मुंबई : वातानुकूलन यंत्रणेने (एसी) काम करणे बंद केल्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना घुसमटल्यासारखे वाटू लागले आणि या सगळ्या प्रकारामुळे कार्यक्रमाचा विचका झाल्याचा ठपका ठेवून जिल्हा ग्राहक न्यायालयाने लोअर परळस्थित रेस्टॉरंटला तडाखा दिला. तसेच, कार्यक्रमस्थळ आरक्षित करताना वातानुकूलन ही एक अत्यावश्यक बाब असते, असे नमूद करून तक्रारदार महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेस्टॉरंटला दिले.

बँक्वेट हॉलमधील एसी बंद पडल्यामुळे सेवेत कसून झाल्याचा ठपकाही उपनगरीय अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने ठेवला. त्याचप्रमाणे, तक्रारकर्तीला झालेल्या त्रासासाठी २२,५५७ रुपये द्यावेत. ही रक्कम ऑगस्ट २०२४ पासून सहा टक्के वार्षिक व्याजाने द्यावी. याशिवाय, महिलेला मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये आणि कायदेशीर खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचेही आयोगाने स्पष्ट केले. आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन करण्याचेही आयोगाने रेस्टॉरंटला बजावले.

घाटकोपर येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेने जुलै २०२४ मध्ये एका नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी लोअर परळ येथील या रेस्टॉरंटचा बँक्वेट हॉल आरक्षित केला होता. तेथे त्यांनी भोजन आणि इतर सेवांसाठी ३.६३ लाख रुपये भरले होते. तथापि, कार्यक्रमादरम्यान वातानुकूलन यंत्रणा अचानक बंद पडली, त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना घुसमटल्यासारखे वाटू लागले आणि प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला, असा आरोप तक्रारकर्तीने तक्रारीत केला होता. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाने पंखे लावून तात्पुरती व्यवस्था केली असली, तरी ती अपुरी ठरली. अनेक पाहुणे जेवण न करताच परतले. परिणामी, आपली मानहानी झाली, असा दावाही तक्रारकर्तीने केला होता.

कार्यक्रमाच्या काही दिवस आधीपासूनच एसी युनिटमध्ये बिघाड झाला होता आणि त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नव्हती, अशी कबुली खुद्द कर्मचाऱ्यांनीच दिली होती, असा दावा देखील या महिलेने तक्रारीत केला होता. रेस्टॉरंट व्यवस्थापनाला नोटिसा पाठवूनही ते आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी त्यांच्या अनुपस्थितीतच पूर्ण करण्यात आली आणि अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौरी कापसे यांचा समावेश असलेल्या आयोगाने तक्रारकर्तीच्या बाजूने निर्णय दिला.

आयोगाचे म्हणणे…

भोजन किंवा इतर संलग्न सेवांच्या बाबतीत रेस्टॉरंटकडून कोणत्याही प्रकारची निष्काळजी झाल्याचे सिद्ध झालेले नाही, असे आयोगाने आदेशात नमूद केले. मात्र, एखादा ग्राहक कौटुंबिक कार्यक्रमासाठी बँक्वेट हॉल आरक्षित करतो, तेव्हा वातानुकूलन ही त्या संपूर्ण सेवा संकुलाचा अविभाज्य आणि अत्यावश्यक घटक असतो हे आयोगाने अधोरेखित केले. वातानुकूलनासाठीचे शुल्क स्वतंत्रपणे आकारले गेले नसले तरी, एकूण रक्कम ही वातानुकूलनासह सर्व सेवांसाठीची एकत्रित रक्कम होती, असा निर्णय देऊन आयोगाने तक्रारकर्तीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.