मुंबई : मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे विस्कळीत झालेल्या लोणावळा – कर्जतदरम्यानच्या तिसऱ्या मार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास मध्य रेल्वेला तब्बल २१ दिवस लागले. तिसरी मार्गिका पूर्ववत झाल्यानंतर खंडाळा आणि मंकी हिल स्थानकांदरम्यान बँकर इंजिनची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे मार्ग वळवण्यात आलेल्या रेल्वेगाड्या या मार्गावरून धावतील.
ठाकूरवाडी – मंकी हिलदरम्यान डाऊन मुख्य मार्ग आणि मध्य मार्गावर ६ जुलै रोजी मध्यरात्री १.५५ वाजता भूस्खलन झाले. त्यानंतर अप मुख्य मार्गावर मध्यरात्री २.०६ वाजता आणखी एकदा भूस्खलन झाले. खंडाळा – मंकी हिलदरम्यान मध्य मार्गावर मध्यरात्री ३.०५ वाजता तिसऱ्यांदा भूस्खलन झाले. तसेच सकाळी ९.१५ वाजता खंडाळा स्थानकाजवळ डाऊन मुख्य मार्गावर झाड कोसळले. या सलग घडलेल्या घटनेमुळे लोणावळा – कर्जतदरम्यानच्या तिन्ही मार्गिकांचे प्रचंड नुकसान झाले. तिन्ही रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा, दरड, लहान – मोठे खडक पडले.
या घटनेमुळे मुंबई – पुणे धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला. दुरुस्तीच्या कामासाठी शेकडो कर्मचारी आणि अभियंते, तसेच जेसीबी आणि अन्य अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली. रुळांवरील माती, दगड आणि झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यानंतर ७ जुलै रोजी मध्यम मार्गिका सुरू करण्यात मध्य रेल्वेला यश आले. तर, १४ जुलै रोजी डाऊन (दुसरी) मार्गिका यशस्वीपणे सुरू केली. तर, २७ जुलै रोजी तिसरी मार्गिका सुरू करण्यात आली. रात्री १०.१२ वाजता या मार्गिकेवरून बॅंकर चालवण्यात आला. त्यानंतर रात्री ११.१३ वाजता दुसरा बॅंकर चालवण्यात आला. तर, रात्री ११.३७ वाजता मालगाडी चालवण्यात आली. त्यानंतर आता ही मार्गिका प्रवासी रेल्वेगाड्यासाठी सुरू करण्यात आली.
दुर्गम डोंगराळ परिसर, प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक परिस्थिती असूनही मध्य रेल्वेच्या अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी २४ तास अखंडपणे काम करून रेल्वेमार्ग सुरक्षितपणे पूर्ववत केला. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर बँकर इंजिन यशस्वीरित्या मार्गावरून धावल्याने रेल्वे प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची खात्री केली. कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी तयार करण्यात यश आले असून यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
