मुंबई : करोनाची साथ नियंत्रणात आलेली असतानाच दिवाळीची सुटी आल्याने राज्यातील पर्यटन स्थळे गजबजणार असून महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाचे वर्तमान आणि भविष्यातील प्रगतीच्या संधी यांची चर्चा येत्या शुक्रवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या पर्यटन परिषदेत होणार आहे.

करोनामुळे गेले पावणेदोन वर्षे पर्यटन व आदरातिथ्य उद्योगावर परिणाम झाला. आता करोनाचे सावट दूर होत असल्याने दिवाळीच्या सुटीच्या हंगामात पर्यटनाला पुन्हा चालना मिळण्याची अपेक्षा असून पर्यटन उद्योग पुन्हा भरारी घेण्यास सज्ज होत आहे. देशांतर्गत विमानसेवा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. अशा वातावरणात पर्यटन विभाग आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील व्यावसायिकांना पर्यटन क्षेत्रातील अडचणी, संधी व संभाव्य उपाययोजना यांची चर्चा होण्यासाठी एक व्यासपीठ लोकसत्ता पर्यटन परिषदेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रात देशातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून पुढे आणण्यासाठी राज्य सरकार काय धोरणे आखत आहे याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुलाखतीतून समोर येईल, तर देशातील पर्यटन व्यवसायाच्या नकाशावर महाराष्ट्राला असलेल्या संधी व त्यासाठी काय करायला हवे याचा ऊहापोह इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल आपल्या भाषणात करतील.

‘पुटिंग महाराष्ट्र टुरिझम ऑन फास्ट ट्रॅक’ या विषयावरील चर्चासत्रात पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, श्ॉले हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, फार होरायझन टुर्स प्रा. लि.चे अध्यक्ष संजय बासू हे महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांवर-धोरणांवर चर्चा करतील, तर ‘मार्के टिंग मॅग्निफिशिएंट महाराष्ट्र’ या चर्चासत्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर, कामत हॉटेल्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल कामत आणि वीणा वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाटील आणि राज्याच्या कृषी व ग्रामीण पर्यटनविषयक समितीचे सदस्य पांडुरंग टावरे हे राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांना महाराष्ट्राच्या-जगाच्या नकाशावर कशा रीतीने आणता येईल यावर मंथन करतील.

प्रायोजक

’मुख्य प्रायोजक : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र

’सहाय्य: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

’कॉर्पोरेट पार्टनर : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)