मुंबई : येत्या तीन आठवडय़ांत शाळा सुरू होणार असल्या तरी, मुंबईत १२ ते १४ वयोगटातील अवघ्या २९ टक्के बालकांनी पहिली लसमात्रा घेतली आहे. दुसऱ्या लसमात्रेसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या तर त्याच्या एकतृतीयांश आहे. करोनाच्या रुग्णांची मुंबईतील संख्या वाढत असतानाही बहुतांश नागरिकांनी आपल्या मुलांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईत प्रौढांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण सुमारे १११ टक्क्यांहून जास्त तर दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांची संख्या १०० टक्क्यांहून अधिक आहे. परंतु १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाचा प्रतिसाद वाढलेला नाही. राज्यभरात या वयोगटातील बालकांचे लसीकरण १६ मार्चला सुरू झाले. त्याला आता जवळपास दोन महिने झाले आहेत. आता पुन्हा एकदा काही प्रमाणात रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र अद्यापही बालकांना लस देण्यास पालकांचा पुढाकार दिसत नाही. आतापर्यंत मुंबईत सुमारे २९ टक्के बालकांनी पहिली मात्रा घेतली आहे. या बालकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण २८ दिवसांत म्हणजेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू झाले. पहिली मात्रा पूर्ण केलेल्या बालकांचा दुसरी मात्रा घेण्यासाठीही अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे आढळले आहे. पहिली लस घेतलेल्या सुमारे १ लाख ७ हजार बालकांपैकी सुमारे ३५ हजार ७१८ (३३ टक्के) बालकांनी दुसरी मात्रा पूर्ण केली आहे. 

पालिकेने या बालकांचे लसीकरण वाढविण्यासाठी गृहनिर्माण संकुलासह आवश्यक तेथे शिबिरे भरविण्याच्या सूचनाही आरोग्य केंद्रांना दिल्या. यानंतर या वयोगटातील दैनंदिन लसीकरणामध्ये काही अंशी वाढ होऊन जवळपास दोन हजारांपर्यंत गेले. परंतु गेल्या काही दिवसांत पुन्हा हा प्रतिसाद कमी झाल्याने लसीकरण घटले आहे.

लसीकरणावर भर देणे गरजेचे

मुंबईत करोना प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना लसीकरणावर भर वाढविणे गरजेचे असल्याचे मत करोना कृती दलाचे डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले आहे. परंतु बालकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरणही वेग घेत नसल्याने पालिकेपुढे या वयोगटाचे लसीकरण पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक झाले आहे.

शाळा सुरू होताच वेग वाढवणार

शाळांना उन्हाळय़ाची सुट्टी असल्याकारणाने शाळांमधून राबवण्यात आलेली लसीकरण शिबिरे थंडावली. शाळांच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचा पाठपुरावा करण्यावर भर देण्यात येत होता. बालकांची दुसऱ्या मात्रेची वेळ आली त्यावेळेस बऱ्याचशा शाळा बंद झाल्या होत्या. त्यामुळे पाठपुरावा करणेही शक्य झालेले नाही. आता जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर याचा पाठपुरावा केला जाईल असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.