मुंबई रेल्वेच्या मध्य मार्गावर वाहतूक विस्कळीत होणे हा नवीन प्रश्न नाही. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रेल्वेतर्फे आवश्यक त्या उपाययोजना वेळीच न करण्यात आल्यामुळे त्याचा ताण रेल्वेवर पडत आहे. म्हणून उपनगरीय रेल्वेसाठी दूरदर्शी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. तसेच मध्य रेल्वे मार्गावर घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासनही प्रभू यांनी दिलं आहे. 

फोटो गॅलरी : नवीन वर्षातही ‘म.रे.’च! 

केंद्रीय रेल्वेमंत्री मुंबईत असताना एवढ्या मोठ्य़ा घटनेनंतरही ते घटनास्थळी भेट देत नाहीत, यावरून चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्यापेक्षा प्रश्न सुटण्यासाठी त्वरीत कार्यवाही करणं गरजेचं आहे, असंही प्रभू पुढे म्हणाले. लवकरच रेल्वेचे केंद्रीय पथक मुंबईत येऊन मध्य रेल्वेच्या प्रश्नांवर औपचारिक बैठक घेऊन चर्चा करेल आणि आवश्यक त्या उपाययोजनांसाठी त्वरीत पावले उलचण्यात येतील, असं आश्वासनही प्रभू यांनी यावेळी दिलं.