मुंबई : जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख असून या लोकशाहीचे प्रतीक भारतात प्रथमच मुंबईत साकारण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाजवळील भल्या मोठय़ा वाहतूक बेटावर हा लोकशाही चौक पालिकेच्या नियोजन विभागातर्फे साकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून हा ऐतिहासिक चौक उभारण्यात येणार असून लोकशाहीची महती सांगणारे वैशिष्टय़पूर्ण चिन्ह तेथे साकारण्यात येणार आहे.
संयुक्त महाराष्ट्र लढय़ाची महती सांगणाऱ्या हुतात्मा चौकाच्या धर्तीवर मुंबईत लवकरच लोकशाही चौक साकारण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून हा चौक साकारला जाणार असून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला नुकतेच निर्देश देण्यात आले आहेत. या चौकाच्या उभारणीचे काम मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागातर्फे करण्यात येणार आहे. आझाद मैदान आणि क्रॉस मैदानादरम्यानच्या वाहतूक बेट परिसरात हा चौक उभारण्यात येणार आहे. तब्बल एक हजार चौरस मीटर जागेवर दर्शक गॅलरी, आसन व्यवस्था, पुरातन दिवे आणि लोकशाहीची महती सांगणारे कल्पक चिन्ह येथे असणार आहे. तसेच लोकशाही चौकात ‘जनहित जनमत’ नावाचा एक प्रतीकात्मक छोटेखानी मंचही असणार आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून हा छोटा मंच स्थापन करण्यात येणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत या चौकाची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी शुक्रवारी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामासाठी पाच कोटी रुपये आमदार निधी मंजूर झाला असून कामाचा अंदाजित खर्च साडेचार कोटी रुपये इतका आहे.
अनोखे चलत् शिल्प
लोकशाहीची महती सांगणारे एक खास शिल्प चौकात उभारण्यात येणार आहे. गतीज ऊर्जा या भौतिकशास्त्रातील संकल्पनेवर आधारित हे चलत् शिल्प आहे. वाऱ्याची दिशा बदलताच हे शिल्प हलते. वाऱ्याला स्वत:ची दिशा असते हे सांगणारे हे प्रतीक आहे. भारतीय नागरिकांच्या लोकशाही स्वातंत्र्याचेच हे प्रतीक असणार आहे. आंतराष्ट्रीय कलाकार ॲन्थनी होवे यांनी हे अनोखे चलत् शिल्प साकारले आहे.