शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेस जबाबदार धरण्यात आलेले आणि याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत पुन्हा घेण्याचा ठराव करणाऱ्या महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांच्या अभ्रद युतीविषयी शहरात जोरदार टीका होऊ लागली आहे. या ठरावाविषयी शहरवासियांकडून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठाण्यातील एका दक्ष नागरिकाने या ठरावाचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी महापालिकेस पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहीली.
लकी कपाऊंडमधील सात मजली अनधिकृत इमारत कोसळून ७४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण, श्रीकांत सरमोकादम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण नऊ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्याविरोधात कारवाई केली नाही. त्यामुळे या इमारत दुर्घटनेस या नऊ जणांना जबाबदार धरण्यात आले होते. या नऊजणांसह बिल्डर, वास्तू विशारद, पत्रकार, पोलीस हवालदार, नगरसेवक, आदींनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील एकूण २७ आरोपींपैकी काहींना जामीनही मंजूर झाला आहे. या घटनेनंतर महापालिकेतील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशासनाने निलंबित केले. पण, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आणला नव्हता. याच मुद्दय़ावरून गुरूवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत पुन्हा घेण्याचा ठराव मंजूर केला. दरम्यान, या ठरावाविषयी शहरवासियांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाण्यातील दक्ष नागरीक चंद्राहास तावडे यांनी या ठरावाचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहीली.

शीळ-डायघर इमारत दुर्घटना प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही. मग, अशाप्रकारचा ठराव करण्याची इतकी घाई कशासाठी, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नावे उघड करण्याची धमकी नगरसेवकांना दिली तर नाही ना असा संशय या ठरावाच्या निमित्ताने नागरीकांना येऊ लागला आहे, अशी प्रतिक्रीया जाग संघटनेचे मिलींद गायकवाड यांनी दिली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिल्डरधार्जिणे निर्णय घेण्यात आले. तसेच शीळ इमारत दुर्घटनेतील बिल्डरांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याचे काम सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले असून त्याच्या निषेधार्थ पुष्पचक्र अर्पण करून बेकायदेशीर काम करणारे बिल्डर, भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नगरसेवक, या सर्वाना भावपुर्ण श्रद्धांजली वाहीली, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली.