मुंबई : सध्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये तपासणीदरम्यान किंवा पडताळणीअंती सादर केलेली कागदपत्रे चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा निर्णय सीईटी कक्षाने घेतला असून तसे निर्देश सर्व संस्थाना देण्यात आले आहेत.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना विविध आरक्षण प्रवर्गांअंतर्गत म्हणजेच अनाथ, संरक्षण दल, दिव्यांग, अल्पसंख्याक प्रवर्गांतर्गत लामिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत. सदर कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून महाविद्यालयांमध्ये जागांचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने संबंधित आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे तपासणीदरम्यान अथवा कोणत्याही पडताळणीअंती चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तशा स्वरूपाच्या सूचना प्रवेश देणाऱ्या संस्थांना देण्यात आल्या आहेत.

प्रवेश देणाऱ्या संबंधित संस्थेने जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्याच्या सर्व मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करूनच त्याचा प्रवेश निश्चित करावा. कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता प्रवेश निश्चित केल्याचे सिध्द झाल्यास अशा संस्थावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश संबंधित संस्थांना सीईटी कक्षानी दिले. यामुळे प्रवेश घेणारे विद्यार्थी व प्रवेश देणाऱ्या संस्थांनी वरील निर्देशानुसारच प्रवेश प्रक्रियेची आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना सीईटी कक्षानी दिल्या.