळाची गरज भासणार आहे. नवीन विमानतळ विकसित करण्यासाठी लागणारा काही वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन आतापासूनच पालघर येथे विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु करण्यात आले आहे, असे ठाकरे म्हणाले.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले, तर सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी संवादकाची भूमिका पार पाडली. कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मुंबई २४ तास

जगातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जनजीवन २४ तास सुरु असते. त्यादृष्टीने आठवडय़ाचे सर्व दिवस ‘मुंबई २४ तास’ सुरू राहणे महत्त्वाचे आहे. लंडनमध्ये हा निर्णय झाल्यावर पाच दशलक्ष पौडांनी महसूल वाढला. त्यादृष्टीने विचार केला गेला पाहिजे. मुंबईत कॉल सेंटर किंवा काही आस्थापना मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असतात. पण तेथील कर्मचाऱ्यांना मध्यरात्री अन्नपदार्थ हवे असल्यास अडचण येते, कारण हॉटेलमध्ये गेल्यावर ते अर्धवट सुरू असते. पंचतारांकित हॉटेलमधील रेस्टॉरंट्स २४ तास सुरु असतात, अन्यत्रही ती सुरू ठेवायला हवीत, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राने लाभ घ्यावा पुनीत चटवाल

करोनाकाळात शून्य उत्पन्न असलेल्या पर्यटन क्षेत्राला आता मोठी उभारी मिळाली आहे. किं बहुना करोनापूर्व काळाच्या तुलनेत भारतात हे क्षेत्र वेगाने विकास करत आहे. याचा फायदा के वळ महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने घ्यायला हवा, अशी अपेक्षा ‘इंडियन हॉटेल्स कं पनी लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल यांनी व्यक्त के ली. अन्य देशांनी अजुनही पर्यटनाकरिता मुक्तपणे दरवाजे खुले के लेले नाहीत. याचा फायदा सध्या भारतातील पर्यटन क्षेत्राला होत आहे. त्यामुळे सध्या देशात सर्वत्र हॉटेलमध्ये १०० टक्के  बुकिं ग आहे. हे एक प्रकारचे ‘रिव्हेन्ज’ टुरिझम आहे, असे म्हटले जाते. परंतु, लोक आपल्या आनंदाकरिता बाहेर पडत आहेत. तसेच पर्यटन हे क्षेत्र के वळ उच्चवर्गाची मक्ते दारी नाही. या क्षेत्रातील ९० टक्के  सोयीसुविधा या सर्वसामान्यांकरिता आहेत. त्यामुळे ते अभिजनांचे क्षेत्र असे बिलकु ल राहिलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पर्यटनातील व्यावसायिकांना दिलेल्या सवलतींबाबत चटवाल यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. ‘ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळाला. व्यवसाय सुरू करण्याकरिता लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करून तसेच अनेक करांत सवलती देऊन त्यांनी आम्हाला मोठा दिलासा दिला आहे. हे जगात कु ठेही झाले नाही, असेही चटवाल यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गालगत आरोग्य सुविधा केंद्रे

करोना काळात आरोग्याचे महत्त्व नागरिकांना अधिकच जाणवू लागले असून वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि अन्य बाबींकडे ते वळू लागले आहेत. त्यादृष्टीने आरोग्य पर्यटन महत्त्वाचे असून मुंबई ते नागपूर या नियोजित समृद्धी महामार्गालगत ‘आरोग्य सुविधा केंद्र (हेल्थ हब)’ विकसित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

राज्यभर पर्यटनास चालना : महाराष्ट्रात निसर्ग, सागरी, गड-किल्ले, आरोग्य, धार्मिक आदी विविधांगी पर्यटन वृद्धीसाठी मोठा वाव आहे. तेथील पायाभूत सुविधा वाढवून पर्यटकांना आवश्यक बाबी पुरविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. निर्मिती उद्योगांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहेच, पण सेवा क्षेत्रातून मोठा रोजगार पुरविता येतो. त्यामुळे राज्याच्या विकासात पर्यटन क्षेत्राचे मोठे योगदान राहील, यादृष्टीने चालना देण्यात येत आहे आणि धोरणांमध्ये आवश्यक बदल करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

घोषणा

* पर्यटन आणि हॉटेल उद्योगांसाठी परवान्यांची संख्या ८० वरून १० वर सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही

* मुंबईत वानखेडे मैदान येथे क्रिकेट वस्तुसंग्रहालय उभारणार

* बॉलीवूड वस्तुसंग्रहालयासाठी मुंबईत जागेचा शोध सुरू

* कृषी पर्यटन वाढविण्यासाठी द्राक्षे, संत्री आदी बागांमध्ये सुविधा धोरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta tourism conference airport near palghar soon aditya thackeray zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या