मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज प्रदान करण्यात आले होते. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे आणि भारतीय ध्वजसंहितेचा अवमान करणारे राष्ट्रध्वज मिळाले आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत रेल्वे कर्मचारी संघटनांनीही मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र पाठवून याबाबत तक्रार केली आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा फडकवण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम हाती घेण्यात आली. त्याचबरोबर सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यास सुरुवात झाली. तसेच, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज देण्यात आले. या राष्ट्रध्वजासाठी पगारातून ५५ रुपये कापण्यात येणार आहेत. मात्र भारतीय ध्वज संहितेशी सुसंगत नसलेले आणि निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज त्यांना मिळाले. तसेच राष्ट्रीय चिन्हाचा अनादर करणारे, असमान तिरंगी पट्ट्या, फिके रंग असलेले राष्ट्रध्वज मिळाल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच हे ध्वज फडकवण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. असे ध्वज स्वीकारणे केवळ राष्ट्राचा अपमानच नाही तर ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेचा अवमान आहे. त्यामुळे या ध्वजामध्ये बदल करून, कर्मचाऱ्यांना ध्वज संहितेचे पालन करणारे राष्ट्रध्वज द्यावेत, अशी मागणी नॅशनल रेल्वे मजदूर संघाकडून केली होती. मात्र, ध्वज बदलून देण्यात आले नाही. हेही वाचा - अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर, १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशाची संधी हेही वाचा - मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता राष्ट्रध्वजाचे हे महत्त्व अबाधित राखण्यासाठी भारतीय ध्वज संहिता तयार करण्यात आली. तसेच राष्ट्रध्वजाशी संबंधित सर्व कृतींचे नियमन, बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० ( १९५० चा अधिनियम क्रमांक १२ ) आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ ( १९७१ चा अधिनियम क्रमांक ६९) यांच्या तरतुदींद्वारे केले जाते. या ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजावर आणि त्याच्या बरोबरीने दुसरा कोणताही ध्वज लावू नये. भारतीय ध्वजसंहिता २००२ नुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाणे आवश्यक आहे.