मुंबई : चार वर्षांपासून रखडलेल्या लोअर परेल रेल्वे स्थानकावरील डिलाईल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. रेल्वे हद्दीतील काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पालिकेला पोहोच रस्त्याचे काम पूर्ण करणे अवघड आहे. रेल्वेच्या हद्दीतील काम ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वेने पालिकेला कळवले आहे.

लोअर परळचा पूल धोकादायक झाल्यामुळे २०१८ मध्ये बंद करण्यात आला. विविध अडथळय़ांमुळे या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.  लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाईल रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाची आणि तेथे महानगरपालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्त्यांच्या कामांची  पर्यटन, पर्यावरणमंत्री  आदित्य ठाकरे यांनी रविवारी पाहणी केली.

रेल्वे हद्दीतील ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रेल्वेला निधी दिला आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरून येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरून येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन  रस्त्यांचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे. या कामांच्या प्रगतीची पाहणी या वेळी ठाकरे यांनी केली. महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या पोहोच रस्त्यांसाठी आतापर्यंत आवश्यक काम गतीने करण्यात आले आहे. मात्र रेल्वेने गर्डरचे बांधकाम पूर्ण केले, तरच महानगरपालिकेचे उर्वरित कामदेखील तातडीने पूर्ण होईल, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले. यानंतर, हिंदमाता येथील पावसाळी पाणी साठविण्यासाठी सेंट झेवियर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत जलधारण टाकीच्या कामाचीदेखील त्यांनी  पाहणी केली.

रेल्वे दाद देईना रेल्वे हद्दीतील कामाला उशीर झाल्यामुळे पोहोच रस्त्याचे काम रखडले आहे. त्याला गती देण्याच्या अनुषंगाने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे या वेळी ठाकरे यांनी सांगितले. त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. रेल्वेकडून आता ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची वेळ कळवली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले. नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणाने रेल्वेच्या कामांना विलंब होतो आहे, ते रेल्वे प्रशासनाने जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे, असेही ते या वेळी म्हणाले.