Mumbai Hotels LPG Gas Shortage: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी पुरवठ्यावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. ७ मार्च रोजी केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाकाचा आणि व्यावसायिक वापराच्या गॅसमध्ये दरवाढ केली. त्यानंतर आता व्यावसायिक वापराचाच्या गॅस सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. यामुळे बंगळुरूतील हॉटेल बंद करण्याची वेळ सोमवारी आली होती. त्यानंतर आता मुंबईतीलही २० टक्के हॉटेल्स बंद करावे लागत असल्याचे हॉटेल संघटनेने म्हटले आहे. मुंबई हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनने याबाबमाहिती देताना सांगितले की, पुरवठा पूर्ववत झाला नाही तर काही दिवसांत ५० टक्के हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते.

मध्य पूर्वेतील संघर्षामुळे भारतातील प्रमुख शहरांमधील हॉटेल व्यवसायाला याची झळ बसत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील हॉटेल संघटनांनी इशारा दिला आहे की, सिलिंडरचा पुरवठा पूर्ववत झाला नाही तर येत्या काही दिवसांत हॉटेल व्यवसायच ठप्प होऊ शकतो. या क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बंद झाल्यास मुंबई आणि बंगळुरूतील इतर कामकाजावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या हॉटेल्सकडे अतिरिक्त एलपीजी साठा आहे, तोपर्यंत ते चालतील. त्यांच्याकडील साठा संपल्यानंतर ते हॉटेल्सही बंद होतील. जर पुरवठा पूर्ववत झाला नाही तर येत्या दोन-तीन दिवसांतच मुंबईतील निम्मी हॉटेल्स बंद करण्याची वेळ येईल.

दरम्यान हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आलेला नाही, असेही मुंबई हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (AHAR) ने सांगितले आहे. हॉटेल उघडे ठेवायचे की बंद करायचे हा सर्वस्वी निर्णय त्या त्या हॉटेल मालकांचा आहे. उपलब्ध साठ्यानुसार हॉटेल मालक निर्णय घेत आहेत.

अपुऱ्या गॅस सिलिंडर पुरवठ्याचा फटका

इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाला आज ११ दिवस होत आहेत. युद्धातून अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आणखी काही दिवस युद्ध लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील वाढता दणाव आणि जागतिक स्तरावर ऊर्जा संकट घोंघावत आहे. भारतात दरवर्षी सुमारे ३३ दशलक्ष मेट्रिक टन एलपीजीची मागणी असून त्यातील जवळपास दोन-तृतीयांश भाग आयातीवर अवलंबून आहे, तसेच आयातीपैकी सुमारे ८५–९० टक्के पुरवठा मध्यपूर्व देशांकडून येतो.

भारतातील विविध शहरांमध्ये गॅसचा तुटवडा भासू लागला. त्यानंतर ७ मार्च रोजी गॅसच्या दरात वाढ झाल्यानंतर एलपीजी सिलिंडरची मागणी वाढली.

मुंबईतील बहुसंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. रोजच्या व्यवसायासाठी अनेक सिलिंडर लागत असतात. जर हा पुरवठा खंडीत झाला तर हॉटेलचे किचन बंद करण्याची वेळ येऊ शकते. हॉटेस संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, काही हॉटेल्सनी आधीच उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली असून मेन्यू कार्डमधील पदार्थ मर्यादित केले आहेत.