scorecardresearch

“स्टाईल वगैरे ठीक आहे पण…”; बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत शिवसेनेचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या ट्विट केलेल्या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने बाळासाहेबांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या वादावरून आमने-सामने आले आहेत. शिवसेनेवर हल्ला करत राज ठाकरे यांनी नुकताच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नमाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मशिदीतून लाऊडस्पीकर काढले जातील, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. आता राज ठाकरेंच्या या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना प्रवक्त्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे आणि राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मेचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी बुधवारी सकाळी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना दिसत आहेत.

“आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता”; भोंगा प्रकरणावरुन राज ठाकरेंना शिवसैनिकांचा पाठिंबा

राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

“ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नमाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील”, असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणत आहेत.

त्यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना प्रियंका चतुर्वेदी यांनी, “हा मूळ व्हिडिओ आहे. हा सर्व स्वस्तातले अनुकरण करणाऱ्यांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे नेहमीच एक पाऊल मागे नसतात तर अनेक पावले मागे असतात,” असे म्हटले आहे.

“राज ठाकरेंनी हात जोडून माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजपा खासदाराचा इशारा  

प्रियंका चतुर्वेदींनी शेअर केलेल्या व्हिडीओत काय म्हणालेत आहे?

“पूर्वी ज्या स्टाईलमध्ये बोलत होतो ती कोणीतरी उचचली आहे असे म्हणतात. पण मला माहिती नाही. म्हणजे मी जर माझ्या स्टाईलमध्ये बोललो तर मी त्यांची कॉपी करतोय असं म्हणतील कदाचीत. स्टाईल वगैरे ठीक आहे पण विचाराला महत्त्व आहे. तुमचे काही वाचन आहे का? नुसती मराठी-मराठीची ओरड करून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता,” असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात एक दिवसाचे आंदोलन नव्हते. हे भोंगे उतरविले जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. मुंबईत वेळेचे बंधन न पाळता १३५ मशिदींवर अजान देण्यात आली त्या मशिदींच्या मुल्ला – मौलवींच्या विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loudspeaker controversy shivsena priyanka chaturvedi replied to raj thackeray from balasaheb thackeray video abn

ताज्या बातम्या