मुंबई: लोअर परळ स्थानकावरून जाणाऱ्या पुलावर पदपथ तयार करण्याचे काम अखेर सुरू झाले आहे. हा पूल नोव्हेंबर २०२३ मध्ये वाहतुकीस खुला झाल्यानंतर पुलावर पदपथ नसल्याबद्दल नागरिकांनी समाज माध्यमांवरून नाराजी व्यक्त केली होती. तसेच सर्वच राजकीय पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला होता. अखेर पालिका प्रशासनाने या पुलावर पदपथ बांधण्यास सुरूवात केली आहे. दीड महिन्यात पदपथाचे काम पूर्ण होणार आहे.
लोअर परळ (डिलाईल रोड) पूल धोकादायक झाल्यामुळे जुलै २०१८ ला बंद करण्यात आला होता. विविध अडथळ्यांमुळे या पुलाचे काम रखडले होते. लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल आधीच्या पुलाप्रमाणेच बांधण्यात आला आहे. या पुलाला एकूण तीन पोहोच रस्ते आहेत. मात्र आधीच्या पुलावर जसे पदपथ होते तसे पदपथ नवीन पुलाला नसल्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनावर टीका केली होती. पालिकेच्या नव्या धोरणाप्रमाणे पुलावर पदपथ तयार केले नसल्याची चर्चा होती. मात्र लोअर परळ पुलाच्यानंतर सुरू झालेल्या अंधेरी पुलावर पदपथ आहेत पण लोअर परळ पुलाला पदपथ का नाहीत असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. पूल सुरू होऊन वर्ष झाले तरी पदपथ बांधण्याचे काम हाती घेतले जात नव्हते. मात्र आता पालिकेच्या पूल विभागाने पूलावर पदपथ बांधण्याचे काम सुरू केले आहे. तसा फलक पुलावर लावण्यात आला आहे.
हेही वाचा >>>Maharashtra Assembly Election 2024 : भाजपची पहिली यादी निवडणूक जाहीर झाल्यावरच
लोअर परळ परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यालये असल्यामुळे सकाळी व सायंकाळी या परिसरात नोकरदारांची मोठी गर्दी असते. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा मोनो रेल्वेने लोअर परळ येथे येणारे नोकरदारांचे लोंढे या परिसरात येतात. मात्र लोअर परळ पुलाला पदपथ नसल्यामुळे पुलाच्या कडेने ही गर्दी चालते. काही प्रवासी पुलाच्या खालच्या रस्त्यावरून चालत जाऊन जिने ओलांडून जातात. पदपथ नसल्यामुळे नागरिकांनाही जीव धोक्यात घालून पूल ओलांडावा लागतो. हा पूल बांधला तेव्हा पादचाऱ्यांना या पुलावरून जाण्यासाठी कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. आधीच्या पुलावर बसथांबा होता तो देखील या पुलावर ठेवण्यात आलेला नाही. तसेच पुलावरून रेल्वे स्थानकात शिरण्यासाठी एक मार्ग होता तोही आताच्या पुलावर नाही. त्यामुळे केवळ वाहनचालकांच्या सोयीसाठीच हा पूल असल्याचीही टीका होऊ लागली होती.
हेही वाचा >>>गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार; नरेंद्र मोदी
या पुलावर पदपथ असावेत अशी मागणी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही पालिका प्रशासनाला तसे आदेश दिले होते. अखेर प्रशासनाने पदपथाचे काम सुरू केले आहे.
या पुलावर दीड मीटर रुंदीचे आणि ८०० मीटर लांबीचे पदपथ तयार करण्यात येणार आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला पदपथ तयार करण्यात येणार आहेत. या पुलाला एकूण तीन पोहोच रस्ते असून तीनही पोहोच रस्त्यांवर दोन्ही बाजूचे मिळून १६०० मीटर लांबीचे पदपथ तयार करण्यात येणार आहेत. तसेच पदपथाला लागून कठडेही तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पदपथावर चालणे सुरक्षित होणार आहे. पदपथाचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट् आहे.-अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त