मुंबई : अमेरिका, इस्राइल, इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांवर होऊ लागला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा सरकारने बंद केल्याने मुंबईतील विविध रुग्णालयांमधील खासगी उपहारगृहांमधील गॅसचा साठा संपत आला आहे. त्यामुळे रुग्णालयामधील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, निवासी डॉक्टर, शिकाऊ परिचारिका, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण मिळणे अवघड झाले आहे. अनेक रुग्णालयांमधील खासगी उपहारगृहामध्ये एकादाच सिलिंडर असल्याने उपहारगृह मालकांकडून फक्त दाल-खिचडी उपलब्ध केली जात आहे. त्यामुळे सर्वांना दाल खिचडीवर दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये गॅस सिलिंडरचा पुरवठा न झाल्यास शिकाऊ डॉक्टरांसह रुग्णांच्या नातेवाईकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. मुंबईतील राज्य सरकारच्या व महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना सकाळी लवकर घर सोडत असल्याने त्यांना बऱ्याचदा रुग्णालयातील खासगी उपहारगृहामध्येच नाष्टा व दुपारचे जेवण करावे लागते. त्याचप्रमाणे रुग्णालयमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसोबत असलेल्या असलेल्या नातेवाईकांना ही उपहारगृहे मोठा आसरा असतात. रुग्णालयातर्फे फक्त दाखल रुग्णांनाच जेवण मिळत असल्याने नातेवाईकांना सकाळच्या नाष्ट्यापासून दोन्ही वेळेच्या जेवणासाठी या उपहारगृहांवर अवलंबून राहावे लागते. मात्र व्यावसायिक सिलिंडर विक्री थांबविल्याने या उपहारगृहांमधील सिलिंडरचा साठा संपत आला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून या उपहारगृहांच्या मालकांकडून तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद केले असून, फक्त दाल खिचडी, सँडविच, चहा, बिस्किट असे पदार्थ विक्री करण्यावरच भर दिला आहे.
परिणामी रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शिकाऊ डॉक्टर, शिकाऊ परिचारिका यांना दाल खिचडी, सँडविच यावर दिवस काढावे लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टर, शिकाऊ परिचारिका यांच्याकडून ऑनलाईन ऑर्डर करून जेवण मागविण्यावर भर दिला आहे. मात्र हे जेवण आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर, शिकाऊ परिचारिका यांच्यासाठी स्वतंत्र उपहारगृह असते. मात्र या उपहारगृहांसह रुग्णांसाठी असलेल्या उपहारगृहामध्ये एखाद दुसरा सिलिंडरच शिल्लक आहे. तर काही रुग्णालयांच्या खासगी उपहारगृहातील सिलिंडर पूर्णत: संपले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये सिलिंडर उपलब्ध न झाल्यास उपहारगृहे बंद करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपचारासाठी येणारे रुग्ण व नातेवाईक आणि रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांसोबत असलेले नातेवाईक, डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, परिचारिका आणि निवासी डॉक्टर यांच्या वसतिगृहामध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र उपहारगृह आहे. या उपहारगृहांना व्यावसायिक सिलिंडर घ्यावा लागत असून, व्यावसायिक सिलिंडरची विक्री रोखली आहे. परिणामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय
