वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा नुकताच एका कार्यक्रमात घर देऊन सन्मान करण्यात आला आहे. कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर स्वाती महाडिक यांनी जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अकरा महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करत लष्करात प्रवेश मिळवला होता. त्यांच्या या जिद्दीला आणि खडतर प्रवासावर मात करत मिळवलेल्या यशाला सलाम करत संघवी पार्श्व समुह कंपनीजच्या सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशनच्या उपक्रमातंर्गत त्यांचा सन्मान करण्यात आला. आटगाव येथील संघवी गोल्ड सीटी या नव्या प्रकल्पात त्यांना वन बीएचके घराची किल्ली सुपूर्द करण्यात आली.
काश्मीरच्या कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. यानंतर स्वाती महाडिक यांनीदेखील लष्करात रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अकरा महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करत लेफ्टनंटपदी रुजू झाल्या होत्या. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत (ओटीए) झालेल्या दिमाखदार दीक्षांत समारंभात स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू झाल्या.
शहीद संतोष महाडिक यांच्या निधनानंतर स्वाती यांनी लष्करात सेवा करण्याचा निश्चय बोलून दाखवला होता. तेव्हापासून त्यांनी लष्करात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पुणे विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या स्वाती वयाच्या पस्तिशीत स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. या परीक्षेसाठी स्वाती यांचे वय अधिक असले, तरी लष्कर व संरक्षणमंत्र्यांनी फक्त वयाच्या अटीत सूट दिली होती. त्यानंतर मुलांना शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये ठेवून स्वाती यांनी या परीक्षेसाठी कसून तयारी केली होती. अखेर त्या पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. यानंतर बंगळुरू येथे त्यांनी वैद्यकीय आणि शारीरिक चाचणीही यशस्वीपणे पार पाडल्याने स्वाती यांची चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीसाठी (ओटीए) निवड झाली होती. अखेर अकरा महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करत त्या लेफ्टनंटपदी रुजू झाल्या होत्या.