scorecardresearch

नायगाव बीडीडी पुनर्विकास : पुनर्वसित इमारतीतील पोलिसांच्या २०६ घरांसाठी आज सोडत

नायगावमधील इमारत क्रमांक ‘२ ब’मधील ७३, ‘३ ब’मधील ६४ आणि ‘४ ब’मधील ६९ अशा एकूण २०६ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

lottery for 205 police house in Naigaon BDD Redevelopment
नायगाव बीडीडी पुनर्विकास : पुनर्वसित इमारतीतील पोलिसांच्या २०६ घरांसाठी आज सोडत

मुंबई : नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या पुनर्वसित इमारतींमध्ये पोलिसांना देण्यात येणाऱ्या २०६ घरांसाठी मंगळवारी सोडत काढण्यात येणार आहे. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथील तीन इमारती रिकाम्या करून त्या जागी नव्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. परिणामी, नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

नायगाव, वरळी आणि ना. म. जोशी मार्ग येथील पोलिसांना २५ लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र यासंबंधीचा अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाला पात्र पोलिसांशी करारनामा करता आला नाही. करारनामा होत नसल्याने पोलीस घरे रिकामी करण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांना ‘९५ अ’ अंतर्गत नोटिसा पाठविण्यात येत होत्या. यावरून वाद सुरू झाला. पण आता पात्र पोलिसांना घराची हमी देण्यासाठी पुनर्वसित इमारतीतील घरासाठी सोडत काढण्यात येत आहे.

नायगावमधील इमारत क्रमांक ‘२ ब’मधील ७३, ‘३ ब’मधील ६४ आणि ‘४ ब’मधील ६९ अशा एकूण २०६ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता म्हाडा भवनाच्या गुलझारी नंदा सभागृहात ही सोडत काढण्यात येणार आहे. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तीन इमारती १०० टक्के रिकाम्या होतील आणि त्या पाडण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2022 at 11:04 IST
ताज्या बातम्या