मुंबईत लव्ह जिहादची घटना घडल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईतल्या भांडुप या ठिकाणाहून एका मुलीला आझमगढ या ठिकाणी पळवून नेलं होतं. या मुलीची तिथून सुटका करण्यात आली आहे. मात्र या अल्पवयीन मुलीने जर वडिलांना फोनवरुन मेसेज केला नसता तर त्या मुलीचं काय झालं असतं? असा प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे. तर मुलीच्या वडिलांनी माझ्या मुलीचा मला फोन आला आणि बाबा मला विसरुन जा म्हणत असंही ती म्हणाली. त्यानंतर तिला कसं सोडवलं, पाच दिवस ती कशी आझमगडला होती? हे सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबईचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण यांच्याकडे देण्यात आलं आहे असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकी काय घडली घटना?

भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे की मुंबईतल्या भांडुप या भागातून एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका १९ वर्षीय मुस्लिम मुलाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवलं. तिला उत्तर प्रदेशच्या आझमगढ या ठिकाणी ठेवलं होतं. या १९ वर्षांच्या मुलाचं नाव सैफ खान असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. पीडित मुलीच्या घराजवळ सैफ खान हा एका सलूनमध्ये काम करतो. त्याने या मुलीला फसवून जबरदस्तीने आझमगडला नेलं. आझमगडच्या एका छोट्या गावात तिला कोंडून ठेवण्यात आलं तिचा मोबाईलही काढून घेण्यात आला. पाच दिवस तिला कोंडण्यात आलं होतं. पाच दिवसांनी या अल्पवयीन मुलीला मुंबईत आणण्यात आलं आहे. या मुलीला पळवणारा, तिच्याशी प्रेमाचं नाटक करणारा सैफ खान हा फक्त १९ वर्षांचा आहे. तो एकटा हे धाडस करु शकत नाही. त्याच्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला याची कल्पना होती, तसंच हे प्रकरण लव्ह जिहादचं आहे असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी काय सांगितलं?

८ मेच्या रात्री मी घराच्या बाहेर होतो, माझ्या मुलगी घरात नाही याबाबत मला काहीही माहिती नव्हती. रात्री पावणेअकराच्या दरम्यान माझ्या सासूचा मला फोन आला की मुलगी घरात नाही. त्यानंतर मी भांडुप पोलीस चौकीवर गेलो तिथे मुलगी हरवल्याची तक्रार दिली. भांडुपमध्येही मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र माझी अल्पवयीन मुलगी सापडली नाही. माझ्या मुलीला घेऊन हे लोक ९ मे रोजी सकाळी कुर्ला स्टेशनहून आझमगढला गेले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मला संध्याकाळी फोनवर एक फोन आला की “बाबा, मी एका घरात आहे.” तिला मी विचारलं तुझ्या आजूबाजूला कुणी काका, काकू किंवा मोठं माणूस आहे का? त्यांना फोन दे आम्ही येतो तिकडे. त्यानंतर मुलगी मला म्हणाली, “मी कुठे आहे मला काहीच सांगता येत नाहीये.” थोड्या वेळाने मला माझ्या मुलीने सांगितलं की “बाबा तुम्ही जी पोलीस तक्रार दिली आहे ती रद्द करा.” त्यानंतर थोड्यावेळाने फोन आला की, “बाबा माझं लग्न झालंय, मला विसरुन जा घ्यायला येऊ नका.” मी तिला विचारत राहिलो की काय घडलंय? तिने काहीच उत्तर दिलं नाही.

पुढे पीडितेचे वडील म्हणाले, मला ज्या नंबरवरुन मुलीने फोन केला होता तो नंबर पोलिसांनी ट्रॅक केला तेव्हा तो आझमगढला असल्याचं पोलिसांना कळलं. त्यानंतर मी भांडुप पोलिसांसह तिकडे गेलो. तिथल्या पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी मी माझ्या मुलीला विचारलं की तू असं का सांगितलंस की तुझं लग्न झालंय? त्यावर मला मुलगी म्हणाली की, “बाबा मला त्या घरातल्या लोकांनी हे सांगायला सांगितलं होतं. तुझ्या वडिलांना सांग की पोलीस तक्रार रद्द करा आणि वडिलांना सांग तुझं लग्न झालंय तुला घ्यायला येऊ नका.” हे मला त्यांनी सांगितलं असं मुलीने सांगितल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं.

किरीट सोमय्यांनी काय म्हटलं आहे?

पीडित अल्पवयीन मुलीला फसवलं गेलं आहे. तिला बहाण्याने आझमगढला नेण्यात आलं. सैफने या मुलीला पळवून आणावं यासाठी त्याला अनेकांनी पाठिंबा दिला. आधी पीडितेला कळव्याला आणि मग कुर्ला या ठिकाणी नेण्यात आलं. सैफ, त्याचे वडील, त्याचा भाऊ आणि त्याचे कुटुंब या सगळ्यांनी या मुलीवर खूप दबाव आणला. त्या मुलीला हे सांगितलं की तुझं लग्न झालंय या मुलाशी हे सांग. वडिलांना फोन कर आणि वडिलांना सांग की माझं लग्न झालंय मला विसरुन जा. तिचा फोन आल्यानंतर सायबर ब्रांचने लोकेशन शोधलं आणि त्यानंतर मुलीला सोडवण्यात आलं. तुम्ही विचार करा की त्या मुलीचा फोन आला नसता तर काय घडलं असतं? हे प्रकरण लव्ह जिहादचं आहे. या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी करतो आहे असंही किरीट सोमय्यांनी सांगतिलं आहे. भांडुप पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही असा प्रश्न मला पडला आहे. मी या सगळ्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस सह आयुक्त सत्यनारायण हे या प्रकरणाचा तपास करत आहेत अशीही माहिती किरीट सोमय्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love jihad case in mumbai muslim youth abducted minor girl kirit somaiya said this is love jihad case scj
First published on: 24-05-2023 at 15:51 IST