मुंबई : लोणावळा – कर्जत मार्गावरील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनाचा परिणाम मंगळवारीही रेल्वे वाहतुकीवर कायम होता. मंगळवारी दुपारपर्यंत १४ गाड्या पूर्णपणे रद्द, एक रेल्वेगाडी अंशतः रद्द, पाच रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले, तीन गाड्या अल्प अंतरावरच समाप्त, तीन गाड्या पुण्याहूनच सुरू करण्यात आल्या असून एका गाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा पुणे येथेच समाप्त करण्यात आली.
ठाकूरवाडी – मंकी हिलदरम्यान डाऊन मुख्य मार्ग आणि मध्य मार्गावर रविवारी मध्यरात्री १.५५ वाजता भूस्खलन झाले. त्यानंतर अप मुख्य मार्गावर मध्यरात्री २.०६ वाजता आणखी एकदा भूस्खलन झाले. त्यानंतर खंडाळा – मंकी हिलदरम्यान मध्य मार्गावर मध्यरात्री ३.०५ वाजता तिसऱ्यांदा भूस्खलन झाल्याचे रेल्वेच्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, सोमवारी सकाळी ९.१५ वाजता खंडाळा स्थानकाजवळ डाऊन मुख्य मार्गावर झाड कोसळले. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मंगळवारी रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये पुणे – सोलापूर इंटरसिटी, सोलापूर – पुणे इंटरसिटी, पुणे – सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे – सीएसएमटी इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी – पुणे डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी – धुळे आणि धुळे – सीएसएमटी एक्स्प्रेस, तसेच सातारा – दादर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. तसेच ८ जुलैची भुज – पुणे एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली.
सीएसएमटी – कोल्हापूर एक्स्प्रेस सीएसएमटी ते खडकीदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ती खडकीहून नियोजित वेळेनुसार पुढे धावणार आहे. दरम्यान, चेन्नई – सीएसएमटी, वेलंकन्नी – डहाणू रोड विशेष, नांदेड – पनवेल, यशवंतपूर – बाडमेर आणि कोयंबतूर – एलटीटी एक्स्प्रेस या पाच गाड्या दौंड – मनमाड – इगतपुरी किंवा जळगाव – पालधी – सुरत मार्गे वळवण्यात आल्या.
हुबळी – दादर एक्स्प्रेस, हैदराबाद – सीएसएमटी एक्स्प्रेस आणि सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या पुणे येथेच समाप्त करण्यात आल्या. तर दादर – हुबळी एक्स्प्रेस, सीएसएमटी – सिकंदराबाद एक्स्प्रेस आणि सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहूनच पुढील प्रवासासाठी सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय सीएसएमटी – नांदेड एक्स्प्रेस नियोजित वेळेनुसार दुपारी १.१५ ऐवजी दुपारी ३.१५ वाजता सोडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
लोणावळा – कर्जत दक्षिण – पूर्व घाट विभागातील भूस्खलनामुळे मंगळवारी पहाटे ४.३० पर्यंत रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, ४१ एक्स्प्रेस रद्द, ५९ रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल, २० रेल्वेगाड्या अंशतः रद्द, २२ रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द करणे आणि ४ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलले. याशिवाय पुणे ते लोणावळा मार्गावरील ४ लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या.
मध्य रेल्वेकडून भूस्खलनग्रस्त ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून परिस्थितीनुसार रेल्वे वाहतुकीत पुढील बदल होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
४०० मजूर तैनात
लोणावळा – कर्जत घाट विभागातील रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. सध्या २०० मजूर घाट विभागात विविध ठिकाणी काम करत असून, आणखी २०० मजुरांना पाचारण करण्यात येत आहे. त्यामुळे एकूण ४०० मजूर तैनात करून कामे केली जात आहेत. मुसळधार पावसामुळे दरड व माती हटविणे, रुळांची पाहणी, बॅलेस्टची दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे वेगाने सुरू असून, रेल्वे प्रशासन शक्य तितक्या लवकर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
