राज्यातील २२ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका

 मुंबई/औरंगाबाद : राज्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे २२ जिल्ह्यांतील सुमारे ३५ ते ४० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि खान्देशला बसला. हातातोंडाशी आलेली पिके  वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतीला बसल्याने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

  गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद तसेच जळगाव, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत अजूनही पूरपरिस्थिती कायम असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांत अजूनही यंत्रणा पोहोचलेली नाही. एकट्या मराठवाड्यात २५ लोकांना प्राण गमवावा लागला असून, अडीच हजार घरांचे तर ३५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांचे  सुमारे २६-३० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच चार हजार ३०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले असून, १२०० पूल पाहून गेले आहेत. पुरामुळे ११० गावांचा संपर्क तुटला असून १०-२० गावांना पुराचा वेढा पडला आहे.

 जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्या पडल्या असून, २०५ तलाव फुटले आहेत. अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे तलाव फुटल्याने पाणी अडवून कसे ठेवायचे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग गुरुवारी दुपारी काहीसा कमी करण्यात आल्याने जलसंकटाचे उग्ररूप काहीसे निवळले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दोन हजार २५४ कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज राज्य सरकारकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादर केला आहे.

 राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ४३९ लोकांचा मृत्यू झाला असून यंदा शेतीचे नुकसान साधारणत:  ४० ते ५० लाख हेक्टरच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

 गेल्या दोन- तीन दिवसातील अतिवृष्टीचा राज्यभरातील २१ ते २३ जिल्ह्यांतील ३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याच प्राथमिक अंदाज असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता असून पंचनामे झाल्यानंतर नुकसानाची माहिती समोर येईल. यंदा कृषी उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा होती. पण पाऊसामुळे सर्व वाया गेल्याचे भुसे यांनी सांगितले. तर आपत्तीग्रस्त भागात दौरे आणि पंचनाम्यांचा फार्स न करता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी के ली आहे.

कोकणात तोक्ते  आणि निसर्ग चक्रीवादळांचा फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून वाढीव मदत जाहीर के ली होती. या धर्तीवर मराठवाड्यातही वाढीव मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री हे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.

अनेक गावांना पुराचा वेढा

’बीड : जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात गुरुवारी पहाटे ९० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनिमंदिर व पांचाळेश्वरचे दत्त मंदिर पाण्याखाली गेले.

’गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या साठपेक्षा अधिक गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

’सखल भागातील गावांना पाण्याने वेढा दिला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टी आणि त्यात जायकवाडीतून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या परिसरात संकट उभे ठाकले आहे.