मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सामान्य व मध्यमवर्गीय प्रवाशांना परवडणाऱ्या दरात अधिक आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-सुभेदारगंज विशेष रेल्वेगाडीचे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ही गाडी आता नियमित साप्ताहिक सेवेत दाखल करण्यात आली आहे.
याआधी विशेष गाडी म्हणून धावणारी गाडी क्रमांक ०४११६/०४११५ ही सेवा आता गाडी क्रमांक १४१२२/१४१२१ अमृत भारत एक्स्प्रेस या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. ही सेवा २२ डब्यांच्या उच्च क्षमतेच्या रचनेत असून प्रत्येक फेरीत १,८०० हून अधिक प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. वातानुकूलित नसलेल्या या गाडीत सामान्य व शयनयान प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक १४१२२ एलटीटी-सुभेदारगंज अमृत भारत एक्स्प्रेस २८ ऑगस्ट २०२६ पासून दर शुक्रवारी रात्री १०.५५ वाजता एलटीटीहून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता सुभेदारगंजला पोहोचेल. गाडी क्रमांक १४१२१ सुभेदारगंज-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस २७ ऑगस्ट २०२६पासून दर गुरुवारी दुपारी १२.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.५० वाजता एलटीटीला पोहोचेल.
या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकूटधाम, बांदा, रागौल, भरुआसुमेरपूर, गोविंदपुरी व फतेहपूर येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला २२ अमृत भारत डब्यांमध्ये ८ शयनयान, ११ सामान्य श्रेणी, १ पॅन्ट्री कार व २ मालडबा व अपंग तसेच ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये पुश-पूल तंत्रज्ञानामुळे वेग वाढताना व ब्रेक लावताना धक्के कमी बसतात. प्रत्येक आसनाला स्वतंत्र मोबाइल चार्जिंग पॉइंट, एलईडी प्रकाशयोजना, सीसीटीव्ही पाळत, स्वयंचलित उद्घोषणा प्रणाली, सील्ड वेस्टिब्युल, निर्वात-नि:सारण शौचालये व अपंगांसाठी अनुकूल सुविधा देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी ‘कवच’ स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली, आग-प्रतिरोधक पडदे व एरोसोल अग्निशमन तंत्रज्ञानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
गाड्यांच्या संख्येत वाढ
या रूपांतरानंतर मध्य रेल्वेवर धावणाऱ्या अमृत भारत गाड्यांची संख्या २० वर पोहोचली असून त्यापैकी १४ रेल्वेगाड्या मध्य रेल्वेवरून सुटतात वा तेथेच समाप्त होतात. रेल्वेने या सेवेचे आरक्षण आयआरसीटीसीवर सुरू केले असून वेळापत्रकाची माहिती एनटीईएस आणि रेलवन ॲपवर उपलब्ध आहे.
