मुंबई : रेल्वेगाड्या, लोकल आणि रेल्वे स्थानकातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच लोणावळा रेल्वे स्थानकातही एका तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला प्रवाशाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

तिकीट तपासणीदरम्यान झालेल्या वादातून ही घटना घडली. या मारहाणीची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मध्य रेल्वेच्या लोणावळा रेल्वे स्थानकातील फलाटावर तिकीट तपासणी सुरू असताना संबंधित टीसी आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

संबंधित प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसते. या प्रकारामुळे फलाटावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांकडून घटनेची माहिती घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. सलग घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.