मुंबई : विमानतळावर सोडण्यासाठी आलेल्या आईला रडताना पाहून मुलाचा पाय निघेना. सर, आईला भेटून येऊ का एका मिनिटांत,अशी विनवणी करताच खाकी वर्दीतल्या त्या सीआयएसएफ अधिकाऱ्यांने हो म्हटले. धावत जाऊन मिठ्ठी मारुन रडणाऱ्या आईचे डोळे त्याने पुसले. उत्तर प्रदेशमधील लखनौ विमानतळावरील हा व्हिडीओ सीआयएसएफच्या ऑफिशिअल ”एक्स” अकाऊण्टवरुन शेअर केला आहे.
रविवारी जगभऱात आंतरराष्ट्रीय मदर्स डे साजरा झाला. प्रत्येक लेकराने आपल्या आईवर प्रेमाचा वर्षाव केला. आई आणि मुलांमधील नात्याचा हळवा बंध सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सौदी अरेबियाला जाण्यासाठी एक मुलगा ९मे रोजी शनिवारी लखनौ विमानतळावर पोहोचला. मुलगा विमान पकडण्यासाठी सुरक्षा तपासणी करत होता. तो आपल्या आईची वाट पाहत होता, मात्र ती अद्याप ”गेट”पाशी पोहोचली नव्हती. अखेर त्याला ती दूरवर दिसली, तेव्हा आई रडत होती.
विमानतळाबाहेर रडणाऱ्या आईला शेवटची मिठी मारण्यासाठी तरुणाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका अधिकाऱ्याला विनवणी केली. वर्दीतल्या त्या अधिकाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता परवानगी दिली. परवानगी मिळताच मुलगा धावत आला आणि आईला घट्ट मिठी मारली. तिचे डोळे पुसत तिला धीर दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फेर धरत आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यातून आपोआप पाणी येते.
वर्दीतली माणुसकी
देशातील विमानतळांवर सीआयएसएफची सुरक्षा आहे. सहसा सीआयएसएफ नियमात कोणतीही सुट किंवा सवलत देत नाहीत. विमानतळावर जास्त वेळ थांबणाऱ्यांना देखील हटकले जाते.अशावेळी सीआयएसएफ अधिकाऱ्याने दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
