लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीच्या तारखेची अधिकृत घोषणा म्हाडाने बुधवारी केली. त्यानुसार सोडतीची जाहिरात गुरुवारी प्रसिद्ध होणार असून १३ सप्टेंबर रोजी सोडत जाहीर होणार आहे. तर अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होईल.

मुंबई मंडळाने २०१९ नंतर थेट २०२३ मध्ये ४,०८२ घरांची सोडत काढली होती. या सोडतीत मोठ्या संख्येने घरे रिक्त राहिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या घरांसह नवीन घरांची सोडत काढण्याचा विचार सुरू होता. मात्र घरांची जुळवाजुळव करण्यात वेळ गेला आणि सोडत लांबली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आणि आता अखेर मुंबई मंडळाने सोडत जाहीर केली.

आणखी वाचा-जनहित याचिकेच्या माध्यमातून राजकारण करू नका; चित्रा वाघ यांना न्यायालयाचे खडे बोल

मुंबईतील ताडदेव, दादर, कोळे कल्याण, पवई, जेव्हीपीडी, गोरेगाव, बोरिवली, विक्रोळी – कन्नमवारनगर, पवई आदी ठिकाणच्या २०२३ घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत अत्यल्प गटातील ३५९, अल्प गटातील ६२७, मध्यम गटातील ७६८ आणि उच्च गटातील २७६ घरांचा समावेश आहे. म्हाडाला ३३ (५), ३३ (७) आणि ५८ अंतर्गत विविध पुनर्विकास प्रकल्पातून प्राप्त झालेल्या ३७० घरांचा सोडतीतील २०३० घरांमध्ये समावेश आहे. तर ३३३ घरे विखुरलेली असून १,३२७ घरे मुंबई मंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील आहेत.

सोडतीसाठी ९ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडतपूर्व प्रक्रियेचा आरंभ होणार आहे. तर सोडतपूर्व प्रक्रिया पार पाडून १३ सप्टेंबरला सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. अनामत रक्कम आणि उत्पन्न गटाच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. तर अर्ज शुल्कही ५९० रुपये कायम ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा-‘लॉजिस्टिक धोरणा’द्वारे पाच लाख नोकऱ्या; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

  • जाहिरात – ८ ऑगस्ट
  • अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरुवात – ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख, वेळ – ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत
  • आरटीजीएस, डेबिट कार्ड इत्यादी सुविधेमार्फत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत
  • प्राप्त अर्जांची प्रारुप यादी – ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता
  • अर्जाची अंतिम यादी – ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता
  • सोडतीचा निकाल – १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता
  • सोडतीचे ठिकाण – अद्याप निश्चित नाही