मुंबई : मेट्रो-७ अ प्रकल्पाअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे के पूर्व प्रभागातील बामणवाडा, अंधेरी (पूर्व) परिसरातील वेरावली जलाशयाच्या कार्यान्वित असलेल्या १८०० मिलिमीटर व्यासाच्या निगम वाहिनीखाली बोगदा खणन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात येणार आहे. हे खोदकाम २२ ते २८ जून या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व विभागाच्या हद्दीतील अंधेरी (पूर्व), विलेपार्ले (पूर्व) आणि आसपासच्या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे २२ जूनपासून शनिवार, २८ जूनपर्यंत सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० आणि रात्री ९.३० ते मध्यरात्रीनंतर ३.३० या वेळेत खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व विभागातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यानुसार विलेपार्ले (पूर्व) परिसरात सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. जुना नागरदास मार्ग, नवीन नागारदास मार्ग, मोगरापाडा, अंधेरी – कुर्ला मार्ग येथे रात्री ८ ते ९.३० दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.