मुंबई : पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील मोठ्या त्रुटी दाखवून देऊन सत्ताधारी बाकावरील अमित गोरखे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी विकास आराखड्याला स्थगिती देण्याची मागणी केली. विरोधी बाकावरून सतेज पाटील, सचिन आहीर, शशिकांत शिंदे यांनाही गंभीर त्रुटी दाखवून दिल्या. त्यामुळे हरकती आणि सूचनांची सुनावणी झाल्यानंतर गरज पडल्यास विकास आराखडा रद्द करण्यात येईल, असे नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी जाहीर करावे लागले.
विधान परिषदेत पिंपरी – चिंचवडच्या विकास आराखड्याचा प्रश्न अमित गोरखे यांनी उपस्थित केला. या चर्चेत उमा खापरे, श्रीकांत भारतीय, सतेज पाटील, सचिन आहीर, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते – पाटील आदींनी सहभाग घेतला.
पिंपरी – चिंचवड पालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. सध्याच्या प्रशासकीय राजवटीने अत्यंत चुकीचा आराखडा तयार केला आहे. ३० हजारांहून जास्त हरकती आल्या आहेत. लोकांनी आंदोलनही केले आहे. प्रस्तावित आराखड्यात नद्यांच्या पूररेषेमध्ये आरक्षणे टाकली आहेत. रेड झोनमध्ये बांधकामे प्रस्तावित आहेत. पालिका आणि पाटबंधारे विभागाच्या पूररेषेत फरक आहे. अतिरिक्त आरक्षणे टाकली आहे. चार पोलिस आयुक्तालयासाठी आरक्षणे टाकली आहेत. आळंदी नजीक कत्तलखाना प्रस्तावित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात आरक्षणे टाकली आहेत. शाळेच्या मैदानावर दफनभूमी आणि रस्त्याचे आरक्षण टाकली आहेत. ग्रामदैवताच्या मंदिराच्या ठिकाणी रस्ता प्रस्तावित आहे. हा विकास आराखडा रद्द करणार आहात का ? विकास आराखड्याच्या सल्लागारांवर काय कारवाई करणार, असा सवाल केला.
विकास आराखड्यावर सत्ताधारी आणि विरोधकांच्या गंभीर आक्षेपांमुळे राज्यमंत्री मिसाळ यांची कोंडी झाली. पिंपरी – चिंचवडचा विकास आराखडा तयार करून लोकांच्या हरकती, सूचनासाठी ठेवण्यात आला आहे. त्यावर सुनावणी होऊन, दुरुस्ती होऊन सरकारकडे येईल. त्यानंतर हा आराखडा सरकारकडे येईल. सरकारला त्यात दुरुस्ती करण्याचा, रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विकास आराखडा चुकीचा असेल तर तो रद्द करण्यात येईल, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.