मुंबई : लोअर परळ, वरळी येथील २५,५४३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा सेंच्युरी मिलचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. या भूखंडावरील १०,९२९ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मनोरंजन मैदानाचे आरक्षणही बदलण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर ठेवण्यात आला असून याबाबत वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेतली. स्थानिक रहिवाशांची पात्रता निश्चित केल्याशिवाय, तसेच त्यांच्या मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय सदर पुनर्विकासाचा प्रस्ताव पुढे नेऊ नये, अशी मागणी आमदार अदित्य ठाकरे यांनी आश्विनी भिडे यांच्याकडे केली.

लोअर परळमधील सहा एकर भूभाग गरीब वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी घरांसाठी सेंचुरी स्पिनिंग आणि मँन्युफँक्चरिंग लिमिटेड यांना १ एप्रिल १९२७ पासून पुढील २८ वर्षांच्या कालावधीकरीता देण्यात आला होता. या जागेवर मिलतर्फे बांधण्यात आलेल्या ४७६ खोल्या, १० दुकाने व चाळींसह हा मक्ता ३ ऑक्टोबर १९२८ ला केलेल्या करारान्वये देण्यात आला होता. हा करार ३१ मार्च १९५५ ला संपुष्टात आला. करार संपुष्टात आल्यानंतर या भूभागावर मुंबई महापालिकेची मालकी आहे. करार संपुष्टात आल्यानंतर भूभाग परत करण्याऐवजी तो आपल्या नावे अभिहस्तांतरीत करण्यासाठी सेंचुरी मिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेनेही खटला लढवला. न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर सेंच्युरी मिलची जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली. त्यानंतर महापालिकेकडे हा भूभाग परत आला.

आता हा भूखंड नव्याने ३० वर्षांसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीकडे पाठवण्यात आला आहे. एकूण २५,५४३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड असून त्यात मैदान (१२६५ चौमी), महापालिका शाळा (२२८ चौरस मीटर), मनोरंजन मैदान (१०,९२९ चौ.मी) आहे. या भूखंडावरील मनोरंजन मैदानाचे आरक्षण बदलण्यात येणार आहे. हा भूखंड ३० वर्षांसाठी भाड्याने देण्यात येणार असून १३५२ कोटी अधिमूल्य आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आपल्या मतदारसंघातील विविध विषयांसदर्भात पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेतली. स्थानिक रहिवाशांची पात्रता निश्चित केल्याशिवाय, तसेच त्यांच्या मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय सदर पुनर्विकासाचा प्रस्ताव पुढे नेऊ नये, अशी मागणी आमदार अदित्य ठाकरे यांनी आश्विनी भिडे यांच्याकडे केली. रहिवाशांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आमचे देखील या पुनर्विकासाला सहकार्य राहील, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यावेळी, त्यांच्यासोबत आमदार सुनील शिंदे, मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, नगरसेविका हेमांगी वरळीकर आदी उपस्थित होते. प्रभादेवी येथील सेंच्युरी मिल म्हाडा संक्रमण शिबिरातील इमारत क्र. १ ऐ, १ बी व १ सी येथील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.