अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध सुरु होऊन १८ दिवस झाले आहेत.आखाती देशांमध्ये होणाऱ्या या युद्धाचा भारतासह जगावर परिणाम होताना दिसतो आहे. कारण भारतात ठिकठिकाणी एलपीजी गॅस सिलिंडरसाठी रांगा लागल्या आहेत अभिनेता अक्षय कुमार आज मुंबई महापालिकेत आला होता. त्यावेळी त्याला गॅस टंचाईबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी अक्षय कुमारने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
काय म्हटलं आहे अक्षय कुमारने?
माध्यमांनी अक्षय कुमारला गॅस तुटवड्याबाबत प्रश्न विचारला, त्यावेळी तो म्हणाला, “सध्या तरी माझ्या घरी गॅसची काहीही अडचण नाही. पण माझ्या पत्नीने दोन इंडक्शन ऑर्डर केले आहेत. ते घरी आले आहेत की नाही मला ठाऊक नाही. पण तिने ते ऑर्डर केले आहेत.” असं अक्षय कुमारने सांगितलं. एलपीजी तुटवड्याची झळ बॉलिवूडपर्यंत पोहचल्याचं दिसून येतं आहे.
इलेक्ट्रिक शेगड्या, इंडक्शनची मागणी वाढते आहे
जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण होत असल्याने एलपीजी पेट्रोल डिझेल यासारख्या इंधनाबाबत अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. दरम्यान संभाव्य तुटवड्याच्या भीतीने अनेक लोक पर्यायी व्यवस्थांकडे वळताना दिसतायत. इलेक्ट्रिक शेगड्या, इंडक्शन कुक टॉप यांची मागणी वाढत असल्याची माहिती ही समोर येत आहे.गॅस पुरवठा खंडित होण्याची भीती सर्वसामान्यांपासून ते आता बॉलीवूडपर्यंतही पोहोचलीये.यापुढे परिस्थिती कशी राहणारी याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
हॉटेल व्यवसायावर गॅस तुटवड्याचा परिणाम
सध्या देशात एलपीजी गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती जाणवत असल्याने त्याचा मोठा परिणाम हॉटेल उद्योगांवरही बसलाय. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी गॅसचा वापर टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेकांना हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. कमर्शियल एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. परिणामी कामकाजावर गंभीर अडथळा निर्माण झाला आहे.
